background

सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल

या भागात स्वप्न विश्लेषण पद्धतीप्रमाणे स्वप्न्फल सांगितले आहे. ते किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होईलच. ती स्वप्ने इंग्रजी किवा इतर भाषेतील भाषांतर नव्हते तर मला पडलेली स्वप्ने आणि इतरांनी मला सांगितलेली स्वप्ने आहेत. नावानिशी मी करता येईल तेवढा उल्लेख केला आहे. यातील सर्व व्यक्ति आज हयात आहेत.

स्वप्न क्रमांक १ 

माझे मित्र श्री. खन्ना हे माझ्या बरोबरच विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. त्यांची बदली गोंदियाला झाली. ते तेथे रुजू झाले. चार एक महिन्यांनी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी बघतोय की श्री. खन्ना हे काळी शेरवानी, चुडीदार पैजामा व डोक्यावर एक अत्यंत घाणेरडी टोपी घालून आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेऊन चालले आहेत. मी त्यांना म्हणतो; ‘खन्नासाहेब, चांगल्या कपड्यांवर निदान चांगली टोपी तरी घालायची.’ इतक्यात मला जाग आली. समोर घड्याळात बघितले तर पाच वाजले होते. माझी झोप सहा तासाची आहे. मी अकराला झोपतो व पाचला उठतो. स्वप्न संपले व जाग आली त्यावेळी पाच वाजले होते. म्हणजे स्वप्नाचा परिणाम चोवीस तास ते तीस दिवसाच्या आतला. योगायोगाने श्री. खन्ना त्याच दिवशी नागपूरला आले. मी त्यांना म्हणालो, ‘खन्नासाहेब, आज सकाळीच मला स्वप्न पडलं. तुम्ही स्वप्नात अत्यंत घाणेरडी टोपी डोक्यावर घातलेली. यावरून मी सांगतो की तुमची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून लवकरच होईल.’ यावर श्री. खन्ना म्हणाले, ‘डोईफोडे, मी परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, तेथे स्वप्नावर तरी विश्वास ठेवणार का? मी तर राजीनामा देण्याकरता आलेलो. परंतु साहेबांनी मला एक महिन्यानी देण्यास सांगितले आहे म्हणून परत चाललो आहे.’ चहा फराळ झाला आणि श्री. खन्ना रात्रीच्या गाडीने गोंदियाला रवाना झाले. दुसरे दिवशीच नागपूरच्या त्यांच्या मित्राला श्री. खन्नाची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याची तार मुंबईहून आली. सुदैवाने त्यांना विक्रीकर अधिकारी म्हणून नागपुरच मिळालं. श्री. खन्ना हे आज डेप्युटी कमिशनर म्हणून काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण कसे केले ते सांगतो. श्री. खन्ना यांनी दोन मित्रांच्या खांद्यावर हात ठेवले होते. हे दोघेही वास्तव्तेतील त्यांचे मित्र म्हणून सूचक नव्हते. श्री. खन्ना हे कधीच टोपी घालीत नाहीत. परंतु स्वप्नात त्यांच्या डोक्यावर अत्यंत घाणेरडी टोपी होती. वास्तवतेत टोपी कुठेच नव्हती त्यामुळे तिचे स्वरूप प्रत्याघाती नव्हते म्हणून तेवढीच ‘घाणेरडी टोपी’ या स्वप्नाचा सूचक भाग. घाणेरडी टोपी डोक्यावर असणे याचा अर्थ सतत प्रगती-उत्कर्ष असा आहे. श्री. खन्ना यांची प्रगती-उत्कर्ष कसा झाला ते पहा. अगोदर विक्रीकर निरीक्षक , नंतर विक्रीकर अधिकारी, नंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि आज आहेत विक्रीकर उपयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई!

स्वप्न क्रमांक २

मी मुंबईला होतो. कार्यालयातील बऱ्याच जणांना मी स्वप्नाचे अर्थ सांगतो याची माहिती होती. माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगी होती. तिचे लग्न होऊन सहा महिने झाले होते. तिला एक स्वप्न पडले. तिने आपल्या मनात ते स्वप्न वाईट असल्याचा धसका घेतला. सकाळपासून मी कामात असल्यामुळे ती माझ्याशी बोलूच शकली नाही. शेवटी चार वाजता मी सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडलो. त्या वेळी तिने मला गाठून थांबवले. ‘माझ्या स्वप्नाचा जो अर्थ असेल ते सांगा. मी माझ्या मनाची तयारी केली आहे.’ अत्यंत विमनस्क मनःस्थितीत ती बोलत होती. मी तिला म्हणालो, ‘अगोदर शांत हो. निसं:कोचपणे स्वप्न सांग. मी निश्चितच अर्थ सांगेन.’ त्यावर ती म्हणाली, ‘मी माझ्या स्वप्नात लग्नातला शालू काढायला गेले तर पेटीतून उंदीर पळाला. शालू बघते तर त्याला मोठं छिद्र उंदरांनी कुरतडून केलेलं.’

मी तिला म्हणालो, ‘काहीही घाबरण्यासारखं नाही. पण आता साडेचार होतात. उद्या सायंकाळचे साडेचार पर्यंत तुझी मनःस्थिती पार ढासळून जाईल. भांडणे व कटकटी खूप. नंतर सर्व ठीक होईल.’ ‘बस एवढच’ म्हणून ती आपल्या जागेवर बसली.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती ऑफिसमध्ये आली. झोप नसल्यामुळे तिचे डोळे सुजलेले दिसत होते. मी काहीच न बोलता कामास लागलो. बरोबर, तीन वाजता तिची आणि हेडक्लार्कची अशी जुंपली की साहेबांना केबिनमधून बाहेर येऊन मध्ये पडावे लागले. मी मात्र तिच्याकडे न पाहताच काम करीत राहिलो.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती म्हणाली, ‘काका, कालचा दिवस विसरणे शक्य नाही. परवा घरी गेल्यापासून सर्वांशी भांडणं झाली. राहिलं साहिलं ते काळ हेडक्लार्कशी झालं. आता तर काही नाही ना?’ मी शांतपणे म्हणालो, ‘बाळ, हा तुझ्या स्वप्नात आलेल्या उंदराचा परिणाम बरं.’

या पूर्ण स्वप्नाचे विश्लेषण असे केले – या पूर्ण स्वप्नात कोठेही प्रत्याघाती स्वप्रूप नाही. शालू म्हणजे उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र. छिद्र अन् तेही कुरतडून म्हणजे जवळच्या नातेवाईकांशी बेबनाव होऊन असलेले संबंध तुटणे. शिवाय पेटीतून बाहेर पडताना उंदीर दिसणे म्हणजे मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडण्याची सुचना.

स्वप्न क्रमांक ३ –

माझ्या बरोबर श्री. निराळे हे विक्रीकर निरीक्षक म्हणून नागपूरला काम करीत होते. श्री. निराळे हे एम. ए., एम. कॉम., एलएल.बी. असून देखील विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. याचं आम्हाला फारच आश्चर्य वाटायचं. एकदा त्यांनी स्वप्न सांगितलं. स्वप्नात ते कारनी प्रवास जरित होते. दुसरी एक कार पाठीमागून येऊन पुढे गेली. याचा अर्थ काय? श्री. निराळे हे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. तसेच एम.पी.एस.सी. च्या पण. मी त्यांना ताबडतोब म्हणालो, ‘निराळे, तुम्ही एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत पास होऊन विक्रीकर अधिकारी व्हाल परंतु यु.पी.एस.से. चे काही खरे नाही. अवघ्या तीन दिवसांनी त्यांची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याचे पत्र आले. आज श्री. निराळे, असिस्टंट कमिश्नर म्हणून मुंबईस काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण असे – स्वतः मोटार चालवणे व ती सुरळीत हे प्रगती आणि सुरळीत आयुष्य जाण्याचे द्योतक आहे. श्री. निराळे हे एम.पी.एस.सी. तसेच यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. म्हणून एम.पी.एस.सी.तील निवड निश्चित होती. स्वतः कार वापरीत किंवा चालवीत नसत म्हणून प्रत्याघाती स्वरूप कोठेच नाही. सबब कारमधून जाणे हाच भाग सूचक.

स्वप्न क्रमांक ४ –

मी मुंबईला ज्या मित्राकडे राहत असे त्याचं दुमजली घर औरंगाबादला होतं. स्वप्नाच्या गप्पा चालत असत. एकदा त्याला एक स्वप्न पडलं. त्यात त्याचे बत्तीस दात पडलेले दिसले. त्याला ताबडतोब जाग आली. त्याने दिवा लावला. दात खरंच पडले की काय हे तोंड दाबून पाहिले. त्याला बराच घाम आला होता. सकाळी त्याने मला स्वप्न सांगितले. मी गंभीर होऊन गप्पच बसलो. तो खनपटीलाच बसला. मग मी गंभीर होऊन सांगितले की तुझे औरंगाबादचे घर विकावे लागेल किंवा त्यात तुला राहता येणार नाही. याचा काळ मी तीन महिन्यांचा दिला होता. त्याने माझ्या माघारी मला खूप शिव्या दिल्या. ब्राम्हण जातीचा नेहमीच्या सर्व जाती करतात तसा उद्धार पण केला.

तो दिवाळीकरता औरंगाबादला एक महिन्याची रजा घेऊन गेला. परत आला तर अगदी सुन्न होऊनच. मी सकाळी काही बोललोच नाही. मूड नसेल म्हणून ऑफिसला निघालो. सायंकाळी तो माझ्या अगोदरच घरी आला. आता तो ताजातवाना झाला होता. मी घरी येताच त्याने सांगितले की ऐन दिवाळीत मुला-मुलांची भांडणे झाली अन् मी मध्ये पडलो. एवढंच निमित्त झालं आणि सर्व बिरादरानी काठ्यांनी मारावयास सुरुवात केली. माझी बायको मध्ये पडली तर तिच्यावरही काठी बरसली. पोलीस केस केली. मन उद्विग्न झालं. घर विकून आलो. सर्व पैसे वडिलांनी घेतले. आता मजजवळ फक्त दोन रुपये आहेत. एकूण मी सांगितलं, त्याप्रमाणे त्याचं घर त्याला विकावं लागलंच.

विश्लेषण :- प्रत्याघाती स्वरूप नाही. दात पडणे एवढेच सूचक. याचा अर्थ स्थावर मालमत्ता नष्ट होणे, आर्थिक नुकसान आणि अत्यंत कटकटी.

स्वप्न क्रमांक ५ –

मी एम. ए. ला बसलो होतो. मजजवळ एकही पुस्तक नव्हतं. तशात एकाची ओळख झाली. तो एम.ए. चा नियमित विद्यार्थी होता. परिचय झाला आणि आमची रोजची सायंकाळची बैठक व्हायची. स्वप्नाचा विषय निघाला आणि मी त्याला स्वप्न लक्षात कसं ठेवायचं, त्याची वेळ कशी काढायची वैगरे सर्व समजावून सांगितले. सर्व लक्षात ठेऊन पडलेली स्वप्नं तो लिहून ठेवी. सायंकाळी सांगत असे. दिवाळीच्या सुटीत तो गावी गेला. त्याला एक मुलगी सांगून आली. मुलगी पसंत पडली. त्यांनी होकार पण कळवला. आता साखरपुडा ठरवायचा होता. तो नंतर ठरवू म्हणून तो नागपूरला आला. आठ दिवसांनी त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याच्या गावची त्याची मैत्रीण(जी वारली होती) आली. चेहरा अत्यंत मलूल होता. काहीही न बोलता खाली मान घालून निघून गेली. त्याने सर्व स्वप्न सांगितले. मी गंभीरपणे त्याला म्हणालो, ‘राग येत नसेल तर स्पष्ट सांगतो. तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी तुमचं लग्न होणार नाही.’ यावर तो खूप हसून म्हणाला, ‘तुम्ही काढलेल्या स्वप्नाचा अर्थ अगदी चुक आहे. आठ-दहा दिवसात साखरपुडा ठरेल. तसे पत्र येईलच. तुम्हाला घेऊनच जाईनच.’ आठ-दहा दिवस तर गेलेच. पण पत्र नाही. यांनी पत्र पाठवली परंतु उत्तरच नाही. तीन महिन्यांनी पत्र आलं. मुलाला मंगळ असल्यामुळे मुलीकडील माणसांनी मुलगी देण्याचे रद्द केले आहे. आता मात्र माझा मित्र खूपच घाबरला. आता आपले लग्न होणे शक्य नाही इथपर्यंतचे त्याचे मत झाले. सोयरिकी येणे बंद झाले. कोणतीच हालचाल दिसेना. अशा मनःस्थितीत त्याला परत एक स्वप्न पडले. स्वप्नात तीच मैत्रीण(मृत) आली. चेहरा प्रसन्न होता. तुळशी वृन्दावनासमोरून काळी गाय गेली. त्याने स्वप्न सांगितले आणि मी कागद काढून नव्वद दिवसात तुमचे लग्न होईल असे लिहून दिले. परीक्षा होताच तो गावी गेला आणि एके दिवशी त्याच्या लग्नाची पत्रिका आली. स्वप्नाचा अर्थ सांगितल्यापासून लग्नाचा दिवस ८८वा येत होता.

विश्लेषण :- जी मैत्रीण स्वप्नात आली तिला अंतर्मनातून मित्राबद्दल आकर्षण होते. तिचा मलूल चेहरा आनंददायक घटना घडणार नाही हे दर्शवित होता. म्हणून पहिल्या स्वप्नात मुलगी पसंत करूनसुद्धा लग्नासारखी आनंदी घटना घडणार नाही हा अर्थ काढला.

दुसऱ्या स्वप्नात ‘प्रसन्न चेहरा, तुळशी वृंदावन – समोर काळी गाय जाणे’ हे सूचक होते. काळी गाय स्वप्नात येणे हे मंगलकार्य होणारच याचे चिन्ह आहे. म्हणून लग्न होणारच हे मी निश्चित मनाने सांगितले.

स्वप्न क्रमांक ६ –

जितकं स्वप्न घाणेरडं तितकं ते चांगलं असा अर्थ सर्वसाधारण नियम आहे. याचा एक नमुना. माझा एक मित्र. त्याला एका रात्री स्वप्नात मातृसंभोग घडला. त्यावेळी सकाळचे चार वाजले होते. मित्र पराकोटीचा घाबरला. त्याला डबडबून घाम आला होता. सकाळी पाच वाजता तो माझ्या घरी आला. स्वप्न सांगून त्यांनी वाटेल ते प्रायश्चित्त भोगायची तयारी असल्याचे सांगितले. मी त्याला म्हणालो, ‘प्रायश्चित्त आणि स्वप्नाचा कवडीचाही संबंध नाही. निसर्गाच्या सुचना पेढा बर्फीच्या प्रसादासारखे बदलत नसतात.’ असो. आता तुझ्या स्वप्नाबद्दल सांगतो. असं स्वप्न अत्यंत सूचक आणि शुभ असतं. तुझी केस कोर्टात चालू आहे. ती तु जिंकणारच. जर तु ही केस हरलास तर मी स्वप्नातही कोणाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार नाही. सहा महिन्यांनी सरकारनेच केस मागे घेऊन त्याला पूर्ण न्याय दिला. तो देखील विक्रीकर अधिकारी म्हणूनच निवृत्त झाला आहे.

विश्लेषण :- डॉ. फ़्राइद्च्य सिद्धांताप्रमाणे याचे विश्लेषण जर केलं तर “लैंगिक भूक” एवढ्यावरच याची बोळवण झाली असती. परंतु भारतीय तत्त्ववेत्त्याच्या अनुमानाने हे स्वप्न सर्वात शुभ मानले जाते. असे स्वप्न ज्यास पडते ती व्यक्ति जर संकटात असेल तर त्यातून मुक्त होतेच. तसेच व्यावसायिक-नोकर-विद्यार्थी आपआपल्या परीने प्रगतीकडे वाटचाल करून निश्चितच यशस्वी होतात. प्रत्याघाती स्वरूप नसल्यामुळे सर्व सूचक असे स्वप्न आहे.

स्वप्न क्रमांक ७ –

श्री. खन्ना हे विक्रीकर अधिकारी म्हणून नागपूरला आले होते. योगायोगाने मी त्यांच्या हाताखाली विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होतो. माझी प्रकृती बरीच ढासळली होती. सोमवारचा दिवस होता. रविवारी मला स्वप्न पडले होते. रेल्वेतून मी प्रवास करीत होतो. गाडी दुसऱ्या रुळावरून चालली होती. पहिले रूळ खूपच लांब दिसत होते.

Swapnanchi-Duniya-12

जाग येताच मी घड्याळ बघितले. बरोबर सकाळचे पाच वाजले होते. गाडीने रूळ बदलणे म्हणजे बदली-स्थलांतर-बदल. मी खूप घाबरून ऑफिसमध्ये गेलो. साडेअकरा वाजता श्री. खन्नानी मला बोलावून घेतले. प्रकृती सांभाळण्याबद्दल त्यांनी उपदेश केला. मी भारावून गेलो होतो. मी त्यांना माझी बदली खूप दूर होणार असे सांगताच ते म्हणाले, ‘डोईफोडे, एखादे स्वप्न खरे ठरले म्हणून सर्वच स्वप्ने खरी ठरत नसतात.’ त्यांनी चहा मागविला. मी चहा घेऊन जागेवर बसलो. साडेचार वाजता दुपारी परत श्री. खन्नांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावले. मी परत येताच ते म्हणाले, ‘अहो, खरोखरच तुमची बदली मुंबईला झाली आहे. ही बघा आताच्या डाकेत आलेली ऑर्डर.’ मी सुन्न होऊन गेलो. पण इलाज नव्हता. गोष्ट अटळ होती. हा होता रेल्वेनी रूळ बदलण्याचा परिणाम.

विश्लेषण :- स्वप्नात गाडीने रूळ बदललेले दिसले हाच भाग सूचक असल्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकताच नव्हती. रूळ बदलणे म्हणजे स्थानांतर हे निश्चित असल्यामुळेच मी माझ्या बद्लीबद्दल बोललो होतो.

स्वप्न क्रमांक ८ –

मी मुंबईला कामावर रुजू झालो. तेथील मित्राबरोबर त्याच्याच खोलीवर राहिलो. तेथे एक दुसरे मित्र श्री. कांबळे भेटले. आम्ही तिघे एकाच घरात राहत होतो. पुढे श्री. कांबळे यांना क्वार्टर मिळाले. ते तिकडे राहायला गेले. एकदा त्यांचे मेव्हणे जे डॉक्टर आहेत, ते त्यांच्याकडे आले. ओघाओघानी त्यांनी मी स्वप्नाचा अर्थ सांगतो वैगरे गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. त्यांचा स्वप्नावर विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व कांबळे माझ्या खोलीवर आले. डॉक्टरांनी आपण स्वप्नात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकत होतो, एवढेच सांगितले. मी डॉक्टरांना म्हणालो, “आज तुम्हाला थोडासा फटकारा बसेल हे निश्चित. आपण सायंकाळी भेटूच.” मी नंतर ऑफिसला गेलो. सायंकाळी घरी ७ वाजता आलो. साडेसातला डॉक्टर पण आले. आल्याबरोबर त्यांनी “डोईफोडे, मी साडेदहा रुपयात हा ट्रान्झिस्टर घेतून आलो आहे. हि रसीद बघा.” असे म्हणून त्यांनी रसीद मजजवळ दिली. रसीद रेल्वेच्या दंडाची होती. डॉक्टरांनी आपण व्ही.टी. स्टेशनवर मेनगेटने तिकीट काढण्याकरिता जात असतानाच त्यांना टी.टी.आय.नी ‘हा गुन्हा आहे, साडेदहा रुपये भरून रसीद घेतली व लोकलचे तिकीट काढून ते कॉटनग्रीनला परतले.

विश्लेषण :- यात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकणे हाच भाग सूचक आहे. याचा अर्थ फुटकळ फटका बसणे असा होतो. म्हणजे प्रकरण फक्त साडेदहा रुपयांवरच निभावले एवढेच.

स्वप्न क्रमांक ९ –

हेच डॉक्टर दुसरे दिवशी सकाळी माझ्या खोलीवर आले. माझी परीक्षा घेण्याचा त्यांचा हेतू होता. पण कालचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी त्यांना दोन महिन्यापूर्वी पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांचा मित्र आपल्या बायको बरोबर फिरावयास चालला होता. इतक्यात एक साप पाठीमागून येऊन त्या बाईच्या गळ्याला चावला. इतक्यात त्यांना जाग आली. वेळ त्यांच्या लक्षात नव्हती. मी थोडा वेळ विचार करीत बसलो. नंतर डॉक्टरांना सरळ विचारले, “डॉक्टरसाहेब, हे स्वप्न पडलं त्यावेळी तुमची मंडळी कोठे होती? माहेरी का सासरी?” डॉक्टरांनी त्यांची पत्नी त्यांच्या घरीच होती असे सांगताच मी सरळ सांगितलं, “मंडळीस दिवस असलेच पाहिजेत अन् असतील तर तुम्हास मुलगाच होणार.” डॉक्टरांनी मंडळी गरोदर असल्याची कबुली दिली. त्यांना मुलगाच झाला असे त्यांनी पत्राने नंतर कळवले.

विश्लेषण :- यात स्त्रीला साप चावतो हा एकच भाग सूचक आहे. सर्वसामान्यतः स्त्रीला साप चावल्यास व ती गरोदर असल्यास हमखास भारतीय स्वप्न्फलाप्रमाणे शंभर टक्के मुलगाच होतो. डॉक्टरांचा व माझा अल्प परिचय होता त्यामुळे मला त्यांना मंडळी गरोदर आहे का हे विचारावे लागले. कारण साप फक्त त्या स्त्रीस चावला होता.

स्वप्न क्रमांक १० –

माझ्या एका मित्राच्या मुलाला रेसचे घोडे पळताना दिसले. इतकेच नव्हे तर ज्या क्रमांकांनी ते आले होते ते सर्व क्रमांक दिसले. जाग येताच त्यांनी क्रमांकांनी आलेले घोडे लिहून ठेवले व आपल्या वडिलांस सांगितले. त्याचे वडील नेमके सिनेमाच्या नादात विसरून गेले. दुसरे दिवशी सकाळीच माझ्याकडे आले आणि मुलाचे स्वप्न आणि घोड्याचे क्रमांक सांगितले. सुदैवाने मजजवळ महाराष्ट्र टाईम्स होताच. मी त्यांना घोड्याच्या क्रमांकावरील भाव दाखविला. त्यावेळी ती रेस तनाला होती. भाव पाच रुपयास रुपये ३,३००/- निघाला होता. त्यांना उशिरा आल्याबद्दल फार पश्चाताप झाला. पण त्यांना नंतर मी ठासून सांगितले घोडा स्वप्नात इतक्या थोड्या रकमेकारिता आलेला नाही. तुमच्या मुलाचा उत्कर्षाचा काळ आला आहे. थोड्याच दिवसात त्यांच्या मुलाला एका कंपनीत नोकरी लागली. अनुभव येत गेला. तो दुसऱ्या कंपनीमध्ये गेला. आज त्याला बरोबर रुपये ३,३००/- पगार आहे.

विश्लेषण :- पहिली गोष्ट स्वप्नात घोडा येणे हे अत्यंत शुभ आहे. घोडा हा प्राणी यशाच्या मार्गावर गतीने जाणार याचे प्रतीक आहे. त्यातून रेसचे घोडे म्हणजे बोलायलाच नको. हे रेसचे घोडे ज्या क्रमांकांनी आले त्या क्रमांकांनी त्या मुलास दिसले. परंतु ते घोडे एका शुल्लक यशाकरता आलेले नव्हते. कारण तसं असतं तर त्याचे वडील रेसवर गेले असते. घोडा आयुष्याची रूपरेखा दाखवतो. अशांचे आयुष्य उत्कर्ष-यश यांनी भरभरून जातं. हे आज त्याच्याकडे बघितलं की पटतं.

स्वप्न क्रमांक ११ –

मी १९५८ साली इंटरच्या परीक्षेकरिता इंदोरला गेलो होतो. माझ्या बरोबर श्री. अरविंद भालेराव(सध्या ते परभणीस एका हायस्कूलचे सहशिक्षक आहेत) होते. एक महिना परीक्षेकरता राहून आम्ही परत परभणीस येऊन आपआपल्या नोकरीवर रुजू झालो. तीन महिन्यांनी निकाल लागत असे. मी हिंगोलीला फिरतीवर गेलो होतो. तेथील मित्रांनी इंटरच निकाल लागल्याचे सांगितले. इंदोरकडील कोणतेच वर्तमानपत्र इकडे येत नसल्याने तेथील हेडमास्तरांनाच(ज्यांच्या माफत आम्ही फॉर्म भरला होता) जबाबी तर करावयाची ठरवले. सकाळी सहाच्या गाडीने परभणीस जावयाचे होते. म्हणून वडिलांस लवकर उठ्वावयास सांगितले. त्या रात्री स्वप्नात श्री. अरविंद भालेराव मला म्हणत होता, “काका, तुम्ही पास झालात. ही बघा पास झाल्याची तर आली आहे.” असं म्हणून त्यांनी मला तार दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मी त्याला म्हणालो, “अरे तार काय दाखवतोयस. तार नापास झाल्याची सुद्धा येते.” त्यावर तो खो-खो हसत म्हणाला, “काका, तुम्ही फारच विनोदी आहात बुवा.” याच वेळी मला जाग आली. घड्याळात बरोबर पाच वाजले होते. नंतर मी वडिलास म्हणालो, “मी पासच झालो आहे. काळजी करू नका.” मी परभणीस येताच इंदोरला तर केली आणि दुसरेच दिवशी पास झाल्याचे उत्तर आले.

विश्लेषण :- परीक्षेस आम्ही दोघेही बसलो होतो. ही वास्तविकता. परंतु अरविंद मला तार दाखवून पास झाल्याचे सांगतो व तो हसतो आहे. येथे दुसऱ्यांनी पास झाल्याचे सांगणे हे सूचक असून दुसऱ्याच्या हसण्यामुळे आनंददायी घटना घडणारच म्हणून पासची खात्री. शिवाय स्वप्न, स्वप्नाच्या भाषेत, सकाळचेच आहे.

स्वप्न क्रमांक १२ –

माझे एक जिव्हाळ्याचे मित्र मुंबईस नोकरीस होते. त्यांची मुलंबाळ नागपूरलाच राहात होती. एक वेळ ते दोन महिन्याची रजा काढून आले. अधूनमधून त्यांचे आमचे घर व आमचे त्यांचे घरी जाने येणे असे. एक वेळ मी सात वाजता सकाळी फिरत फिरत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला रात्री पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांना अगोदर हिरवी झाडे दिसली. नंतर पर्वत वैगरे आणि शेवटी एका झाडास लागलेले जोड्फळ दिसले. इतक्यात त्यांना जाग आली. त्यावेळी पाच वाजले होते. मी पाच मिनिटे अगदी सुन्न झालो. जड अंतःकरणाने मी त्यांना स्पष्ट सांगितले की, आज तुमचा दिवस अत्यंत वाईट जाणार आहे. अपमानाची किमान मर्यादा असणारी घटना घडेल. तेव्हा धीराने वागा. एवढे सांगून मी घरी आलो. नंतर ऑफिसला गेलो. ऑफिस सुटल्यावर मी सरळ त्यांचे घरी गेलो. ते घरीच होते. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सांगितले, “तुम्ही गेलात आणि मी पण सुन्न होऊन गेलो. कसेबसे स्नान करून पूजा उरकून बसलो. वाचण्यात मन लागेना. दहा वाजले आणि दारात सावकार बेलीफला, इतर चौघा भाडोत्री साक्षीदारांना घेऊन हजार झाला. मी धीराने सर्वांना आत बोलावले. बेलीफनी कोर्टाची डीक्त्रीची ऑर्डर दाखवली. आपण आतले आतच सर्व कागदपत्री व्यवहार उरकून घेऊ म्हणजे तुमची अब्रू वाचेल व माझेही काम होईल. यावर मी त्यास माझ्या पगारातून डीक्त्रीप्रमाणे देणे वजा होत आहे. याचा पुरावा म्हणून मी ओफिसकडून आलेल्या मनीऑर्डरचे कुपन दाखवले. त्यात वजावटीचा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे बेलीफ गोंधळात पडला. एव्हाना भाडोत्री साक्षीदार निघून गेले. बेलीफनी मला कोर्टातून स्टे ऑर्डर आणण्यास सांगितले. मी ताबडतोब कोर्टात गेलो. मॅजिस्ट्रेट पुढे सविस्तर लिहून अर्जासोबत मनीऑर्डरचा खालचा भाग जोडला. मॅजिस्ट्रेटनी ताबडतोब स्टे दिला आणि स्वतःच घेऊन जाण्यास सांगितले. दहा मिनिटात स्टे घेऊन घरी आलो. स्टे बेलीफला दाखवला. थोडे उत्पन्न बुडाले म्हणून तो चडफडत परत गेला. अशा रीतीने आमची अब्रू आज जाता जाता वाचली. अजून काही राहिलं का?” असं म्हणून त्यांनी अत्यंत केविलवाण्या दशेन माझ्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यातील तरळणाऱ्या पाण्याकडे पाहून तो पण गहिवरला. मी शांतपणे म्हणालो, “पहिला अटळ अध्याय संपला. आता दुसरा आनंददायक अध्याय आठ दिवसांनी सुरु होईल. मी आठ दिवसांनी येईन.” असं म्हणून मी घरी आलो. बरोबर सहा दिवसांनी ते माझ्या घरी प्रमोशनची तार घेऊनच आले. त्यावेळी आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. पण ते कसले होते हे आम्हा दोघांनाच माहीत होतं.

विश्लेषण :- या स्वप्नात हिरवीगार झाडे आणि जोड्फळ(दोन अलग अलग नव्हे) एवढीच सूचक आहेत. जोड्फळ दिसणे म्हणजे अति अपमानास्पद घटना घडणार याचे द्योतक. त्यामुळे तो दिवस अशुभमध्ये अगोदर घेतला आणि हिरवीगार झाडे हि आयुष्यात “हिरवळ” आणणार याच द्योतक. दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला आहेच.

स्वप्न क्रमांक १३ –

माझ्या एका मित्राची बहिण एम.एस.सी. ला होती. परीक्षा होऊन गेली. ती गावाला जाण्यापूर्वी तिला एक स्वप्न पडले. त्यात तिला एक हाती सोंडेत माळ घेऊन फिरताना दिसला. त्यांनी ती माळ तिच्या गळ्यात घातली नाही. तो ती माळ नुसती फिरवतच निघून गेला. त्या मुलीनी मला अगोदरच सुचना दिली की स्वप्नाचा वाईट अर्थ असेल तर सांगायची आवश्यकता नाही. मी तिला स्वप्नाचा अर्थ चांगला असल्याचे सांगितले. स्पष्टीकरण करून मी तिला “हायर सेकंड” क्लास पास होशील पण फर्स्ट क्लास मिळणार नाही असे सांगितले. यथाकाश निकाल लागला आणि ती ५९ गुणांनी पास झाली. अर्थात सेकंड क्लासच.

विश्लेषण :- हत्ती दिसणे – यशाचे लक्षण, माळ गळ्यात न घालणे म्हणजे हर घालण्यैटका गौरव न होणे. म्हणजे प्रथम श्रेणी न मिळणे हा होय. विद्यार्थिनी असल्यामुळे स्वप्न निकालापुरतेच मर्यादित राहील.

स्वप्न क्रमांक १४ –

मी १९६२ साली औरंगाबादेहून नागपूरला बदलून आलो. माझे परम मित्र श्री. खंडेराव शेवाळकर यांनी निरोप दिला. आता भेटी क्वचितच होतील याची खंत पण व्यक्त केली. माझ्या १२ वर्षाच्या मुलीला ब्रेन ट्युमर झाला होता. त्यामुळे तिची दृष्टी गेली होती. अंधविद्यालयात शिक्षण घेता यावे म्हणून मी नागपूरला बदली मागून घेतली होती. दोन वर्षांनी कॅन्सरच्या गाठीची परत वाढ झाली. हाल हाल झाले आणि तिने १९६६ साली आपली जीवनयात्रा संपविली. माझी बदली नंतर १९६९ साली मुंबईत झाली. १९७२ पर्यंत माझी मुलगी माझ्या स्वप्नात कधीच नाही आली. मुंबईत मी कॉटनग्रीनमध्ये हौसिंग बोर्डाच्या इमारतीत मित्राबरोबर राहत होतो. एकदा कधी नव्हे ती माझी मुलगी (भूत) माझ्या स्वप्नात आली. तिने लाल कपडे घातले होते. तिच्या मागे माझे मित्र खंडेराव शेवाळकर उत्तम कपड्यात दिसले व मला जाग आली. त्यावेळी सकाळचे पाच वाजले होते. मी व माझा मित्र सकाळी ६ वाजता चहा पिण्यास हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी मी माझ्या मित्रास म्हणालो की, “आज माझे परम मित्र शेवाळकर यांचे पत्र येईलच. कारण माझ्या मुलीच्या मागे ते मला स्वप्नात दिसले.” सायंकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही दोघे बरोबरच घरी परतलो. दरवाजा उघडताच समोर आंतरदेशीय पत्र दिसले. पत्र श्री. खंडेराव शेवाळकर यांचेच होते. पत्र वाचून मी खालीच बसलो. “आपण गाडीवर यावे. माझ्याबरोबर माझे भाचे आहेत. अकोल्यास गेलो असताना डॉ. लक्ष्मणराव भोगते, सिव्हिल सर्जन, यांनी तपासले. त्यांनी कॅन्सरचे निदान केले आहे.” माझ्या मुलीच्या मागे शेवाळकर दिसले आणि त्यांना पण कॅन्सर होणे हा विलक्षण योगायोग वाटला.

विश्लेषण :- माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता. ही वास्तवता होती. ती कधीच स्वप्नात आली नव्हती म्हणून सूचक काहीच न बोलता उभी राहिली होती. व तिच्या मागे श्री. खंडेराव शेवाळकर उभे होते. म्हणजे तिच्या मागोमाग त्याच आजाराने जाणे निश्चित होते. आजारातील साम्याच विलाक्षण.

स्वप्न क्रमांक १५ –

श्री. पांडे यांचे फेस रीडिंग यावर पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे, असे कळताच पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल व वितरणासंबंधी चौकशी करावयास म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलो. ते तेथे नव्हते म्हणून बाहेर फिरत होतो. तोच “अहो डोईफोडे, इकडे कोणीकडे,” म्हणून मला बोलावले. ते होते श्री. रमेश नवलाखे, उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर. त्यांनी कार्यालयातच नेले. त्यांनी मला २६ वर्षानंतर देखील ओळखले होते याचा मला खरोखरच आनंद झाला. त्यांनी ताबडतोब १९६३ सालची आठवण सांगितली. ती त्यांच्याच भाषेत देत आहे.

“१९६३ साली मी विक्रीकर खात्यात आपल्या हाताखाली लिपिक म्हणून होतो. त्यावेळी मी आपणास एक स्वप्न सांगितले होते. ते मला अजूनही आठवते व त्यावर आपण सांगितलेले भविष्य पण. ते स्वप्न असे.

जानेवारी १९६३ च्या उत्तरार्धात सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान हे स्वप्न पडले. प्रचंड असा पाण्याचा सागर एका देवळाभोवती पसरला होता. देवळात मी पूजा करीत होतो. सोबत दर्शनार्थी पुष्कळच होते. सायरनसारखा आवाज आला आणि सर्वांनी बाहेर जावे अशी हाकाटी पिटली. पाणी आत येऊ लागले. माझी पावलं त्यात रोवली जाऊ लागली. ती बाहेर निघणे कठीण असे वाटू लागले. अशा वेळी परमेश्वराचा धावा केला. एक अशी प्रचंड लाट आली. मी चालू लागलो. मी जसजसा पाण्यातून चालू लागलो तसातशी पाण्यात पाउलवाट मोकळी होऊ लागली होती. मी त्या मोकळ्या होऊ लागलेल्या वाटेने झपाट्याने चालत होतो. शेवटी मी एकदाचा किनारा गाठला आणि मागे वळून पाहिले तर संपूर्ण देऊळ जलमय झाले अन् मला जाग आली. याचा अर्थ आपण सांगितला तो असा-

“नवलाखे, तुम्ही लिपिक म्हणून येथे कायमचे राहणार नाहीत. तुम्ही ही नोकरी सोडाल. येथून तुमच्या प्रगतीची वाट मोकळी झाली आहे. सतत उत्कर्ष होईल एवढाच अर्थ आहे.”

आज मी उपसंचालक पदावर आहे पण ते स्वप्न आणि तुम्ही केलेले भाकीत मी आजही विसरू शकलो नाही.” चहा घेऊन मी बाहेर आलो तो श्री. नवलाखे यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा प्रत्यय घेऊन.

ज्या स्वप्नाचे मी त्यावेळी तेथल्या तेथे मनात विश्लेषण केले ते असे – देवळात दर्शनास जाणे ही सात्विक प्रवृत्ती. पाण्याची प्रचंड लाट येणे हे तसे संकट पण येथे ते ज्या पदावर होते तेच संकट होते. पण त्या लाटेनंतर पाण्यात पाउलवाट तयार होऊन पैलतीरी जाने हेच सूचक होते. सर्व जलमग्न होणे याचा अर्थ मागील परिस्थिती लय पावणे आणि पाउलवाट मोकळी होऊन किनारा गाठणे हे प्रगतीपर पावलं पडणं हाच होता. म्हणून मी प्रगती व सतत उत्कर्ष होईल हे निर्धास्तपणे सांगू शकलो.


1 Comment

स्वप्नदृश्य व स्वप्न्फल

आतापर्यंत आपण डॉ. सिगमंड फ्राईडचा सिद्धांत मान्य करूनही, त्याला डावलून पूर्वीपासून प्रस्थापित झालेल्या प्रतीकाचे परिणाम बघू शकलो. इजिप्शियन वाङ्मयात स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं सर्वप्रथम आली आहेत. स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं हि कोणा एका व्यक्तीची स्वप्ने नव्हेत. तर पुन्हापुन्हा पडणारी सारखी स्वप्ने आणि त्यांचे सारखे परिणाम हे लक्षात आल्यावर त्याची नोंद घेण्याची पद्धत सुरु झाली आणि आज त्याचा कोश इंग्रजीत तसाच इतर भाषांतही तयार झाला आहे. मराठीत तशाच प्रकारची डिक्शनरी तयार करण्याचे प्रयत्न होत आहे. स्वप्न या विषयावर एका रशियन भाषेत चाळीस हजार स्वप्नांचा संग्रह केला आहे.

या भागात स्वप्नदृश्य आणि त्याचे फल दिले आहे. वास्तविक स्वप्न्दृष्याचे फल पाहण्याची फार थोडी गरज लागते. एक वेळ तुम्हास स्वप्नाचे विश्लेषण करून त्यावर थोडे चिंतन, मनन करता आले तर डिक्शनरी न बघताही तुम्ही पुढे काय होऊ शकतं हे काही दिवसाच्या सरावाने सहज अचूक समजू शकता. कारण स्वप्न हि सर्वस्वी एका व्यक्तीचीच बाब आहे. तीच व्यक्ति जास्त अधिकाराने स्वप्नफल समजू शकते. इतरांच्या स्वप्नात डोकाव्ण्याकर्ता ते स्वप्न पडणाऱ्याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करूनच त्याचे फळ काढण्याचा प्रयत्न अभ्यासाशिवाय जरा कठीण. तेव्हा अगोदर आपल्या स्वप्नाचेच विश्लेषण करून किती टक्के यश मिळतं ते पाहा.

यातील दृष्यावस्तू या फक्त मार्ग दाखवणाऱ्या किंवा असं म्हणू की सूचनेच्या पाट्या आहेत. खालील प्रत्येक वस्तू किंवा दृश्य हे त्या त्या व्यक्तीची उन्नती-अवनती, पदोन्नती, पदावनती याचे द्योतक आहे. व्यापारी वर्गास जर “भर-भराट” होईल तर त्याच किंवा तशाच स्वप्नास सरकारी नोकरास पदोन्नती मिळेल, अशा रीतीने हि स्वप्न्फलं आहेत. वाचकांनी ताडून पाहावीत. अधोरेखित स्वप्नदृश्य आणि स्वप्नफल हि सर्वसामान्यांच्या अनुभवास आलेली आहेत. म्हणून याची फलं शंभर टक्के तीच आहेत यात शंका नसावी. यात खोगीरभरती करण्याचे टाळले आहे.

कोणा एका मराठी छांदिष्टाने थोर मोठ्यांच्या आयुष्यातील स्वप्ने गोळा केली तर स्वप्नदृश्य आणि स्वप्न्फलास निश्चितच पुष्टी मिळेल. मला उगीचच राहून राहून वाटलं की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. शरद पवार यांना पहिल्या प्रथम मुख्यमंत्री होण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच माजी मुख्यमंत्री श्री. अंतुले यांना पण पायउतार होण्यापूर्वी निश्चितच तसे सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच विद्वान व तरुणात लोकप्रिय असलेले माजी मंत्री श्री. जिचकार यांना पण मंत्री होण्यापूर्वी आणि मंत्रिपद जाण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सुचना स्वप्नामार्फत मिळाली असेलच. स्वयंस्फूर्तपणे मोठ्या माणसांनी आपले अनुभव कळवल्यास या शास्त्रास हातभार लावण्याचे श्रेय मिळेल. तेव्हा सर्वांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी या छंदास प्रोत्साहन देऊन यातील स्वप्नफल आणि स्वप्नदृश्य यास बळकटी येईल असे अनुभव कळवावेत.

स्वप्नदृश्य

स्वप्नफल

अग्नीवर वस्तू शिजवने, अग्नी, अग्नी पेटवलेला पाहणे उद्योगधंद्यात लाभ, सर्व काळजी दूर होणे.
 अंडी खाणे  त्रास नाहीसा होणे, आनंददायक घटना घडणे.
 अंधारकोठडी पाहणे, अंधारी रात्र पाहणे,  चैन जन आपत्ती येणे, विपन्न अवस्था प्राप्त होणे.
 अश्व (घोडा)  अत्यंत शुभदायक. आर्थिक स्थैर्य, भरभराट आणि उन्नती निश्चित. नोकरी करणार्यास पदोन्नती.
 अन्न दर्शन – अन्नदान  कार्यसिध्दी
 आग लागणे, आगीचा डोंब  लक्ष्मीचा वरदहस्त, मोठा सांपत्तिक लाभ.
 आकाश, आकाशात उडणे सुखकारक, वैभव वाढ, आजारातून मुक्तता.
आकाशातून पडणे संपत्ती नाश, संकट येणे.
आंगठी विकणे स्त्री विरह-दुःख
आड खोडणे  सुरु केलेले काम पूर्ण होणे.
आंघोळ करणे दुःख नाहीसे होणे.
आरसा चांगले मित्र मिळणे – उर्जित अवस्थेकडे वाटचाल.
आरसा फुटणे नातेवाईकाचा मृत्यू
आंब्याचे झाड, पिकलेले आंबे, आंबा खाणे धनार्जक, वैभवाकडे निश्चित वाटचाल
आई-वडील सुखकारक, भाग्यवर्धक
आंबट पदार्थ खाणे अपाय-धोका
आंधळा आजारीपण
आगबोटीत बसणे, जलपर्यटन, आगबोट स्वतः चालवणे शुभकारक, धंद्यात भरभराट, उन्नती
आरशात प्रतिबिंब दिसणे, पाहणे प्रेमभंग-तोंडाला काळिमा लागणाऱ्या गोष्टी घडणे.
इस्त्री करणे नोकरीत बढती, अविवाहितांचे विवाह.
उंदीर दिसणे भांडणे, मानसिक त्रास
उंट, उंटावर बसणे, फिरणे अडचणी, विवंचना, अपमान आजार उद्भवणे.
उवा शरीरास आजार
कोळसा संधी गमावणे किंवा संधी मिळून देखील यश न येणे.
कावळा दुःख, दुर्दैव, भांडणे
कावळा डोक्यावर बसलेला ज्याच्या डोक्यावर बसला असेल त्याचा मृत्यू, सामान्यतः सात वर्षात निश्चित. स्वप्न वेळ काढल्यास त्या प्रमाणे.
ओढा शुभ फलदायक
ओकारी शुभ फलदायक
ओटीत नारळ घालणे कल्याण, शुभविवाह, पुत्र प्राप्ती
कपिला गाय ज्ञान प्राप्ती, काळ्या रंगाची गाय दिसल्यास मंगलकार्य होणारच.
कोळी, कोळ्यांनी जाळे विणणे धनसंग्रह – सुखोपभोग
कबुतर संकटाची पूर्वसूचना
कोकिळा भरभराट
किडा, किडे अंगावर बसणे भाग्योदय, उर्जितावस्था
केस गळणे-कापणे सुबत्ता निघून जाने, मानहानी, विपन्नावस्थेकडे वाटचाल.
कमळ सुख समाधान, भाग्यवर्धक
कापूस अत्यंत अनिष्ट फळदायक, हातून अशा चुका होतील कि ज्यामुळे मानसिक अवस्था पूर्णपणे नष्ट होईल.मानखंडणा आपोआप आलीच.
काळा रंग, काळे रंग, काळे वस्त्र हा रंग अनिष्टकारक आहे हे सर्वांनाच माहित आहे.
करवंटी रसातळात जाणे
केळी, केळ कार्यसिद्धी
केरसुणी, केरसुणीने केर काढणे-झाडणे त्रासदायक घटना घडून बेकार खर्च होणे.
कोणी रडलेले बघणे शुभ समाचार समजणे
केस घेणे देता देता मृत्यू
कापलेला हात दुःख येऊन त्यातून मुक्तता
कोणी सिंहासनावर बसलेला पाहणे कोणतेही काम पूर्ण होणे
कोणाबरोबर भांडणतंटा ख़ुशी व सौख्य
कोणी वैद्य – डॉक्टर पाहणे भारी दुःख यातना
कुत्रा दिसणे शत्रुत्व, विरोध होणे
कुत्र्यास ठार मारणे व्यवसायात भरभराट होणे
केशरी रंगाच्या वस्तू पाहणे शुभकर्मे – कुटुंब वृद्धी
खटाऱ्यात बसणे शुभफलदायक-धनलाभ
खारट पदार्थ खाणे महत्त्वाचे कार्यात सुयश
ख्रिसमस, ख्रिस्त, ख्रिश्चन पाहणे उत्तम मित्र मिळणे, शक्तिशाली संरक्षण, दया, परोपकार यांची वाढ होणे.
खणणे सत्ता, लॉटरी, गुप्तधन मिळण्याचा योग
खोल विहीर पाहणे चिंता प्राप्ती, घसरण सुरु होणे
खाली उतरणे अपकार्य, परागती, अधःपतन
गाईने हल्ला करणे धंद्यात हानी
गरुड, गरुडझप आकांशा वाढणे, फलदायक कीर्ती
गंधाचा लेप लावणे उत्पन्नात वाढ होणे.
गाणे पाहणे, ऐकणे तंटा, मन-स्वास्थ्य बिघडणे, फटका
गहू दिसणे उत्कर्ष, भरभराट
गाण्याची मैफिल झडणे कार्यसिद्धी लांबणीवर पडणे
गाय पाहणे, त्यातल्या त्यात काळी अत्यंत शुभ. लग्नकार्य होणार हे निश्चित
गाढव दिसणे बेअब्रू, कष्टप्रद यातना
गाढव ओरडणे फायदा होणे
ग्रह निखळून पडणे घोर शोक, मृत्यू
गुलाब फुल सुखसमृद्धी
ग्रहण दिसणे अडचणी दूर होणे
गढूळ पाणी दिसणे आर्थिक अडचणी येणे
ग्रंथ दिसणे ज्ञानात वाढ होणे
ग्रंथ वाचणे अंदाज चुकणे
घोडा, घोड्यावर बसणे, चढणे, पांढरा काळा, नटलेला, रेसचा वेगानी धावणारा कुटुंब वृद्धी, राजमान्यता, मान-सन्मान, भरभराट, सतत उत्कर्ष, रोगमुक्तता, उन्नती निश्चितच
घोड्यावरून पडणे वैभावनाश, पश्चाताप
घर दिसणे उन्नती होणे
चर्च, चर्चची घंटा वाजणे शुभ वार्ता, जिव्हाळ्याचे वातावरण
चंद्रास्त, चंद्र निस्तेज दिसणे घोर शोक, मृत्यूयोग
चंद्र ग्रहण, चंद्र दिसणे सर्व क्षेत्रात सुयश. संकटातून मुक्तता, आजारातून बरे होणे, समाधानाचा काळ
चंद्र ढगाने व्यापणे, अंधुक दिसणे प्रकृती बिघडणे, प्रेमाचा बाबतीत विघ्न येणे
चाकू दिसणे मित्राबरोबर खटके
चेंडू दिसणे खोटा आरोप येणे
चपला(जुन्या) दिसणे अडचणी – मनोभंग
चपला(नव्या) दिसणे उत्तम दिवस
चांदी दिसणे, गोळा करणे सौख्यावर्धक, चैन
चिलीम पिणे, ओढणे धनवान होणे.
छत्री उघडून चालणे, डोक्यावर धरणे अशक्य कार्य तडीस जाणे, मानमरातब व ऐश्वर्यवाढ, आरोग्य, धनवाढ.
जोड(जुना-फाटका) अडचणी उत्पन्न होणे.
जिना चढून जाणे कौटुंबिक उत्कर्ष, प्रगती, उन्नती
जिना उतरणे घसरण सुरु होणे
जेवणावळी दिसणे संकटे, चिंता, आर्थिक अडचणी
जेवण करणे किरकोळ आजार येणे
जमिनीवर बिछाना अंथरणे आरोग्य प्राप्त होणे, आर्थिक प्रगतीकडे वाटचाल
जंगल(हिरवे) दिसणे आनंदाचे क्षण येणे, शोक दूर होणे
जांभूळ दिसणे-खाणे सर्व त्रासातून मुक्तता
जळता दिवा सुकलेला बाग समृद्ध होणे, पुत्रसंतती होणे.
जननेन्द्रिय दिसणे मनकामना पूर्ती, भरभराट
पुरुषाचे जननेन्द्रिय वाजवीपेक्षा मोठे दिसणे आर्थिक अडचणीतून निश्चित मुक्तता
जलविहार, जलक्रीडा ध्येयप्राप्ती, प्रगती
झाड समृद्धीकारक
झाडावर चढणे रोगमुक्त होणे, अभ्युदय्कारक
झाड तोडणे नुकसानीस तोंड द्यावे लागणे
झेंडा (पांढरा) प्रसन्नता प्राप्ती
झेंडा (हिरवा) समोर कठीण प्रसंग येणे
झेंडा (लाल) आराम नाहीसा होणे
टेकडीवर चढून जाणे परीक्षेत यश, उज्ज्वल पराक्रम, धाडशी कार्यात यश
टांगा स्वतः हाकणे, प्रवास अनुकूल वातावरण
टोपी(घाणेरडी) इतरांच्या डोक्यावर किंवा स्वतःच्या डोक्यावर पाहणे संपूर्ण जीवन उन्नती, सरकारी नोकरास पदोन्नती निश्चित, इतरास अत्यंत भरभराटीचे दिवस. मानमरातब मिळणारच.
टोपी दुसऱ्याने डोक्यावर आणून ठेवणे अनर्थ, फसवणूक
डाकघर राहत्या जागेत बदल
डोळ्यात अंजन घालणे, सुरमा, काजळ मृत्यूकडे वाटचाल
डोंगरावर चढणे, फिरणे नोकरीत मोठी जागा मिळणे, दिवस भरभराटीचे येणे
ढगाळ आकाश, ढग दिसणे दुर्दैव सूचक, संकट येणे
तलाव दिसणे, पोहणे, पडणे शुभफलदायी, भरभराट
तलावात उडी मारणे नुकसान, खोटे येणे, धोका
तलावात लाटा व तरंग दिसणे निःसंशय संकटाची सूचना
तेल मर्दन करून घेणे शस्त्रभय, अपघात, आजार
तारे दिसणे संकटातून मुक्तता
तूप पिणे, तूप प्राप्ती दीर्घायुष्य, सर्व कार्यात यश
टाक पिणे, दिसणे, मिळणे नुकसान, अपघात, बेअब्रू
तलवार (नंगी) हाती धरणे शत्रूवर विजय मिळवणे
तोफ पाहणे शत्रुनाश, विजय मिळणे
तंबोरा वाजवणे भरभराट होणे
तुम्ही कोणावर रागावणे सुकलेले मन प्रसन्न होणार्या घटना घडतील
ऑफिस बघणे जिकीर पैदा होणे
देवालय, देवळावर चढणे, देऊळ उत्कर्ष, वैभव
दात पडलेले बघणे अत्यंत वाईट स्वप्न, सर्व पैसा जावून मनुष्य धुवून निघतो.चांगला दिसणारा व असणारा मनुष्य चुकीच्या मार्गाला लागून सर्वनाश ओढवून घेतो.एवढं तरी बरे आहे की यात फक्त पैसाच जातो. स्थावर इस्टेट विकल्या जातात.
 दाढी करणे मानहानी निश्चित होणार
दुध, दुध पिणे, दही मिळणे, पिणे सर्वत्र आनंदी आनंद, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ
दिवा भाग्योदय
दिवा विझणे आयुष्यात अंधार येण्यास सुरुवात
दफनविधी संपत्ती प्राप्ती
धूर दिसणे, धुरात गुदमरणे उपद्रव, नुकसान, मृत्यूची चाहूल
धार्मिक समारंभ महत्वाचा उत्कर्ष
नदी नाला, यात पोहणे शुभ फलदायी
नदीत लाट, तरंग, उडी मारणे, लोंढ्यातून जाणे, भोवरा दिसणे, लाटा अंगावर येणे संकटाची पूर्वसूचना, भांडण, बेबनाव, नुकसान, मानहानीचे प्रसंग येणे
न्हावी दिसणे कर्जबाजारी होणे, अशुभ सूचक
नागदर्शन फना काढून ताठ उभे राहणे, तक लावून पाहणे, मागे धावणे, न चावणे दैवी कोप, कुलदैवत कोप, कामात विघ्न येणे, यश न मिळणे, मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडणे
साप चावणे सहसा साप स्वप्नात चावत नाही. पण चावल्यास निःसंशय उत्कर्ष, जय, अमाप पैसा मिळतो. स्थावर इस्टेट होते. मानमरातब, सर्व बाजूनी उत्कर्ष. हेवा करण्याइतकी प्रगती होते.
गरोदर स्त्रीस साप चावल्याचे दिसल्यास मुलगा होतो
मलूल पडून राहिलेला दिसल्यास मुलगी होते
नातेवाईक दिसणे शुभदायक
नारळ ओटीत घालणे, नारळाचा प्रसाद, नुसते नारळ शुभ विवाह, पुत्रप्राप्ती, नशीब उगवते, सर्व कार्यात यश
नारळ फोडणे, फोडलेले पाहणे मानखंडणा होणे, सुखाचे तुकडे होणे, अपघात, कटकटी स्वास्थ्य व मनःस्वास्थ्य बिघडविणाऱ्या घटना घडतात.
न्हाव्यांनी दाढी करणे, हजामत करणे, मर्दन करणे अपघात, खोट, व्याधी, अब्रूचे धिंडवडे निघणे.
पाणी दिसणे, पोहणे, पडणे व स्नान अत्यंत शुभदायी
पाण्याच्या लाटा अंगावर येणे, पाण्यात उडी मारणे, लौंढा, प्रवाह व पाण्यात चालत जाणे अत्यंत अशुभ, नुकसान, भांडण तंटे, नातेवाईकाशी बेबनाव, कलह, कटकटी.
पर्वतावर चढून जाणे प्रगतीचे दिवस येण्याची पूर्वसूचना
पिताजी दिसणे, बोलणे सौख्यकारक
पांढरी फुलं सुख आणि आनंदात भर
पोष्ट ऑफिस राहत्या जागेत भर
पोष्टमन विचित्र घटनेची पूर्वसूचना
पत्र दिसणे, पत्र येऊन पडणे शेजाऱ्याशी भांडण, मित्र व जवळच्या नातेवाईकाशी खटके उडणे.
प्रेत व प्रेतयात्रा दिसणे अडचणीवर मात, लाभास अनुकुलता
पाल मनात गोंधळ निर्माण होणे.
पक्षी दिसणे, गाणे गात असणे सुबत्ता, सर्वोतोपरी सौख्य
पोळी खाणे, पान खाणे, दिसणे आरोग्य, आजारातून बरे होणे
पोळी भाजणे, पाव कापणे, भाजणे दुर्दैव, मनःस्वास्थ्य बिघडणे
पांढरा झेंडा दिसणे गुरुकृपा होईल. प्रसन्नेत भर
पेढे खाणे भरभराट, आनंदत भर
पावा वाजवणे दुःख प्राप्त होणे, क्लेशकारक
फळे, फुले, फळ आलेले झाड, फुले असलेले झाड(जोड्फळ सोडून) यशाचे वाटचाल, वैभवप्राप्ती, इच्चा पूर्ण होणे, समृद्धीत वाढ
फुटका आरसा हलाखीचे दिवस येण्यास प्रारंभ
बंदुकीचा वायबार प्रिय व्यक्तीस, जवळच्या नातेवाईकास जिवावरचा आजार
बंदूक उडविणे त्रासदायक घटना घडणे
बैलावर बसणे शुभफलदायक, परीक्षेत यश
बेडूक दिसणे स्फूर्तीदायक घटना घडणे
भजी खाणे विजय प्राप्ती
भटजी नुकसान, फटका निश्चित बसणार
भांडणात कत्तल होणे अधिकारप्राप्तीचा योग
भडाग्नी दिसणे, ज्वाळा प्रेतास भडाग्नी देणे पराकोटीची उन्नती, आयुष्य बदलून जाणे
भात खाणे बेअब्रू, छी, थू होणार्या घटना घडणे
मीठ पाहणे महत्त्वाच्या कार्यात यश
मांजर ठार मारणे धनवृद्धी, व्यवसायात भरभराट
मार्ग न सापडणे अनिष्ट फलदायक
माता दिसणे उन्नतिकारक – कृपा
आदरणीय स्त्रीशी(मातेसमान) व्यभिचार केल्याचे दिसणे हे स्वप्न अति भयाण असून मनुष्य घाबरून जातो. पण जुन्या शास्त्राप्रमाणे हे अत्यंत शुभ आहे.जे अतिसंकात माणसावर आहे त्यातून निश्चित मुक्तता होते. शिवाय आयुष्यात प्रगतीच होते.
मांस दिसणे, खाणे धनलाभ
मद्यपान करणे आरोग्यास धोका, प्रकृती ढासळणे.
माता दिसणे यश. अमाप पैसा मिळणे.
मासे पकडणे, मारणे फसवे मित्र भेटणे, फसवेगिरी
मोर दिसणे आर्थिक परिस्थितीत खूप सुधारणा
मोटार स्वतः चालविणे प्रतिकूल वातावरणावर मात, प्रगतीकडे वाटचालआयुष्य सरळ सुखी जात राहिल
महारोगी निश्चित अर्थलाभ
मुंगी, मुंगळा दिसणे विपत्ती येणे, यश न मिळणे
मंदिरातील घंटा वाजणे, मूर्ती न दिसणे, हसणे, बोलणे भाग्योदय, उत्कर्षाकडे वाटचाल
मीठ खाणे कार्यात यश मिळणे
मोहरी दिसणे चिंतावाढ
मिरच्या दुर्दैवी घटना
रडलेले पाहणे(स्वतःस)तसेच इतरांनी रडणे आनंदाची वार्ता, पदोन्नती, मनोकामना पूर्ण होणे, प्रगतीकडे वाटचाल
राख दिसणे (पांढरी राखाडी) अत्यंत अशुभ, जवळच्या माणसाचा मृत्यू, नाना तऱ्हेची संकटे येणे, प्रसंगी फौजदारी खटलेसुद्धा चालणे.
रेस, रेसचा घोडा, रेस ग्राउंड  अत्यंत शुभदायक स्वप्न. आनंद, उत्साह याला उधान येईल. यशाने डोळे दिपून जातील. सर्वांगीण उन्नती व उत्कर्ष हे फळ दीर्घकाळ टिकणारे आहे.
रुमाल बांधणे समृद्धी
रत्ने दिसणे, धारण करणे सुखी जीवन जगणार याचे द्योतक ऐश्वर्यवर्धक समृद्धी
लोखंड दिसणे दुर्दैवी घटनेची नांदी, चुकीच्या मार्गास सुरुवात
लहान मुल रडतरडत जवळ येणे आर्थिक स्थैर्य, लाभ
लोणी काढणे, खाणे अचानक धनलाभ
लग्नाची वरात स्त्रीस आनंददायक, पुरुषास वाईट. पश्चाताप होईल अशा चुका हातून घडतील.
लढाईत कत्तल होणे, लढाई अधिकारप्राप्ती, सुखवृद्धी
विहीर दिसणे, पडणे चिंता, विपत्ती यात वाढ होणे.
विस्तव भाग्योदय होणार याची सूचना
विष्ठा, विष्ठा दिसणे, भक्षण करणे धनप्राप्ती, उत्पन्नात लक्षणीय वाढ होणे. हे स्वप्न केवळ आर्थिक लाभाचे आहे.
वांती शुभसूचक, क्षणिक अडचणीवर क्षणात मात.
विमानातून प्रवास करणे कार्यात विघ्न येणे
वाघ दिसणे, वाघाच्या तावडीतून सुटका होणे निर्भयपणा प्रखर होणे, रेस, लॉटरीत यशाचे योग.
वाघ चावणे शुभदायक घटना घडेल
विंचू दिसणे जय – पुत्रपौत्रवृद्धी – सुखात भर
वधू दिसणे, वर दिसणे अशुभ, कार्यात अपयश
दिवा विझणे आजार, अडचणीस सुरुवात, कटकटी
वानर, वानराचे पिल्लू शत्रुत्व, अपमानास्पद घटना घडणे. अपमानाची खिरापत
शिवलिंग दिसणे महत्त्वाचा उत्कर्ष, सुखी काळाकडे वाटचाल
शिडीवर चढणे निश्चित प्रगती. ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रगती
शिडीवरून घसरणे आयुष्यात घसरणीला सुरुवात. हळूहळू सर्वस्वी पडेल
शर्यतीचा घोडा जीवनाच्या शर्यतीत हमखास यश
शौचास जाणे, शौच दिसणे, शौच करणे या स्वप्नाची वेळ काढल्यास तेवढ्या काळात निश्चित धनलाभ
समुद्र, सागर पाहणे, पोहणे, स्नान करणे, भरती आयुष्यात सुखाला भरती येणे
समुद्राची ओहटी सुखास ओहटी लागणे
सूर्यास्त, सुर्यपतन मृत्यूची चाहूल
सूर्योदय, सूर्यग्रहण, सूर्य व सोने दिसणे ज्ञानवृद्धी, एखाद्या विषयात विलक्षण प्रगती, धनलाभ
सासू-सासरा दिसणे संकटात वाढ
सिगरेट ओढणे योजना पूर्ण होतील. व्यापार्यास धंद्यात निश्चित लाभ होईल.
सुपारी कामात यश मिळणे कठीण
स्त्रीने जननेंद्रिय पाहणे मनकामना पूर्ण होणे. जे कार्य घेतले आहे त्यात १००% यश
स्कूटरवर बसणे, चालवणे, प्रवास करणे दूरचा प्रवास घडणे, आनंदात भर पडणे
हवेत उडणे आजारातून निश्चित बरे होणे, उशिरा का होईना, प्रगतीकडे वाट.
हत्ती दिसणे कार्यसिद्धी, मित्राचे सहकार्य लाभेल, अकल्पित यश
हागणे पैसा कमी न पडणे. आर्थिक स्थैर्य
हंस सुदैवास सुरुवात, दुर्वैवाचा अंत

काही अनुभवांचे स्वप्नफल

धुराचे इंजिन धुराचे लोट सोडीत अंगावर येणे अत्यंत मानहानीचे प्रसंग येणे, बदनामी होणे, उपहासाचा विषय होणे.
रेल्वेने प्रवास करीत असताना रूळ बदललेले पाहणे स्थानांतर – बदली निश्चित

टीप :- पुष्कळ वेळा स्वप्नात येणाऱ्या व्यक्तींची पुनरावृत्ती होते. तीच व्यक्ती येते आणि पहिल्यांदा ती व्यक्ती आल्यानंतर जो परिणाम होतो तोच ती दुसऱ्यांदा होतो. असे होतच राहते कारण ती व्यक्ती ती सूचना देण्याकरताच येते.

मला एका पटत एकाने लिहिले आहे “माझे वडील माझ्या स्वप्नात आले कि हमखास वाईट घटना घडते. वडील तिसऱ्यांदा स्वप्नात आले आणि माझी धाकटी मुलगी आठ दिवसात वारली. बहुदा माझे वडील वाईट घटना घडणार हे सुचविण्यास येत असावेत. आपण यावर असे का होते ते कळवावे.”

त्यांना उत्तर देऊन मी माझा तसाच अनुभव सांगितला. माझे मामा, मामाकडील वाडा, मामाच्या गावातील माझे मित्र हे माझ्या स्वप्नात आले की, आज कोणाशीतरी भांडण होणार, फटका बसणार, मनाचा तोल जाईल, अशा घटना घडतातच. येथे मामाचे स्वप्नात येणे हे दुर्दैवी घटना घडण्याचे आणि मनःस्वास्थ्य बिघडण्याचे प्रसंग येणार याची पूर्वसूचनाच आहे. तेव्हा शांतपणे अटळ गोष्टी सहन करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?

वाचकांनी अशा स्वप्नांची नोंद ठेवावी.

स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात

१. स्वप्ने ही स्वेच्छेने कधीही पडत नसतात. तेव्हा त्याची कारणे शोधण्याचा विनाकारण प्रयत्न पारू नका. शोधावायाचेच असेल तर त्यातील दृश्य का दिसले याचा शोध घ्या.

२. स्वप्नाचा इष्ट वा अनिष्ट परिणाम हा अटळ असतो याची नोंद घ्या व तो टाळण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. कारण निसर्ग आपल्या सूचना मानवाच्या दानानी किंवा देऊ केलेल्या मानानी(अर्थात मानभावी) बदलत नसतो.

३. डॉ. फ्राईडनी “स्वप्नात फक्त भूतकाळात दडवून  किंवा दाबून टाकलेल्या लैंगिक वासनांची भुते हि असतातच त्यात भविष्य नसतातच” असं अर्धवट सांगितलं आहे हे लक्षात घ्या. स्वप्नात भुते हि वेषांतर करून येतात तशी भविष्यकाळात घडणाऱ्या घटना सांगणारे दुतही येतात अर्थात वेषांतर करूनच.

४. नाटक बघत असताना आपण कोणत्या नटाने वेषांतर करून कोणते पात्र रंगवले हे जसे ओळखतो तसेच स्वप्नांतील वेषांतर ओळखता येते.

५. निसर्गाजवळ क्षमा नाही हे पूर्णपणे लक्षात ठेऊन सर्व प्रसंगास सामोरे जा. निसर्गाच्या सूचना डावलताच येत नाही म्हणून ही सूचना.

६. वाईट स्वप्नाची भीती बाळगू नका. कारण स्वप्नात वाईट नसतं. असतो तो परिणाम. भ्रामक कल्पनांना बळी पडू नका. तर्कशास्त्राच्या आधारावर वैचारिक बैठक बसवा.

७. स्वप्नात “उसको हटाव उसको बिठाव” अशा घोषणा व “ढमके पुरस्कृत – अमके तिरस्कृत” हे प्रकार नसतात. फक्त असतात त्या वैयक्तिक शुभ व अशुभ या घटनांच्या सूचना.

——————-

नोव्हेंबर १९८९ला पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर वर्तमानपत्रातून परीक्षण, अनेक वाचकांचे पुस्तकाबद्दलचे मत, स्वप्न, स्वप्न्शास्त्र याबद्दलची पत्रे आलीत सर्वांच्याच बद्दल सांगणे किंवा लिहिणे शक्य नाही पण काही थोडक्यात…

वर्तमानपत्रे – दै.सन्मित्र – स्वप्नांच्या दुनियेत – एक वाचनीयग्रंथ श्री. मोहन पाठक, ठाणे यांनी स्तम्भ्लेखनातून निवृत्तीनंतर अभ्यासाचा विषय म्हणून स्वप्नांची निवड करण्याचा श्री. डोईफोडे यांचे या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. (दि. ९/९/९०)

‘स्वप्न’ – जिज्ञासू वाचकास आपल्या स्वप्नांचा अर्थ कसा लावला याविषयी मार्गदर्शन करणारे वाचनीय पुस्तक केवळ रु.२०/- (नागपूर पत्रिका – १२/८/९०)

मुंबई दिनांक – ८/४/९० – ‘स्वप्नसंबंधी मौलिक संशोधन’ – लेखकाने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वप्नांचा अर्थ लावणे सहज शक्य आहे. पुस्तक वाचनीय व वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन (लोकसत्ता)

स्वप्नांचे गूढ उलगडून दाखविणारे पुस्तक – स्वप्नांची दुनिया – लेखकाने आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने या स्वप्न्शास्त्राचा उलगडा केला आहे. अभ्यास व लेखन दोन्ही ही गोष्टी अभिनंदनास पात्र आहे. – सौ. साठे (ग्रंथसहवास – १४/१/९०)

२ जानेवारी १९९४ – ‘स्वप्नसृष्टीचे ग्रांथिक अवलोकन’

‘मराठी साहित्य क्षेत्रात नवीन विषयावरील नवे पुस्तक म्हणून कौतुकास्पद’. यातील विवेचानाशी बुद्धिवादी सहमत होऊ शकणार नसले तरी क्षणभराकरिता स्वप्न्सृष्टीचे ग्रांथिक अवलोकन नक्कीच रंजक मानावे लागेल. पुस्तकातील चित्रांमुळे पुस्तक उठावदार झाले आहे.  डॉ. केनपुरे (लोकमत)

२७ दिसेम्बेर १९९७ – स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारे एक पुस्तक. स्वप्नांचा उलगडा करणारे व अर्थ सांगणारे मराठी भाषेतील एक वेगळे पुस्तक म्हणून कौतुकास्पद – प्रतिनिधी – दैनिक लोकमत – औरंगाबाद)

‘फ्राईडचे खंडण करणारी डोईफोडे यांची स्वप्नांची दुनिया’ – लेखकाने स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात सांगताना स्वप्नांची भीती बाळगू नका असा दिलासा दिला आहे. पुस्तक विवेचन अभ्यासपूर्ण म्हणून कौतुकास्पद परंतु आपल्या आपल्या पडलेल्या स्वप्नांचा अर्थ दिलेल्या कोषातून लपताना वाचकांना अंधविश्वासू बनू नये. – श्री. कुळकर्णी – श्रीमत दर्शन साप्ताहिक दि. १५-२२ २००४

——————-

वर्तमानपत्रे वृत्तपत्रे व मासिकांमधून अश्या प्रकारे परीक्षणे व समीक्षणे चापून आली. पुस्तके खरेदी करून वाचलेल्या वाचकांनी ताबडतोब आपल्या प्रतिक्रिया लिहून कळविल्यात त्यापैकी काही –

श्री. वा. रा. डोईफोडे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व परमार्थप्रवणता यांच्या सहवासात प्रत्यायात आली. ज्या ज्या लेखकांनी त्यापेक्षा वेगळे योग स्वतः निवडून मराठी सारस्वतात ‘स्वप्नांची दुनिया’ लिहून मोलाची भर घातली आहे. त्यांची प्रतिभाशाली कल्पकता आणि चौफेर वाचन याची साक्षही निर्मिती आहे – प्रा. श्री. व सौ. जोशी, नांदेड

डॉ. फ्राईडचे संशोधन आजचे निकष लावले तर सायंटिफिक नाही असे आजच्या मान्यता प्राप्त मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तरी पण त्याला पूर्णपणे नाकारता येत नाही. ‘स्वप्ने हि भविष्यसूचक असतात’ असा आपला सिद्धांत व तो सिद्ध करण्यासाठी आपण काही उदाहरणे दिली आहेत. किंतु आपणही वापरात असलेली स्वप्नांचे अर्थ काढण्याची पद्धती ही पूर्ण पणे अचूक आहे असे म्हणता येत नाही. यासाठी आणखीन बरीच स्वप्ने अभ्यासण्याची गरज आहे. तरीसुद्धा आपण लिहिलेल्या या पुस्तकांमुळे मागे पडलेल्या स्वप्नशास्त्राच्या विषयाचा पुन्हा एखादा झाला. आपला प्रयत्न चांगला आहे पण अजून सविस्तर अभ्यास व्हावा – सौ. साधना कामत, मानसशास्त्रज्ञ, मुंबई

हैद्राबाद निवासी – उसमानिया विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख – प्रो.श्री.एस.आर.कुळकर्णी यांनी आपल्या १९९० सालच्या आपल्या पत्रानं ‘स्वप्नांची दुनिया’ या पुस्तकांबद्दल श्री. वा. रा. डोईफोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या पुस्तकाचा विषय व त्यासाठी केलेल्या प्रयत्नपूर्वक अभ्यासाचे श्री. कुळकर्णी यांनी पत्राद्वारे कौतुक केले. पुस्तकाचे वितरण ही लेखकाच्या दृष्टीने फार गरीब बनत चाललेली समस्या आहे आणि त्यात आपले पुस्तक व त्यात हाताळलेले विषय हा पण अत्यंत वेगळा विषय आहे.’ अशी काळजी पण या पत्रातून व्यक्त प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

‘स्वप्नांची दुनिया’ हे आपले पुस्तक संपूर्ण वाचले, आवडले व पटलेली माझ्या स्वप्नांचा पडताळासुद्धा आला. विशेष म्हणजे माझ्या संबंधित स्वप्नांविषयी आपल्या पुस्तकातील स्वप्नकोषातील स्वप्नदृश्य व स्वप्न्फल व दिलेले अनुभव आणि त्यानुसार मला मिळालेले उत्तर अगदी तंतोतंत जुळले. आपले पुस्तक खरोखरच योग्य मार्गदर्शन करणारे आहे, असे पत्राद्वारे श्री. भास्कर केवले जोगेश्वरी यांनी आपले या पुस्तकाचे मत कळविले होते.

आपले पुस्तक फारच आवडले. अत्यंत अभ्यास पूर्व आहे. खूप मेहनत घ्यावी लागली असेलच आपल्या मेहनतीबद्दल धन्यवाद ही स्वप्नांची दुनिया आपल्या स्वप्नांची पुरती करो ही सदिच्छा! – असे आपल्या पत्रातून श्री. एस. आर. पाटील, हिंगोली यांनी कळविले आहे.

अश्या प्रमाणेच श्री. बी. बी. लाखकर, हायकोर्ट वकील, औरंगाबाद, श्री. सुमेध रिसबूड, विलेपार्ले(पू.), श्री. प्रकाश चांदे, डोंबिवली, श्री. अ. ज. रोडे, वकील, हिंगोली, श्री. भाले, वकील, हिंगोली, श्री. एस. डी. देव, परभणी, श्री. एस. एच. शिरोडकर, पुणे आणि आणखीन बरेच या साऱ्यांनी ‘स्वप्नांची दुनिया’ एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी शास्त्र संमत, धरणी वाचनीय व भाषा प्रासादिक आहे. सहज सरळ व सराईत शब्दांमुळे पुस्तकाची भाषा शैलीदार व रोचक बनली आहे. आणखी एक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे अत्यंत अभिनव विषयांतील एक अभिनव व एकमेव पुस्तक म्हणून विशेष अभिनंदन!


61 Comments

सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल
स्वप्नदृश्य व स्वप्न्फल