background

प्रस्तावना

मी आजपर्यंत अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहे आणि त्यापासून समाधानही लाभलेले आहे. माझे सन्मित्र श्री. वा. रा. डोईफोडे यांचे “स्वप्नांची दुनिया – अर्थ आणि विश्लेषण” हे पुस्तक प्रस्तावना लिहिण्यासाठी वाचल्यानंतर निराळाच अनुभव आला. करमणूक झाली; सात्विक स्वरुपाची; आणि माझ्या ज्ञानाच्या लॉकरमध्ये एक नवा आकर्षक अलंकार ठेवायला मिळाला. स्वप्न हे एकप्रकारचे जीवनच; त्याचा सर्वस्वी नवाच अर्थ गवसला. त्यामुळे श्री. डोईफोडे यांचा सुखद सहवास लाभला आणि त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली हा मोठा लाभच झाला.

अध्यात्म बाजूला सारलेले

जीवनातील कोणत्याही घटनेकडे नेहमी अध्यात्म दृष्टीने पाहावयाचे, अशी मला सवय लागलेली. स्वप्न म्हटल्याबरोबर मला सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या एका सूत्राची आठवण झाली. “संसारु म्हणिजे हा दीर्घ स्वप्नुगा.” मांडूक्य उप्निषदावरील गौडपादाचार्यांच्या कारिकांचे स्मरण झाले. त्यातल्या वैतथ्य प्रकरणात जागृती व स्वपन या दोन अवस्थांची तुलना करून, जसे स्वनातील पदार्थ खोटे तसेच जागृतीतील पदार्थही खोटे असा त्यांनी निष्कर्ष काढलेला.

“अन्तः स्थानातु भेदाना त्स्माज्जागरिते स्मृतम्

यथा तत्र तथा स्वप्ने संवृतत्वेन भिध्यते”

या श्लोकात हा निष्कर्ष मांडलेला आहे. हि अध्यात्म्गर्भ स्वप्नदृष्टी ज्ञानेश्वरीतही आढळते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील हि ओवी पाहा :

“परि मध्ये जे प्रतिभासे | ते निद्रिता स्वप्ना जैसे |

तैसा आकारू हा मायावशे | सत्वरूपी”

श्री. डोईफोडे यांनी स्वप्नाचा हा अध्यात्मसापेक्ष विचार आपल्या विवाचनाच्या कक्षेतून बाजूला सारलेला आहे. त्यांचा स्वप्नविचार हा व्यावहारिक पातळीवरचा आहे, मानसशास्त्रीय भूमिकेवरच आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आहे; आणि व्यावहारिकाना, सांसारिक जनांना लाभदायकही आहे.

गैरसमजाचे निराकरण

अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत. १. व्यतिरेक २. अन्वय. व्यतिरेक पद्धतीमध्ये आधी असताचे निराकरण केलेले असते आणि नंतर सताचे उद्घाटन केलेले असते. श्री. डोईफोडे यांनी व्यतिरेक पद्धतीचा अवलंब केलेला आहे.  या पुस्तकातील पहिले प्रकरण मोठे खुमासदार आहे. त्यात मिस्कील विनोद आहे. चिमटे आहेत. ज्यांना घेतले असतील त्यांच्या अंगी खेळाडूपणा नसेल तर ते त्यांना बोचतील; पण वाचणाऱ्यांना मात्र गुदगुल्या होतील. श्री. डोईफोडे हे तर वृत्तीनेच विनोदी आहेत. त्यांच्या विनोदात मर्मभेदकपणा आणि खेळकरपणा यांचा सुंदर संयोग झालेला आहे.

स्वप्न हा प्रकार प्रत्येक माणसाच्या परिचयाचा आहे. ज्याला आयुष्यात कधीही स्वप्न पडलेच नाही असा माणूस शोधून तरी सापडणे शक्य आहे काय? कधी स्वप्नातील दृश्ये भीतिदायक वाटतात. कधी आनंदकारक वाटतात. कधी चमत्कारिक आणि अर्थहीन वाटतात. स्वप्ने का पडतात, त्यांचा अर्थ कसा लावावा यासंबंधी अनेक गैरसमज आहेत. स्वप्नाच्या वास्तव स्वरुपाभोवती, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे, गैरसमजांचे जाळेच पसरलेले आहे. श्री. डोईफोडे यांनी सूक्ष्म अभ्यास करून या गैरसमजाचे अनेक प्रकार सोदाहरण नमूद केलेले आहेत. या सर्व गैरसमजांचे त्यांनी बिनतोड युक्तीवाद्चातुर्याने निराकरण केलेले आहे. स्वप्न आहा निसर्गाचा खेळ आहे. ते एक विलक्षण गूढ आहे. ते गूढ, त्यातील रहस्य, त्यातील अंतर्हित अर्थ उकलून दाखविण्यात श्री. डोईफोडे निश्चितच यशस्वी झालेले आहेत.

स्वप्नाची प्रायोगिक चिकित्सा

विनोदी माणूस हा बहुधा अव्यवस्थित, बेशिस्त आढळतो. श्री. डोईफोडे विनोदी आहेत, पण व्याव्स्थाप्रिय आहेत. त्यांची रचना नेटक्या शिस्तीने बांधलेली आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. आधी अंधश्रद्धांचे निरसन मग फ्राइडच्या स्वप्नमांडणीतील अपुर्वतेचे दिग्दर्शन, मग आपल्या स्वतंत्र संशोधनाची जोड देऊन केलेले पूर्ण स्वप्नसिद्धान्ताचे मंडण. नंतर, आपला सिद्धांत यथार्थ कसा हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग. त्यासाठी त्यांनी पंधरा स्वप्ने निवडलेली आहेत. यातील काही त्यांची स्वतःची आहेत, काही इतरांची आहेत. ही स्वप्प्ने अत्यंत मनोरंजक आहेत आणि त्यासंबंधी श्री. डोईफोडे यांनी केलेला खुलासा अतिशय बोधप्रद आहे. ही स्वप्ने व त्यांचे खुलासे वाचल्यानंतर काही वाचक अंतर्मुख होतील. त्यांना वाटेल, श्री. डोइफोडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपणासही पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लावणे शक्य आहे. या पुस्तकाच्या कोणत्याही वाचकास, आपणास पडलेल्या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा यासंबंधी निश्चित मार्ग दाखवण्यासाठी शेवटचे चौथे प्रकरण रचलेले आहे. अमुक प्रकारचे दृश्य स्वप्नात दिसले म्हणजे त्याचे फल अमुक, याची लांबलचक यादिच त्यांनी दिलेली आहे. ही यादी देऊन स्वप्नार्थजिज्ञासू वाचकांवर श्री. डोईफोडे यांनी मोठे उपकारच केलेले आहेत.

अभिनंदन

स्वप्न हा प्रत्येक माणसाच्या अनुभवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. त्यासंबंधी श्री. डोईफोडे आणि या पुस्तकात केलेले विवेचन रोचक तसेच लाभप्रदही झालेले आहे. स्वप्नाचा अर्थ लावण्याची किल्ली श्री. डोईफोडे यांनी प्रत्येकाला उपलब्ध करून दिलेली आहे. स्वप्नासंबंधी मौलिक व अत्यंत उपयुक्त संशोधन लोकांपुढे सादर केल्याबद्दल श्री. डोईफोडे यांचे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच होईल!