background

मनोगत

मी १९४२ साली मोमिनाबादेस (आताचे आंबेजोगाई) ९व्या वर्गात प्रवेश घेतला. शाळा राष्ट्रीय. मराठी शिकवणारे शिक्षक होते, श्री. एस. आर. गुरुजी (देशपांडे). हे लुंगी नेसत असत. प्रवेश मिळताच एकदा त्यांनी आम्हा बाहेरून आलेल्या (अंबेजोगाई गावाव्यतिरिक्त) विध्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे राहण्यास सांगितले. ज्याला मराठी विषय घ्यावयाचा आहे त्याने “मी मराठी भाषेतील कमीत कमी रोज पन्नास पाने वाचल्याशिवाय झोपणार नाही” अशी शपथ घेतली तरच वर्गात बसता येईल, नाही तर नाही असे शपथपूर्वक कबूल करून घेतले. याचा एक फायदा असा झाला की वाचनाचा छंदच लागला.

१९४३ ला मेट्रिकच्या परीक्षेला बसणार होतो. परीक्षेला सहा महिने राहिले होते. त्यावेळी एक गमतीदार स्वप्न पडले, ते अजून आठवते. स्वप्नात एक प्रेतयात्रा चालली होती. त्यात मी सामील झालो. थोड्या दूरवर जात असतानाच ते चौघांच्या खांद्यावरील प्रेत लांबतच चालले. म्हणजे तिरडीच लांब होऊ लागली. खांदा देणाऱ्यानी “भूत भूत” म्हणून ओरडावयास सुरुवात केली आणि प्रेत खाली ठेवले. त्या चौघांबरोबर सर्वजण पळाले. मी मात्र एकटाच उभा राहिलो. तेवढ्यात ते प्रेत मला म्हणाले, “मला तीर्थावर अग्नी दे. कल्याण होईल.” ते प्रेत मी एकट्याने खांद्यावर पाण्याची कावड घेतात तसे उचलले आणि तीर्थावर आणले. खाली ठेवताच ते पहिल्यासारखे लहान झाले. मी अग्नी दिला. ज्वाला भडकू लागल्या. मी देवीच्या देवळाजवळील बारवेत स्नानाकरिता उतरलो तर तेथे माझी आई कपाळावर भव्य कुंकू असलेली दिसली आणि मला जाग आली.

विध्यार्थीदशा असल्यामुळे मला फक्त आपण पास होणार एवढेच वाटले. पण असे का ते समजले नाही.

पुढे नौकरी निमित्त मी परभणीस आलो. १९५८ साली प्रथम रेल्वे तांबडा उजेड फेकीत वरून खाली उतरत गेली. पुढे पुढे या रेल्वेने पिच्छा पुरवला. मी नंतर बी. ए. करण्याकरता औरंगाबादला बदली करून घेतली. रेल्वे वरचेवर स्वप्नात यायची. कोळशाचा धूर ओकीत जाणारे इंजिन वैगरे आणि या स्वप्नांनी संकटाची पूर्वसूचना दिली. माझ्या १२ वर्षाच्या मुलीची दृष्टी हळूहळू कमी होत गेली. १९६२ च्या नोव्हेंबरला मी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मुंबईस घेऊन गेलो. तेथे माझे बालमित्र श्री. लक्ष्मणराव गोगटे गे जे. जे. हॉस्पिटलचे R.M.O. होते. त्यांनी खूप मदत केली. चार दिवसात ऑपरेशन करावयाचे ठरले. ब्रेनट्युमर होता. ऑपरेशन यशस्वी झाले. परंतु ट्युमरचा प्रकार कॅन्सरचाच होता. श्री. गोगटे यांनी मुंबईहून निघते वेळी एकांतात बसून माझ्या हळव्या मनाला जपून पुढील सर्व गोष्टींची कल्पना दिली. थोडक्यात म्हणजे त्यांनी मुलीला अल्प आयुष्य आहे एवढेच सांगितले. गेलेली दृष्टी परत येणार नाही हे पण सांगितले. मुलीला अंधांच्या शाळेत घालावे म्हणून मी नागपूरला बदली मागून घेतली. १९६६ ला अती हाल होऊन मुलगी वारली.

त्याच काळात मी श्री. ज. ना. ढग्यांची पुस्तके वाचली. तशातच डॉ. सिगमंड फ्राइड पण वाचला. इतपावेतो मी माझ्याच स्वप्नाचे अर्थ स्वतःपुरते काढीत होतो. जी प्रतीके परंपरागत चालत आलेली आहेत त्यांचेच ते अर्थ तंतोतंत जुळू लागले. फ्राइड यांचे मनोविश्लेषण खूपच मौल्यवान वाटले. त्यांचे या बाबतीतले सिद्धांत डावलता येईना. पण का कोण जाणे “स्वप्नांचे अर्थ” मला खटकू लागले. मी सतत चिंतन करत असे, आणि एक दिवस सोपी किल्लीच सापडली. मी माझ्या स्वप्नातून पूर्वी स्मृतीत असलेल्या सर्व गोष्टी वजाच केल्या आणि बघितले तर काही भाग शिल्लकच. मी तेच शिल्लक भाग तपासले. तर ते प्रतीकात मोडले. त्याचा अर्थ पहिला आणि अनुभव घेतला. हा सराव अत्यंत यशस्वी झाला. मग मी लोकांच्या स्वप्नाचे याचप्रमाणे विश्लेषण करू लागलो आणि आश्चर्याची गोष्ट स्वप्नफळ शंभर टक्क्यावर गेले.

निवृत्त झाल्यावर सहा वर्षांनी मी स्वप्नावर लेख लिहिला. तो नागपूर पत्रिकेत छापून आला. माझा तो पहिलाच लेख. खूप आनंद झाला. नंतर मी श्री. दिनकर देशपांडे यांना भेटलो. त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. “”जेवढे लिहायचे असेल तेवढे लिहा. आम्ही आहोत” या वाक्यामुळे मी पुढे लिहित गेलो. मालिका संपली. मी आता स्वप्नावर पुस्तकच लिहिण्याचा विचार करू लागलो. एके दिवशी मी सर्व छापील लेख घेऊन आदरणीय प्राध्यापक श्री. अ. ना. देशपांडे यांच्याकडे गेलो. त्यांना सर्व लेख वाचून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. दहा दिवसांनी भीतभीतच त्यांच्याकडे गेलो. त्यांना सर्व लेख खूप आवडले. त्यांनी मार्गदर्शन केले आणि मी हे पुस्तक पूर्ण केले. आदरणीय श्री. अ. ना. देशपांडे यांनी प्रस्तावना दिली. त्यांनी मला वाचून दाखविली. मी गदगदून गेलो. कारण तो माझ्या आयुष्यातील जन्मसाफ्ल्याचा दिवस होता.

ऋणनिर्देश :- नागपूर पत्रिकेचे श्री. दिनकर देशपांडे यांचे प्रोत्साहन, प्रा. श्री. प्रभू ठाकरे यांचे संदर्भ ग्रंथांकरता लाभलेले सहाय्य आणि मार्गदर्शनपर सूचना आणि आदरणीय डॉ. अ. ना. देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे जर मिळाले नसते तर स्वप्न साकार झालेच नसते. प्रकाशनाबाबतच्या सहकार्याबद्दल सौ. शैलजा काळे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. माझे हस्तालिखित संस्कारित करून ते मुद्रित करण्याचे कार्य श्रीनिवास मुद्रणालयाचे श्री. श्यामकांत बनहट्टी यांनी केले. त्यांचा मी आभारी आहे.

सर्वांचा ऋणी –

वा. रा. डोईफोडे