background

स्वप्न विश्लेषण कशे करावे?

स्वप्ने साऱ्यांनाच पडतात. स्वप्न न पडलेला माणूस विरळाच. काही लोकांना हा नित्याचाच आनंद तर काहींना अधूनमधून याचे दर्शन; पण स्वप्न म्हणजे काय? असे कोणी विचारले तर त्याचे नेमके उत्तर सापडणार नाही. भिन्न भिन्न प्रकारांनी, तत्त्ववेत्त्यांनी आपआपल्यापरी भिन्न भिन्न प्रकारे उत्तरे दिली आहेत. संस्कृत पंडितांनी अगडबंब शब्द वापरून त्याला तत्त्वज्ञानाची पुटे चढविली. तर काहींनी इंग्रजीचे संस्कृतमय मराठीत भाषांतर करून “ठोकून देतो ऐसाजे की” असा प्रकार केला. साध्या व सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर असे सांगता येईल की, स्वप्न एक असा चित्रपट की ज्याचा निर्माता कोण – माहीत नाही, दिग्दर्शक कोण – माहीत नाही, कलाकार कोण – माहीत नाही – कथालेखक कोण – माहीत नाही, संगीतकार माहीत नाही – कथानक माहीत नाही – कोठले दृश्य पाहावयास मिळणार – माहीत नाही. याला प्रेक्षक फक्त एकच लागतो. त्याला हा चित्रपट बघण्याकरता तिकीट काढावे लागत नाही. फक्त ज्याला हा चित्रपट “बघावयाचा आहे” तो प्रेक्षक “झोपलेलाच” पाहिजे हा अलिखित नियम. बघा, तुम्हाला पण पटली ना ही सुटसुटीत पण थोडी गुटगुटीत व्याख्या.

स्वप्न एक महान चमत्कार आहे

तसे थोडे खोलात जाऊन बघितले तर आपणास आढळून येईल की स्वप्न एक चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे काय? निसर्ग ज्यावेळी आपले गुणधर्म बदलतो त्यावेळी आपण त्याला चमत्कार म्हणतो. विस्तवाचा गुणधर्म पोळने-जाळणे हा आहे. पण कोणी म्हणेल की श्री. पु. ल. ला पद्मश्री मिळताच विस्तवाने त्यांना पोळने सोडून दिले आणि पु. ल. शेगडीतले खवखवणारे निखारे काडकाड सुपारी खाल्ल्यासारखे खातात, तर आपणांस हा फार मोठा चमत्कार वाटेल. पण असे होणे कालत्रयी शक्य नाही. माणसांनी केलेल्या समाजकार्याला किंवा किमान संशोधनाला बक्षीस म्हणून किंवा देणगी म्हणून घ्यायची निसर्गाची प्रथा नाही. कधी असं झालंय का की १२० तरुण-तरुणी “भारत जोडो” करता सायकलवर श्री. बाबा आमटे यांच्याबरोबर भारतभर फिरून आले आणि या महान कामगिरीवर प्रसन्न होऊन विस्तवाने त्यांना “पोळने” सोडून दिले. बुध्दीमान आणि तडफदार तरुणांनी हुंडा घेतला नाही एवढ्या अचाट कामावर खुष होऊन विस्तवाने त्याला पोळणे सोडले आहे असे कधीतरी आणि कोठेतरी घडले आहे? कवींनी क्रांतिकारक कविता रचल्या, नाटककारांनी समाजाच्या दांभिकतेचे वाभाडे काढले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवाबाजी उघड करून भांडाफोड केला तरी यापैकी एकावरही निसर्गाने कृपा करून आपला नियम तोडल्याचे दाखवता येणार नाही. काही माणसं दगडातून देव निर्माण करतात तर काही जण देवाला फोडून परत दगड करतात; परंतु यापैकी कोणीही “अमर” झालेला नाही. ‘जन्माला येणारा प्राणी मरणार’ हा निसर्गाचा अलिखित नियम. मग माणूस जन्मभर गोमूत्र प्यायला काय आणि दारू प्यायला काय, दोघानाही मृत्यू निश्चितच. निसर्गाजवळ अपवाद नाहीच. असो. अधिक भारुड न लिहिता “खोगीर भरती” टाळतो.

इतके जरी असले तरी निसर्ग स्वतःच खेळकर असल्यामुळे स्वतःच ‘चमत्कार’ करून माणसाला खेळवतो – रिझवतो – तसाच तो त्याला विचार पण करावयास लावतो. अन् तेही स्वप्न दाखवून. कसे ते पाहू या.

तुम्ही झोपला आहात. तुमच्या स्वप्नात तुम्हास हेमा मालिनी दिसते. ती दरवाजातून आत येत असताना तिच्या पायातील घुंगरांचा मंजुळ आवाज तुम्हाला सुखद वाटतो. ती तुमच्या पलंगावर येऊन बसते व आपल्या जवळील अत्तराचा फाया तुमच्या हाताला फासते. तुम्ही हात हुंगून सुगंध घेऊन तृप्त होता. ती आलिंगन देण्याकरिता दोन्ही हात तुमच्या गळ्याभोवती टाकते अन् तुम्ही जागे होता.

आता सांगा, जड स्वरूपात समोर नसताना हेमा मालिनी ‘बघितली’ ते डोळे कोणते होते? जड स्वरूपात फक्त घुंगरू तुम्ही बघितले, पण त्यातून ध्वनी निर्माण न होता तुम्ही मंजुळ आवाज ऐकला ते कान कोणते होते? ती जड देहाने नसताना तुम्ही तिला आलिंगन द्यावयास निघालात तो देह कोणता होता? येथे निसर्गाने आपणहून (म्हणजे त्याच्या स्वेच्छेने) आपले सर्व अलिखित नियम तोडून एक चमत्कार माणसास दाखवला. डोळ्याचा गुणधर्म फक्त जड वस्तू ‘बघणे’ अन् तीही डोळे उघडे असताना. कानाचा धर्म निर्माण झालेला ध्वनी ‘ऐकणे’, जर ध्वनी निर्माण झाला तर. नाकाचा धर्म श्वास घेणे व गंध जाणणे, गंध असल्यास. येथे सर्व अवयवांनी सर्व नियम धुडकावले आहेत. जड वस्तू नसताना झोपेत हेमा मालिनी डोळ्यांनी बघितली. पायात घुंगरू नसताना पण ध्वनी निर्माण न होताही कानांनी निर्माण न झालेला ध्वनी ऐकला. अक्षरशः सुगंधी द्रव पदार्थ शरीराला न चोळताही द्रवपदार्थांचा त्वचेने स्पर्श न होताही सुगंध घेतला. देह समोर नसतानाही देहाने आलिंगनासाठी घेतलेली धाव. सारे कसे चमत्कारात मोडते. झोपेत असताना ‘बघतो’ पण झोपेत असताना कोण जागे होते हे सांगता येत नाही. सर्वसाधारण नास्तिक एक ठराविक मुद्दा मांडतात. ‘ईश्वर आम्ही डोळ्यांनी बघू, नंतरच मानू.’ इथे तर खरे म्हणजे तर्कदुष्टताच आली आहे. जी वस्तू डोळ्यांनी दिसत नाही ती ‘पाहण्या’चा अट्टाहास हाच मात्र पाहण्यासारखा आहे. ते एवढ्यापुरतेच बोलतात. मग मी त्यांना वरील स्वप्न रंगवून सांगतो आणि विचारतो, “माझ्या नास्तिक मित्रांनो, तुम्ही झोपले असताना हेमा मालिनी बघितली, ते डोळे, निर्माण न झालेला घुंगरांचा ध्वनी ऐकणारे कान, त्वचेला स्पर्श न होतही घेतलेला सुगंध आणि जड देह पलंगावर पडलेला नसतानाही आलिंगनाकरता धावणारा देह जर तुमच्या देहातून मला द्याल तर मी कोठेही परमेश्वर दाखवू शकेन.” परत नास्तिक आले नाहीत व पुढे कधी येणार नाहीत.

स्वप्ने का पडतात?

माणसाला नियमित व अनियमित स्वप्ने पडू लागली आणि त्याला हे काहीतरी आगळे वेगळेच वाटायला लागले आणि तो त्याची कारणे शोधावयास लागला. कुठे कुठे घडणाऱ्या पुनरावृत्तीमुळेच स्वप्ने पडत असावीत असेही त्यास जाणवू लागले.

Swapnanchi-Duniya-1

 

तसे पाहिले तर स्वप्न न पडलेला मनुष्य दुरापास्तच. माणसाला झोपेतच स्वप्न पडतात हा एक निसर्गाचा विलक्षण चमत्कारच आहे. तो प्रत्येक मनुष्य अनुभवीत असतोच. स्वप्नं का पडतात याचं निश्चित उत्तर कोणीच समाधानकारक देऊ शकलेलं नाही. तत्त्ववेत्ते, डॉक्टर यांनी आपआपल्या परीने कारणे दिली आहेत. ती सर्वस्वी कोणासच पटण्यासारखी नाहीत. यांचे काही वानगीदाखल नमुने –

  • मेंदूमधील ज्ञानतंतूचे मलूल अवस्थेत जाणे म्हणजे झोप या अल्पशा हालचालीने मलूल अवस्थेचा नाश होऊन प्राप्त झालेली चेतना ते स्वप्न.
  • मेंदूची झोपेतील चंचलता तेच स्वप्न.
  • इंद्रिय विज्ञान्शास्त्राप्रमाणे पोटाच्या अपचनाची झोपेतील जाणीव, तेच स्वप्न.
  • शरीरशास्त्राप्रमाणे मेंदूत रक्तप्रवाह वाढवण्यास झोपेत आलेला अडथळा अंशतः दूर होणे म्हणजेच स्वप्न.
  • मानसशास्त्राप्रमाणे स्वप्न म्हणजे ताबा असलेल्या किंवा नसलेल्या आठवणींचा भास.
  • झोपेत मनच सर्व बनते ती स्थिती म्हणजे स्वप्न.
  • जीवाने परलोकात जाणे म्हणजे स्वप्न.
  • विवेकशील मनाचा लय झाला असता विवेकशून्य मनाचे वावदूक वावरणे ते स्वप्न.
  • अंतरमनापासून किंवा जागृत मनापासून आलेले ठसे, देखावे किंवा सुचना अंतरमनाने थोडे फेरफार करून अथवा जसेच्या तसेच झोपेत बाहेरील मनासमोर नाचविणे त्याला स्वप्न म्हणतात.
  • दैवी जगत्प्रपंच म्हणजे स्वप्न.

(स्वप्न भविष्य- ले. श्री. कै. दत्तात्रेय ज्योतीपंत कुळकर्णी)

काहीच्या मते स्वप्ने हि केवळ अपचनामुळेच पडतात, परंतु हे सर्वस्वी खरे ठरत नाही. केवळ अपचन झाल्यामुळे स्वप्ने पडली असती तर ज्याला अपचन होत नाही त्यांना स्वप्न पडलीच नसती, पण तसे होत नाही. म्हणून या विधानास काहीच किंमत देता येत नाही.

एक वर्ग असा आहे की, जो स्वप्न हा एक जागृत मनाचा खेळ आहे असे मानतो. निद्रावस्थेतील मेंदूची ती एक चलनवलन प्रक्रिया आहे. या शिवाय त्याला काही अर्थ नाही. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” असे म्हणून ते मोकळे होतात; पण हेही बरोबर नाही. यातील से ला से जुळल्यामुळे अर्धवट समाधान होते, पण यात विज्ञान्दृष्ट्या आणि तर्कशास्त्रदृष्ट्या काहीच अर्थ नाही. दिवसभरातील घडामोडी मना वसतातच. म्हणून त्या सर्व स्वप्नात येतात का? नाही. म्हणजेच केवळ मनात वसलं म्हणून स्वप्नात दिसलं असे म्हणता येत नाही. आता हेच विधान दुसर्या उदाहरणावरून सहज खोडता येईल. या वर्गातील लोकांना जर विचारलं की, साप तुमच्या मनात वसला होता का? वाघ तुमच्या मनात वसला होता का? विष्ठा तुमच्या मनात कधीतरी वसली होती का? महारोग तुमच्या मनात वसला होता का? या सर्वांचं उत्तर निश्चितच नकारार्थी आहे आणि इतके स्पष्ट असूनही साप-विष्ठा-वाघ-महारोगांनी पिडलेला माणूस तुमच्या स्वप्नात येतातच. म्हणून वरील कविकल्पना हि वायफळ ठरते, त्यात तथ्य नाही.

Swapnanchi-Duniya-2

एक दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्या मते स्वप्न म्हणजे केवळ आभास. त्यात काही खरे नसले तर मग अर्थ कोठला आणि भविष्य कोठले? स्वप्नात येणाऱ्या वस्तू या खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिजवळ येत नाहीत हे खरे. याबद्दल दुमत नाही. डोळे बंद असताना आपण “पाहतो” हा मोठा चमत्कार आहे. डोळे बंद असताना पाहिलेल्या वस्तू-दृश्य-आपल्याजवळ असावीत असे यांना म्हणावयाचे आहे काय? असे जर असेल तर डोळ्यांनी बघितलेले असंख्य-तारे-सूर्यचंद्र-मोटारी-विमान आणि असंख्य माणसे सर्व त्या माणसाजवळ कुठे असतात? आता माणसाकडे जरा चिकित्सक दृष्टीने बघा. तो आपल्या जड डोळ्यांनी फक्त “जड” वस्तूच पाहू शकतो. अदृश्य वस्तू नाही. तो चालता बोलता मनुष्य पाहू शकतो, पण त्यातील “चैतन्य” पाहू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजेचा बल्ब. जो जळताना मनुष्य बघू शकतो. त्याचे डोळे तेवढेच दाखवतात पण त्यात असलेली वीज तो आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. फक्त ती तो ज्ञानाने जाणू शकतो. डोळे बंद असताना म्हणजेच झोप लागली असतानासुद्धा देहातील डोळ्यांनी स्वप्न पाहिले जाते. जागृत अवस्थेत कोणी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहू शकत नाही. फक्त स्वप्न रंगवू शकतो. अर्थात “रंगवलेली स्वप्ने” आणि “पडलेली स्वप्ने” यातला फरक वाचकाला अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. “स्वप्न हे खरं नसतं व त्यात काही अर्थ नाही” असे म्हणतेवेळी मजेदार चूक होऊन जाते. माणूस झोपलेला असतो आणि पडत असलेले स्वप्न पूर्णपणे “बघत” असतो. जागा झाल्यावर तो स्वप्न सांगू शकतो. नव्हे सांगतोच. पडलेले स्वप्न हे खरे असते आणि तो खरे पाहिलेले “स्वप्न” अगदी खरोखर सांगतो आणि नंतर म्हणतो, “स्वप्न काही खरे नाही. तो निव्वळ आभास आहे.” आता पाहा, खरे पाहून ते काही खरे नाही म्हणणे आणि पाहून “आभास” म्हणणे म्हणजे केवळ विनोद!

डॉक्टरांनी आपल्या व्याव्सायानुरूप व शास्त्रानुसार स्वप्नास शारीरिक तसेच मानसिक रोग किंवा विकृती कारणीभूत ठरतात असा एक सर्वसाधारण ठोकताळा सांगितला. तर ज्योतिषी मंडळींनी स्वप्नाचा संबंध ग्रंथांशी असल्याचा निर्वाळा(!) दिला. कै. दत्तात्रय कुळकर्णी यांचे एक पुस्तक “स्वप्न भविष्य” या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. या पुस्तकात ते लिहितात, “स्वप्नाशी ज्योतीषशास्त्रदृष्ट्या ग्रहाचा संबंध कसा असतो व कितपत असतो हे सांगणे जरुर आहे. स्वप्नाचा संबंध गुरु व नेपच्यून या दोन ग्रहांशी निगडीत आहे आणि गुरु, नेपच्यून, बुध, मंगळ यांचा शुभयोग असला तरच सूचक स्वप्ने पडू शकतात.” या विचाराचे खंडण करणे फार सोपे आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वप्न पडते त्या व्यक्तीची पत्रिका “स्वप्नास” माहीत असायलाच पाहिजे. ज्याच्या कुंडलीत गुरु, मंगळ यांचा शुभयोग असेल अशाच्याच स्वप्नात “स्वप्नांनी” जायला पाहिजे. म्हणजे “स्वप्नासच” ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. तर्कशास्त्रदृष्ट्या या गोष्टीला, विधानाला काहीही किम्मत देता येत नाही. थोडक्यात याल एक “बामणी बंडल” म्हणता येईल.

येईपर्यंत आपण स्वप्नाची कारणमीमांसा बघितली, परंतु खरे सांगायचे तर न तुम्हाला काही पटलय, न मलाही. याचे कारण काय असावे याचा मी खूप विचार केला आणि मला याचे एक “कारण” आपोआप सापडले.

कोणालाही स्वप्न स्वेच्छेने पडत नसतात. ती एक निसर्गाची प्रभावी लहर आहे. त्याचे कारण शोधणे व्यर्थ आहे.

काही भ्रामक कल्पना

स्वप्नाच्या बाबतीत काही भ्रामक कल्पना बऱ्याच जणांच्या आहेत. त्यापैकी काही कल्पनांचा परामर्श घेऊ.

  • सूर्योदयापूर्वी स्वप्ने खरी ठरतात. ही एक अत्यंत सर्वसामान्य (सर्वांनी माना डोलाव्ल्यामुळे) कल्पना आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सूर्य एक ज्योत आहे. हि ज्योत कधी विझत नाही. म्हणजे सूर्य कधी मावळतच नाही तर उगवण्याचा प्रश्न येतोच कोठे? तो फक्त भौगोलिक भूमिकेनुसार दृष्टिआड होतो ऐवढेच. मग सकाळ म्हणजे काय? सूर्योदय म्हणजे काय? हे स्वप्नाच्या भाषेत समजण्याकरता माणसाने आपली झोप मोजून ठेवली पाहिजे. आता झोप मोजायची कशी? समजा तुही ११ ला झोपत असाल आणि तुम्हाला पहिली जाग जर ६ ला आली असेल तर ११ ते ६ हि तुमची खरी रात्र. ६ ला जाग येणे हा तुमचा सुर्योदय. पंचांगात सूर्योदयाची वेळ काहीही असो. त्याच्याशी तुमचा आणि तुमच्या झोपेचा काडीचाही संबंध नाही. फक्त तुम्ही निजतेवेळी घड्याळ बघायचे आणि जाग येताच घड्याळ बघायचे एवढेच. आता स्वप्न तुम्ही घड्याळाप्रमाणे क्रमवार लक्षात ठेवा. शक्य झाल्यास लिहून ठेवा. आता कोणत्या वेळी काय दिसले याकरिता उलट्या क्रमाने (Anti-Clockwise) जा. म्हणजे तुम्हास स्वप्नातील “सूचक” भागाची वेळ काढता येईल. स्वप्नातील सूचक भाग कसा ओळखावा हे दुसऱ्या भागात तपशीलवार दिले आहे.
  • “स्वप्ने भविष्य सांगतात” हे छोटे पुस्तक आहे.
  • चांगले स्वप्न पडले आणि जर झोप उघडली तर झोप येऊ नये कारण त्याचे इष्ट फळ प्राप्त होत नाही. हे सपशेल खोटे आहे. जर स्वप्न सूचक असेल तर त्याचा परिणाम हा कधीही बदलत नाही. एवढे लक्षात घ्या. मग तो चांगला असो वा वाईट. निसर्गाची सुचना मिळताच, मग तो मनुष्य जागा राहतो का पुन्हा झोपतो, गोमुत्र पितो, शाकाहार घेतो का मासाहार, देवळात जातो का नाही. मग बदल कुठला? अशा रीतीने या गोजिरवाण्या बंडलाची विल्हेवाट लागते.
  • वाईट स्वप्न पडले की नंतर अवश्य झोपावे म्हणजे वाईट काळाचा नाश होतो. हे बंडल वरील पहिल्या बंडलाचे मूर्ख भावंड आहे. म्हणून यावर अधिक लिहिणे नको.
  • स्त्री किंवा लहान मुले यांना स्वप्नाचे वर्णन करून सांगू नये. लहान मुलांचे एक वेळ समजू शकते; पण “स्त्री” जातीला स्वप्न सांगू नये म्हणजे शुद्ध वेडेपणाच आहे. आता स्त्रिया डॉक्टर होतात. तेव्हा त्यांना डॉक्टर या नात्याने या “रोग्याची” चांगली ओळख झालेली आहे. आपल्याकडे अजून याचा अभ्यास असा कोणी केला नाही. रशियात मात्र एका बाईने संशोधन करून यावर पीएच.डी. मिळवली आहे. तेव्हा या भंकस विधानाची दाखल न घेतलेली बरी.

एक गैरसमज असाही आहे की, दिवसा पडलेली स्वप्ने खरी होत नसतात. खरे म्हणजे स्वप्न केव्हा पडते याला महत्त्व नाही. फक्त ते सूचक आहे का नाही हे म्हत्वाचे आहे. आपण दुपारी झोपलो तर “झोपेला” ही दुपार आहे का रात्र आहे, याचा विधिनिषेध नसतो. झोप आली आणि नंतर स्वप्न पडले तर ते दिवसा का रात्री हे म्हत्वाचे नाही. (पुढील भागात सूचक स्वप्नाबद्दल तपशीलवार लिहिले आहे.) “स्वप्नभविष्य” या पुस्तकात भितीप्रद स्वप्ने, प्रतिकूल संवेदनाची वाईट स्वप्ने तशीच अनिष्ट फलदायक स्वप्ने, यांचा मनुष्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून प्राचीन आचार्यांनी दुःस्वप्न – शांती व अनिष्ट फळ परिहाराचे विधी सांगितले आहेत. “ब्राह्मणाकडून रात्रीच प्रयत्नाचे होम करून उक्त विधीने तुपाने मिश्रित अशा पायसाचे (दूध किंवा दुधाची खीर) हवन करावे. उक्त विधीने म्हणजे ज्याचे त्याचे रीतिरिवाजाप्रमाणे विधी असे समजावे. कुलदेवता अगर विघ्नहर्ता गजानन अगर शंकर याचे समोर अंघोळ करून निरांजन लावावे व नारळ फोडावा. मग शिवकवच, विष्णूसहस्त्रनाम, लक्ष्मीस्तोत्र, नवग्रहस्तोत्र वाचावे. विचित्र स्वप्नाचे शांतीसाठी व परिहारासाठी विनायकी चतुर्थीव्रत करावे. जुन्या काळच्या नियमानुसार जो कोणी उपाध्याय असेल त्यास यथाशक्ती दक्षिणा, वस्त्रे, गायी, सोने वैगरे शांतीफल प्राप्तीसाठी द्यावीत.”

वरील पूर्ण परिच्छेद बारकाईने वाचल्यास अंधश्रद्धा कशी तर्कदृष्ट्या सिद्धांतावर कलाकुसरीने बसवली आहे याचा सुंदर नमुना म्हणून याकडे बघावे लागेल. गणित अगोदरच चूक करून ठेवायचे आणि नंतर ते “बरोबर” येण्याकरता वरील प्रमाणे जपजाप्य करावे आणि गणित चुकले तरी आता आपोआप वारोवर होऊन शंभरपैकी शंभर गुण मिळणारच अशा विश्वासाने झोपणार्या विध्यार्थ्याची काय दश होऊल हे काय सांगावयालाच पाहिजे काय? याला अधिक खुलासेवार करून सांगितल्यास यावर आणि अशा वार्याच तर्कदृष्ट कल्पनांवर प्रकाश पडून त्या दूर होतील असा विश्वास वाटतो.

पहिली गोष्ट म्हणजे आजतागायत कोणत्याही आचार्यांनी “दुःस्वप्न” म्हणजे काय हे कोठेही सांगितले नाही. फक्त सर्व विद्वान आचार्यांनी शुभ आणि अशुभ या दोन कोटीतच फले सांगितली आहेत. शुभ स्वप्न सांगताना सर्वांनी (सर्व धर्मात) पांढरा रंग, काही प्राणी आणि पांढऱ्या वस्तू या “शुभ” मध्ये घातल्या तर “अशुभ” मध्ये कावळा, काळा व लाल रंग, गाढव, माणूस घसरून पडणे यांना स्थान दिले. येथे कोणीही “वाईट स्वप्न” कोणते? हे सांगितले नाही. स्वप्न वाईट का स्वप्नाचा परिणाम वाईट या बद्दल विश्लेषण नाही. सर्व साधारणतः स्वप्नात काही वाईट घटना/कृत्ये दिसली की ती “दुःस्वप्न” या सदरात टाकायची व त्याचा “इलाज” सांगितलेल्या पद्धतीने करायचा एवढे आपण आजपर्यंत बघत आलो. आपली चूक आपणास कधी कळलीच नाही. उदाहरणार्थ, समजा एक तरुणास, त्याची आई हयात नसताना, मातृसंभोग घडला तर तो माणूस निःसंशय घाबरून जाईल. आपणास पडलेले स्वप्न निसंशय दुःस्वप्न आहे असे गृहीत धरून तो ब्राम्हणांकडे जाईल. ब्राह्मण ज्याला या स्वप्नाचा अर्थच काढता येत नाही तो या स्वप्नास दुःस्वप्नच म्हणेल आणि वरीलप्रमाणे इलाज सांगून १०१ रुपये दक्षिणा, भोजन खर्च अधिक साडी चोळी बांगड्या असा कर आकारणार आणि स्वप्नाचे दुष्ट्फल नष्ट करण्याचे वचन देऊन तुम्हास तुष्ट करून स्वतः पुष्ट होणार यात वादच नाही. आता येथे या स्वप्नाचे विश्लेषण केले तर वास्तवतेत तशी घटना घडणे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे हे स्वप्न जसे पडले तसे घडले या सदरात मोडणारे नाही. वास्तवतेत काहीच घडलेले नसल्यामुळे हे स्वप्न प्रत्याघातीही नाही. म्हणून हे स्वप्न अत्यंत सूचक असून अत्यंत “शुभ” आहे हे जाणकारच जाणतात. अशी स्वप्ने पडतात हे मी स्वप्न क्रमांक ६त स्पष्ट केले आहे. असे स्वप्न मला एका डॉक्टरांनी माझी परीक्षा घेण्याकरता एका विध्यार्थ्यास विध्यार्थी दशेत पडले असल्याचे सांगितले होते. मी त्याचा अर्थ सांगून हा विद्यार्थी “डॉक्टरच” होणार असे सांगताच त्यांनी त्यांनाच विद्यार्थीदशेत असे स्वप्न पडल्याचे कबूल केले.

स्वप्ने पाडून घेण्याचा मार्ग

“स्वप्न भविष्य” या पुस्तकात सूचक स्वप्ने पाडून घेण्याचा मार्ग सांगितला आहे तो असा :-

“पहिला मार्ग म्हणजे चैतन्य विद्युत(प्राणज्योत) वाढवीत जाणे व जड विद्युत कमी करणे होय. हा मार्ग फार कष्टाचा आहे. या मार्गाने जाणारी माणसे फारशी चमत्काराच्या मागे लागत नसतात. (?) दुसरा मार्ग थोडक्यात साधणारा व क्षणभर चमत्कार दाखविणारा असा आहे.

उदाहरणार्थ :- उपवास कडकडीत केल्याने व अन्न कमी खावून झोपल्यावर सूचक स्वप्ने पडतात.”

पहिला मार्ग वाचताना चुकल्यासारखा वाटतो हे कबूल न करता तो ‘कष्टाचा’ या गोंडस शब्दाखाली दाबला गेला. राहता राहिला दुसरा मार्ग. “स्वप्ने हि माणसास स्वेच्छेने कधीच पडत नसतात.” हा निसर्गाचा अलिखित नियम मान्य केल्यावर स्वप्ने पाडून घेता येतात हे विधान बरोबर होऊच शकत नाही. सर्वसामान्य माणूस स्वानुभवाने एवढेच सांगू शकेल की, जेवण जास्त झाल्यास पडलेली स्वप्ने हि सुसंबद्ध तर नसतातच पण काही तरी लक्षात ठेवण्यासारखे असते असेही नसते. नशापाणी(दारू, गांजा वैगरे) करून झोपल्यास स्वप्न जलद चित्रपटासारखी पडतात. त्यातील दृश्यांची गती वाढलेली असते. तर कडकडीत उपास करून (किंवा घडल्यामुळे) जे स्वप्न पडेल ते नितळ स्वच्छ असेल. हे अनुभवांती खरं जरी असलं तरी यामुळे स्वप्न “सूचक”च पडेल हे संभवनीय नाही. या उलट निसर्गाला स्वप्नामार्फत सूचना द्यावयाची असल्यास तो तुम्ही वरील तीनही स्थितींपैकी कोणत्याही स्थितीत असल्यास दिल्याशिवाय राहणार नाही. मी मुंबईला दोघा मित्रांबरोबर राहत असे. एक वेळ एक जन पिऊन रात्री दोनला घरी आला. रस्त्यात पडत झडत आल्यामुळे हातपाय खरचटले होते. तोंडावर पडल्यामुळे रक्त येत होते. घरी येताच त्याला स्वच्छ करून झोपवले. अशा स्थितीतही त्याला स्वप्न पडले. त्यानी मला सकाळी स्वप्न सांगितले. मी सूचक भागाचा अर्थ सांगून ३ वर्षात उन्नती होईल असे सांगितले. आज तो मित्र क्लास वन ऑफिसर आहे. थोडक्यात म्हणजे स्वप्ने पाडून घेता येतात ही कल्पनाच चुकीची आहे. असे जर असते तर ज्यांच्या घरी चूल पेटत नाही त्यांना हवी ती स्वप्ने पाडून घेता आली असती व सर्वजण मग चुलीत घालता आले असते, पण असे होणे निसर्गास मान्य नाही.

स्वप्न्फल आणि विश्वास

बऱ्याच लोकांनी स्वप्न्फलावर विश्वास कसा ठेवावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. विश्वास ठेवणे न ठेवणे ही त्या त्या व्यक्तीच्या बौद्धिक पातळीवरील गोष्ट आहे. विज्ञानाने प्रस्थापित झालेले परिणाम यावर विश्वास ठेवा असे सांगावे लागत नाही. तसेच निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवा असेही सांगावे लागत नाही. पिकलेल पान आणि फळ खाली पडणारच यावर विश्वास ठेवा हे सांगायची गरज नसते. याच्या प्रचाराकरिता कोणत्याही “महासंघा” ची स्थापना करण्याची आवश्यकता नाही. मनुष्य मरतो यावर विश्वास ठेवा असे “मानव कल्याण मंडळा” ला सांगत फिरावे लागत नाही. मी अगोदर मरेन आण मगच तुम्हाला सांगेन, अशा माणसास तुम्ही कोणत्या श्रेणीत टाकावे ते तुम्हीच ठरवा.

स्वप्न्फल हे निश्चित कसे झाले असा एक प्रश्न विचारण्यात येतो. स्वप्न्फल हे कोणा एका व्यक्तीने सांगितले असेही नव्हे. स्वप्नाच्या परिणामाचा शोध घेण्याचा चाळा माणसास लागल्यापासून माणसाने स्वतःस तसेच इतरांस पडलेल्या स्वप्नाचे परिणाम तपासले आणि ढोबळ मानाने स्वप्न्फल फक्त “शुभ आणि अशुभ” एवढ्यातच राहिले. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, स्वप्नात दिसलेल्या वस्तूवरून, त्याच्या संगावरून हि फले प्रस्थापित केली. मानवी मनाच्या तालाचा ठाव न घेता फक्त काही वस्तूंच्या दिसण्यावरून, तिच्या रंगावरून हे ठरवले. खोलात फक्त एकच माणूस गेला आण तो म्हणजे सिग्मंड फ्राईड.(पुढील भागात यांचा सिद्धांत थोडक्यात सांगितला आहे.)

विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा, डोळस श्रद्धा, हे सारे प्रकार म्हणजे शब्दांनी व्यर्थ पखरण आहे. मूळ ज्ञान आहे. ज्ञानाचा लोप म्हणजेच अज्ञान. दोन्ही एकत्रित राहू शकत नाहीत. अंधाराचा लोप म्हणजे उजेड आणि प्रकाशाचा लोप म्हणजे अंधार. अंधार आणि उजेड हे दोन्ही कधीही एकत्रित राहू शकत नाहीत, परंतु आम्ही शब्द भिन्न भिन्न प्रकारे वापरून मूळ स्वरूपाचे झकास वाटोळे करतो. विज्ञानात किंवा निसर्गाच्या नियमात अतिशयोक्ती अलंकार चालत नाही; इतकेच नव्हे तर यामुळे त्याच्यात फोलपणा येऊन नुसती “पोल” शिल्लक राहते. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास खालीलप्रमाणे देता येईल. योग्याभ्यासी मंडळी नेहमी एक गंमतीदार वाक्य वापरतात. ते म्हणजे “प्राणायामाने आयुष्य वाढते.” हे वाक्य वाचायला, ऐकायला मोठे गोड वाटते; पण यातील तथ्य आणि सत्य पाहिले तर हाती भोपळाच पडेल. कारण आयुष्य केव्हा संपणार हे निश्चित नाही तर ते वाढले आणि वाढते ते केव्हा आणि कोठून? उत्तर नाही. मग ठेवा विश्वास. मग असा बेंगरूळपणे विश्वास ठेवला की, श्रद्धा, शुद्ध श्रद्धा, डोळस श्रद्धा हि मालिका चित्रपटासारखी सुरु होते. या मालिकेचे पुलं.च्या भाषेत वर्णन करावयाचे ठरवले तर ते असे करता येईल.

  • पुणे हे शहर विद्वानांनी भरले आहे – विश्वास
  • विद्वान पुण्यात जन्माला येतात – अति विश्वास
  • पुण्याव्यतिरिक्त विद्वा नाही – श्रद्धा
  • मराठवाडा व विदर्भात विद्वान नाहीतच – अति श्रद्धा
  • अहो! पुण्यातील गाढवसुद्धा विद्वान की हो! – डोळस श्रद्धा

आहे का नाही अलंकार वापरून निर्माण केलेली गमंत?

मृत्युंजयाचा जप

या जपाबद्दल सांगतात की, जो कोणी याचा जप करील तो अमर होईल.(मनुष्य प्राणी मर्त्य आहे हे विसरून चाललेला हा विसरभोळेपणाचा खेळ). आता ज्यांनी हा मंत्र तयार केला तो तर केव्हाच मरून गेला, मग आम्ही “अमर” कसे होऊ? कोणी सांगितले तर आपण ऐकू एवढेच.

सत्य-सत्य-सत्य

हा एक असाच खुळखुळा आहे. लहान मुले याच्याकडे आणि त्याच्या आवाजाकडे आकर्षित होतात. खरे पाहिले तर सत्य आणि सत्याचा शोध फक्त वैज्ञानिक लावतात. इतर फक्त टाळ्या व झिंदाबादाचे धनी. साहित्यिकांनी या सत्यावर “असत्याची” इतकी पुटे चढवली आहेत की, ती खरडून काढली तरी शिल्लक राहणारच. मराठीत “खरे” आणि “सत्य” हे दोन शब्द स्वतंत्र अर्थाचे आणि ध्वनीचे असताना देखील साहित्यिकांनी याची उलटसुलट घालेमेल करून “सत्य” याचे खरोखर खोबरे करून टाकले. या बाबतीत मी एक तिखट आठवण सांगतो.

मी मुंबईला ज्या मित्राकडे राहत होतो त्याचा एक मामेभाऊ एक वेळ मुंबईस आला. मी, श्री. कांबळे व आमचा मित्र असे आम्ही तिघेजण एका जागेत राहत होतो. आमच्या मित्रास औरंगाबादला बदली पाहिजे होती, पण ती होत नव्हती. त्यामुळे तो काळजीत असायचा. त्याचे मामेभाऊ सकाळी पावणे नऊ वाजता शौच्यास जावून आले. पाय टॉवेलनी पुसत म्हणाले, “काका तुम्ही कसल्यातरी काळजीत आहात.” त्यावर माझा मित्र म्हणाला “अरे, माझी मुलंबाळ औरंगाबादला असतात. मला औरंगाबादला बदली पाहिजे पण ती काही होत नाहीये. काय करावं ते समजत नाही.” त्यावर त्यांचा मामेभाऊ म्हणाला, “मी तुला एक तोडगा सांगतो. त्यावर तु अंमल केलास तर तुझी बदली आठ दिवसांत औरंगाबादला झालीच म्हणून समज. बघ आहे का तयारी?”

असे म्हणून तो आम्हा सर्वांकडे बघू लागला. आमच्या मित्रासही आपला मामेभाऊ हा “पहोचे हुवा” आदमी वाटला आणि त्या दृष्टीने त्यांनी आमच्याकडे पहिले. आम्हाला अर्थात तोडग्याचे औत्सुक्य होतेच. माझा मित्र म्हणाला, “अरे, तू म्हणशील ते करायला मी तैय्यार आहे. बोल, काय करू?” यावर ते विद्वान मामेभाऊ म्हणाले, “तू फक्त आठ दिवस सत्य बोलायचं. खोटं बोलायचं नाही. आठ दिवसात काम झालंच म्हणून समज. नववा दिवस लागणार नाही.

आम्ही थक्क झालो. यावर त्यांनी आम्हाला विचारले, “तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का?” यावर मात्र मला मिस्किलपणा करायची लहर आली अन् मी म्हणालो, “पाहुणे, तुम्ही आठ दिवस सत्य बोलायला सांगितलं पण सत्य म्हणजे काय ते सांगितलं नाही.” त्यावर ते म्हणाले “सत्य म्हणजे सत्य. खोटं नाही ते सत्य. समजलं?” मग मी त्यांना म्हणालो, “आम्हा दोघांना म्हणजे श्री. कांबळे आणि मला पण बदली पाहिजे आहे. आम्ही आजपासून तुमच्या तोडग्याप्रमाणे बोलावयास सुतुवत केली. आम्हा दोघास जर आमच्या मित्रांनी, म्हणजे तुमच्या काकांनी, विचारले की, ‘माझा मामेभाऊ तुम्हास कसा वाटला?’ यावर श्री. कांबळे म्हणतील, ‘मला तर शहाणा वाटला.’ मी म्हणेन मला तर ‘शुद्ध मूर्ख’ वाटला. आता सांगा पाव्हणे की आमच्यापैकी ‘सत्य’ कोण बोलले? अन् काम कोणाचे होणार?” पाव्हणे परत संडासात गेले ते आम्ही ऑफिसला गेल्याची खात्री झाल्यावरच बाहेर आले.

Swapnanchi-Duniya-3

माणूस हा तसा आपआपल्यापरि श्रद्धाळू आहे. तो आपली स्वश्रद्धा हीच तेवढी खरी समजतो व इतरांची श्रद्धा हि अंधश्रद्धा असून उपहासाची समजतो. फार जुन्या काळाची एक घटना कोणातरी कीर्तनकारांनी सांगितलेली आठवते.. मुसलमानी राजवटीचा नंगा नाच चालू होता. बळी तो कानपिळी हा नियम. मुसलमान ब्राह्मणाला कधी ब्राह्मण म्हणत नसत. तर नेहमी बम्मन-बम्ण्या असे संबोधित असत. तर खवचट ब्राह्मण त्यांना हजरत-लांडे- असे संबोधित. एक वेळ एक तरुण ब्राह्मण आपल्या वडिलांचे श्राद्ध करावयास गावच्या नदीकाठी बसला. भाताचे मोठाले पिंड तयार केले. आता विधी सुरु करणार इतक्यात एक तरुण मुसलमान नदीजवळच्या आपल्या वडिलांच्या कबरीजवळ फुलं व ऊदबत्ती लावण्याकरता जात असतानाच त्या ब्राह्मणास म्हणाला, “अरे बम्ण्या, तेरा बाप यह भात खाने को कब आयेगा रे?” ब्राह्मणाचे कारटेही काही कमी नव्हते. ते म्हणाले, “अबे हजरत, क्यू परेशान होता है| तेरा बाप ऊदबत्ती और फूल की खुशबू लेणे को जब कबरमेंसे बाहेर आयेगा तब मेरा बाप भात खानेकु आयेगा. अगर नही आया तो मै यह भात तेरे बाप को खिलाउंगा.”

अशा आहेत या अंधश्रद्धा-श्रद्धा यांच्या अंधारातील गंमती आणि गंमतीदार लढाया आणि वर त्यांच्या बढाया.


5 Comments

स्वप्न विश्लेषण कशे करावे?