background

डॉ. सिगमंड फ्राईड – स्वप्नमीमांसा

पहिल्या भागात स्वप्नाबद्दल असणाऱ्या भ्रामक कल्पना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्न्शास्त्राकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित असू नये. शक्यतो तर्कशास्त्राच्या तसेच मानसशास्त्राच्या आधारे दोन्ही शास्त्रांच्या मर्यादा न ओलांडता हा प्रयत्न केला आहे.

स्वप्नावरील पुस्तक लिहित असताना डॉ. सिगमंड फ्राईडचा उलेख न करणे निश्चितच कृतघ्नता ठरेल. म्हणून डॉ. सिगमंड फ्राईड यांचा अल्प परिचय देऊन त्यांचा थोडक्यात सिद्धांत आणि स्वप्नाबाबतची मते जी त्यांनी “मनोविश्लेषण” पद्धतीने मांडली आहेत ती देऊन त्यांचा परामर्ष या भागात घेण्याचे ठरवले आहे.

डॉ. सिगमंड फ्राईड – अल्प परिचय

“स्वप्न-योग अथवा स्वप्नाचा अर्थ” या छोटेखानी पुस्तकात स्वामी शिवतत्त्वानंद यांनी डॉ. सिगमंड फ्राईडचा अल्प परिचय आणि सिद्धांत अगदी थोडक्यात देऊन भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांच्या सिद्धांताचा परामर्ष घेतला आहे. त्यातूनच आवश्यक तेवढी माहिती येथे देत आहे.

इसवी सन १७५६ साली झेकोस्लोव्हाकियात ज्यू आईबापांच्या पोटी सिगमंड फ्राईड यांचा जन्म झाला. फ्राईड हे व्यवसायाने डॉक्टर होते. आपल्या धंद्यातील औषधाच्या मिश्रणापेक्षा स्वतःच्या धंद्याच्या शास्त्रीय बाजूकडेच त्यांचे अधिक लक्ष व रुची होती. रोग्याशी प्रत्यक्ष संबंध आणि स्वतःची शास्त्रीय प्रतिभा ह्यांच्याद्वारे डॉ. सिगमंड फ्राईड यांना मानवासंबंधी विलक्षण साक्षातकार झाला. त्यांना मानवाचे एक आगळेच दर्शन घडले. त्यांना असे आढळून आले की, माणसाला होणाऱ्या रोगांपैकी कितीतरी रोग असे असतात की ते दिसतात शारीरिक, पण त्यांचे कारण असते मात्र मनात. उदाहरणार्थ, रोग्याला झाला आहे अर्धांगवायू; परंतु डॉक्टरी परीक्षेत दिसून आले की बिघाड शरीरात वा इंद्रियात नसून त्यांच्या क्रियेत(Functional) आहे. बह्यादृष्ट्या अर्धांगवायूची लक्षणे आहेत, पण ज्या भागात ती लक्षणे दिसत आहेत तो भाग डॉक्टरीदृष्ट्या अगदी निकोप आहे. त्यांना होता होता असेही आढळून आले की रोग्याचे शरीर निकोप असले तरी मन निकोप नाही. काही विशिष्ट वासना, काही अत्यंत प्रबळ इच्छा, काही कारणांनी दाबून-दडपून टाकाव्या लागल्यामुळे ज्ञानतंतुवर ताण पडून त्या रोग्याच्या शरीरात या विशिष्ट रोग्याची बाह्य लक्षणे दिसत आहेत. त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक गोष्ट हि की, आपल्या विशिष्ट मानसशास्त्रीय प्रक्रियेने त्या रोग्याच्या त्या दबलेल्या किंवा दाबलेल्या वासना-इच्छा ‘मोकळ्या’ करताच औषधाशिवाय त्यांचा रोग बरा झाला. याचा त्यांना वारंवार अनुभव येत गेला. आणि त्यांनी आपले लक्ष रोग्याच्या “मना” कडे वळविले. ते शरीरशास्त्राचे मानसशास्त्रज्ञ बनले.

डॉ. सिगमंड फ्राईड यांचा सिद्धांत

प्रतिभाशाली डॉ. सिगमंड फ्राईड हे मानवी मनाचे दोन भाग मानतात. त्यातील एका भागाने आपण जगाशी व्यवहार करीत असतो. परंतु आपल्या मनाचा बराच मोठा भाग या आपल्या दैनंदिन व्यवहारात प्रत्यक्षपणे भाग घेत नसतो. इतकेच नव्हे तर आपल्या मनाच्या अंधाऱ्या भागात काय काय दडलेले आहे किंवा दडविलेले आहे याची आपल्याला जाणीवही नसते. पहिल्या भागाला फ्राईडनी नाव दिले ‘जाणीव युक्त मन’ (Conscious Mind) आणि दुसऱ्याला नाव दिले ‘नेणीवयुक्त मन’ (Unconscious Mind). डॉ. सिगमंड फ्राईड यांना असे आढळून आले की स्वतःच दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच ज्या वासनांची रोग्यांना जाणीव नसते, त्या वासना-इच्छा या ‘नेणीवयुक्त’ मनात डांबल्या गेलेल्या असतात. वासना किंवा इच्छारुपी या प्रबळ प्रेरणांच्या अंगी प्रचंड शक्ती असते. ही शक्ती अशा जबरदस्तीने डांबली गेल्यामुळे ती ज्ञानतंतुंवर दाब आणून शारीरिक विकृती वा रोग औषधाशिवाय आपोआपच बरा होतो. मानवी मनाच्या क्रिया-प्रक्रियांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला “मानसशास्त्र”(Psychology) म्हणतात. मनाच्या या क्रिया-प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन, मनाचे विश्लेषण(Analysis) करून त्या बाह्य क्रिया-प्रक्रियां आतील हेतू, प्रवृत्ती वैगरेंचे अनुशीलन करीत असल्यामुळे फ्राईडच्या मनोविद्येला “मनोविश्लेषण”(Psycho-Analysis) म्हणतात. मानवी मनाचा तळ फ्राईडपूर्वी कोणीही गाठण्याचा प्रयत्न केला नाही. उलट “मन हे चंचल मोठं बर! या चंचल मनाचा थांग कोणालाही लागलेला नाही. महाराजा, सागराच्या तळाशी कधीतरी मनुष्य जाऊ शकतो का? त्यापेक्षाही कैकपटींनी मनाचा तळ आहे महाराजा” अशी हरदासी संगीतमय थाप मारून सुसंबद्ध पळवाट काढून प्रयत्नातून काढता पाय आपण घेतला. फ्राईडच्या पूर्वी कोणाही माणसाने “जाणीवयुक्त” मनाचा भेद करून “नेणीव”त शिरून मनाचा तळ गाठण्यात प्रयत्न करून यश मिळविले नाही. या यशस्वी संशोधनामुळे मानसशास्त्रात पडलेली भर निःसंशय प्रशंसनीय म्हणावी लागेल.

Swapnanchi-Duniya-4

फ्राईडचे ‘काल’चे अर्धसत्य. माझे ‘उद्या’चे अर्धसत्य. दोन्ही मिळून एक पूर्ण सत्य.

रोग्याचे असे मनोविश्लेषण करताना डॉक्टर सिगमंड फ्राईड यांना असे आढळून आले की नाना कारणांनी रोगी आपल्या ज्या वासना किंवा इच्छा दाबून टाकीत असतो त्या वासना-इच्छा या प्रामुख्याने लैंगिक वा कामुक स्वरूपाचा असतात. त्या वासना मनात बाळगणे व तदनुसार वागणे धार्मिक विधीनिषेधामुळे, नीती-अनीतीच्या कल्पनांमुळे, सामाजिक बंधनामुळे, लोक काय म्हणतील या लाजेमुळे वा भयामुळे अशक्य झाल्यामुळे माणूस त्या दाबून टाकतो. इथपर्यंत डॉ. फ्राईडचे म्हणणे बरेचसे समाधानकारक आणि सयुक्तिक वाटते. या बाबतीत त्यांच्या व्यावसायी बंधूचे पण दुमत नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.

सिद्धांताचा अतिरेक

डॉ. फ्राईड हे धंद्याने डॉक्टर होते. त्यांचा रोग्याशी संबंध येणारच. या रोग्यात विकृत रोग्यांचा भरणा जास्त होता. अशांचे मनोविश्लेषण करून त्यांनी एक सिद्धांत बांधला की “काम” हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. याकरिता “नव्या नीती”ची स्थापना केली पाहिजे. या नीतीचे एकमेव ध्येय राहिलं मानवाची कामवासना “नीट” व्यक्त, संचालित आणि तृप्त करणे.

डॉ. सिगमंड फ्राईडचे परम मित्र श्री.अड्लर आणि युंग आणि इतर चाहते यांचे या मताबद्दल तीव्र मतभेद झाले आणि त्यांनी डॉक्टरांना सोडून दिले. डॉ. फ्राईडच्या मते माणूस हा एक कामवासनेचे भेंदाळे आहे, याशिवाय अधिक काही नाही. हे मत देखील मनोवैज्ञानिकात मतभेद निर्माण करूनच गेले. अशा रीतीने या “काम” रत्नांनी फ्राईडला झपाटून टाकले. मुळचा कामप्रवूत्ती अत्यंत प्रबळ असलेला फ्राईड वरील स्वतःच्याच विचाराचा एक “रोगी” बनला. कावीळ झालेल्याला जसे “पिवळे” दिसते आणि त्याचे डोळेही पिवळेच होऊ लागतात त्याप्रमाणे डॉक्टरांना “कामकावीळ” झाली. परिणाम असा झाला, मनाचा तोल गेलेले विकृत रोगी आणि त्यांची स्वप्ने आणि तोल न गेलेल्या माणसांची स्वप्ने ही “कामकावीळ” या सदरातच त्यांनी टाकली.

मनोवैज्ञानिकांनी डॉक्टरांचा सिद्धांत अर्धवट आणि घातकी ठरवला आहे. हा विषय मनोवैज्ञानिकांचा असल्यामुळे त्यांच्यावरच सोपवून देऊ आणि डॉक्टरांच्या स्वप्नावरील मतांचा परामर्ष घेऊ.

सिगमंड फ्राईड आणि स्वप्ने

माणसाला स्वप्ने पडू लागली तेव्हापासून माणूस त्याचा अर्थ काय? ती का पडतात? त्यात काही आहे का? यावर विचार करू लागला. नव्हे तर तो एक त्याचा चाळाच झाला. मुठभर माणसं सोडली तर जगात स्वप्न पडत नाहीत अशी माणसं मिळणे दुर्मिळ. बहुतेकांना मान्य असलेला अर्थ म्हणजे ‘स्वप्ने ही भविष्य दर्शवितात,’ हा होय. पण डॉ. सिगमंड फ्राईडच्या मते “स्वप्ने ही वस्तुतः भूतसुचक अथवा गतकाळाची निदर्शक असतात. त्यात भविष्य असं नसतंच. स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे वेषांतर.”

डॉ. फ्राईड स्वप्नाकडे कसे वळले हे पाहणे आवश्यक आहे. रोग्याच्या कोंडल्या गेलेल्या वासना-शक्तीला मुक्त करून क्षीण केल्यास इतर कोणतेही उपाय न करता रोग कायमचे नाहीसे होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून देऊन वैद्यकीय क्षेत्रात एक अभूतपूर्व किमया करून दाखवली. परंतु आता त्यांना प्रश्न पडला की प्रत्येक वेळी रोग्याच्या “नेणीवे”त रोग्याने काय दडवले हे कसे ओळखायचे? तेथपर्यंत पोहोचायचे कसे? याकरिता त्यांनी रोग्यांना “विश्वासात घेऊन” चुचकारून पहिले, प्रसंगी “संमोहन” विद्येचा वापरही करून पाहिला. तरीही रोगी दाद देईना. मग याच्यावर उपाय काय? काय करायला हवे म्हणजे रोग्याच्या भावना मोकळ्या होऊन त्याचे स्वप्न कळेल? या विचारांनी डॉक्टरांना खूप डोके शिणवावे लागले.

त्यांना वरील गोष्टीकरता हवी होती एक अशी अवस्था की ज्यावेळी रोगी बेसावध राहील पण बेशुद्ध राहणार नाही. ज्यावेळी अगदी “मनातले” बाहेर पडलेले असेल, पण ते कुणाला सांगताना त्याला तितकीशी लाज वाटणार नाही. खूप विचार करता करता या भाग्यवंताला याची किल्लीच सापडली आणि आयुष्यात फक्त एकदाच उगवत असणाऱ्या “अंतर्दृष्टीचा क्षण” त्यांच्या जीवनात तरळला. त्यांना त्यांच्या विलक्षण प्रतिभेने साथ दिली आणि साद ऐकू आली “अरे वेड्या, ती अवस्था म्हणजे स्वप्न. फक्त स्वप्न या अवस्थेत मनुष्य बेसावध असतो. पण बेशुद्ध नसतो. त्या वेळी त्याच्या ‘मनातले’, त्याच्या ‘नेणीवे’तले बाहेर येत असते. जागे झाल्यावर त्याला दुसऱ्याला स्वप्न सांगताना कानकोंडे वाटत नाही. याचे कारण असे की स्वप्नात केलेल्याला, भोग्लेल्याला आपण जबाबदार नसतो अशी त्याची भावना असते. स्वप्नात व्यक्ति आपल्या स्वेच्छेने कधीही काहीही करू शकत नाही हे एक त्या मागील सत्य होय.”

आता डॉक्टरांनी विकृत रोग्यास लावलेला, “मनोविश्लेषणा”चा नियम आणि पद्धती त्यांच्या स्वप्नासही लावल्या. स्वप्नाबद्दल त्यांचे ठाम मत असे की, “स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे वेषांतर”. हे सिद्ध करीत असताना त्यांनी एक पद्धत अवलंबिली, ती अशी – रोग्यांनी त्यांना स्वतःचे स्वप्न सांगायचे आणि त्यांनी स्वप्नातील घटना व वस्तू यावरून नेविणेत दबलेली कोणती वासना त्या स्वप्नात व्यक्त होत आहे हे आपल्या प्रयोगानी व अनुभवांनी बसवलेल्या ठोकताळ्यावरून अज्मावयाचे. थोडक्यात म्हणजे त्या स्वनातील वस्तूंच्या आणि घटनांच्या वेशात किंवा स्वप्नातील त्या वस्तूंच्या व घटनांच्या “प्रतिकाच्या” रूपाने त्या रोग्याची दबलेली “कोणती” वासना व्यक्त झाले हे ओळखायचे. या पद्धतीसच “स्वप्नाचा अर्थ लावणे” असे संबोधले गेले. पुढे त्यांनी ठामपणे एक अर्धसत्य सांगितले ते असे. स्वप्ने ही “पुढे काय घडणार आहे” हे दाखवीत नसून त्या रोग्याची कोणती प्रबळ वासना त्याच्या नेणीवेत दाबली गेली आहे, म्हणजेच त्याच्या “गत जीवनात काय घडले आहे” हे दाखवतात, म्हणजेच स्वप्ने माणसाचे भावी जीवन सुचवीत नसून त्याचे गत जीवन दर्शवितात. (लेखक या मताशी सहमत नाही. हे एक अर्धसत्य असून हे विधान पूर्वग्रहदुषित आहे हे पुढे सिद्ध करणार आहेच. म्हणून स्वप्नाच्या प्रतीकांची मीमांसा खाली केली आहे.)

नियतीनी या भाग्यवान माणसावर फार मोठी कृपा केली होती. इ. स. १९०० पर्यंत पृथ्वीतलावरील कोणाही माणसास जाणीवेचा आणि नेणिवेचा भेद करता आला नाही. ते भाग्य डॉक्टरांच्या वाट्याला आले. मनोविश्लेषण पध्दती निर्माण करून त्यांनी निःसंशय मानवावर अनंत उपकार केले. आपल्या या मनोविश्लेषणाच्या अद्भुत किल्लीने डॉक्टरांनी नेणिवेच्या अगम्य, गूढ, रहस्यमय अंधारकोठड्या लीलेने उघडून, त्यात कोंडल्या गेलेल्या सळसळत्या, गरगरत्या, उसळत्या वासनाशक्तींना मोकळे करून कितीतरी असाध्य रोग्यांना कायमचे रोगमुक्त करून मानवजातीच्या कृतज्ञ आशीर्वादांची जोड केली. जगात एक खळबळ माजली. वैद्यकात नवीन पायंडा पडला. मनोविद्येत नवा मनू सुरु झाला आणि आधुनिक जगाच्या जीवन्स्त्रोताने एक नवीन वळण घेतले.

नियतीनी प्रसन्न होऊन डॉक्टरांना एका दुसऱ्या प्रचंड रत्नभांडाराचे दार उघडून दिले. आत शिरताना नियतीने सुचना दिली, ”डॉक्टर,या रत्नभांडारातून तुम्ही कोणतेही एक रत्न घेऊ शकता. परत दुसरे रत्न मिळणार नाही. दालन कायमचे बंद राहील.” डॉक्टरांनी या दालनात प्रवेश केला. असंख्य रत्ने पाहून डॉक्टर हबकून गेले. त्यांना आपल्या मूळच्या कामुक प्रवृत्तीवर मात करता आली आणि त्यांनी एक रत्न घेतले. ते होते फक्त “काम” रत्न.

एखाद्या भिकाऱ्यास त्याच्या गोड गळ्यावर प्रसन्न होऊन राजानी आपल्या सुवर्ण भांडारात त्याला नेऊन म्हणावे, ”मी तुझ्या गोड गळ्यावर प्रसन्न झालो आहे. घे, यातील हवी ती सुवर्णाची वस्तू घे.” त्या मूळच्या भिकाऱ्यानी फक्त एक सोन्याची कटोरी उचलली आणि तो राजाला म्हणाला, “आता ही कटोरी घेऊन मी भिक्षा मागेन.” तसाच प्रकार डॉक्टर फ्राईड यांच्या बाबतीत घडला.

आपल्याकडे अतिकामुक वृत्तीची माणसे होऊन गेलीत. पण क्षणिक कामकुतेचा प्रत्यय येताच त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. संत तुलसीदास संत होण्यापूर्वी अतिकामुक होते. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोळ्यापुढे चोवीस तास असलेली कामवासनेची वखवख माणसाच्या क्षणिकतेचे चित्र पुढे करून त्यांना जंताचा संत केला. जोवरी मांस तोवर वास. नंतर राहतील ती फक्त हाडे अन् ती चघळावी लागतील कुत्र्या सारखी. माणसासारखा माणूस असून तुला व्हावे लागेल फक्त कुत्रे, अन् तेही पिसाळलेले.

तुलसीदास जीवन बदलू शकले पण सिगमंड फ्राईड आपले जीवन बदलू शकले नाही. एक झुंझार चिवट ज्यू, अडीअडचणींना भीक न घालता एक प्रचंड कार्य करू शकला. पण स्वतःच्याच वासनेच्या प्रवाहात वाहत गेला. जीवनाचा काळाकुट्ट भाग अधिक काळाकुट्ट झाला. त्याचे द्योतक आहेत त्याची प्रस्थापित “प्रतिके”.

स्वप्नात येणाऱ्या वस्तू आणि दृश्ये याचा अर्थ सांगण्याचा मान प्रथम इजीप्शियानांना जातो. नंतर जसाजसा प्रचार होत गेला तसे यास प्रत्येक भाषेत स्थान मिळत गेले. स्वप्नाची फळे ही एका व्यक्तीची नव्हेत. पण ज्यांना ज्यांना सारख्या वस्तू आणि दृश्ये दिसत गेली आणि त्यांचे परिणाम ढोबळ मानाने सारखे दिसू लागले, त्या त्या वेळी त्या वस्तू – द्रव्य – त्या परिणामाची प्रतीके ठरली. यात विशेष गंमत दिसेल ती ही की सर्व शुभ स्वप्नांची प्रतीके सारखीच आहेत. तशीच अशुभाची अर्थात ढोबळ मानानी. उदाहरणार्थ, पांढऱ्या रंगाची वस्तू दिसणे ही सर्व धर्मात शुभच मानली आहे. पुढे पुढे मनन, चिंतन आणि अनुभव या आधारावर यास फाटे फुटले आणि वस्तू त्याच रंगाची असून देखील शुभ न ठरत अशुभ ठरू लागली. याचे उदाहरण म्हणजे पांढरा भात, पांढरी राखाडी आणि गोरा ब्राह्मण (भिक्षुक, पुरोहित या अर्थी) ही अशुभ ठरली. तर काळ्या रंगाची वस्तू असूनही ती शुभ ठरली ती काळी गाय, काला ब्राह्मण इत्यादी. मी एका स्वप्नात हे दिले आहे.

आता डॉ. फ्राईड यांच्या प्रतीकांकडे बघू. काडी, चाकू, सुरा, दौत, टाक, भुसभुशीत जमीन, गुहा, नारळ, पपई, गोल गोल आकाराची फळे (मग ती कोणत्याही रंगाची असोत) हरळी आणि ध्वज – यादी मोठी होईल म्हणून ही थोडी प्रतीके, भाताची शितावरून परीक्षा देण्यास पुरेशी आहेत.

जगाच्या कोणत्याही भाषेतील पुस्तकात या वस्तूंचा अर्थ त्या वस्तूच आहे असा घेतला जातो. स्वप्नफलाकरता या वस्तू सूचक या सदरात मोडणाऱ्या पण नाहीत. पण ज्या आहेत त्यांचे फळ निश्चित ढोबळ मानानी ठरले आहे. उदाहरणार्थ, नारळ, यास श्रीफळ म्हणून संबोधण्यात येते व ते “शुभ” या सदरात मोडते. ध्वजाच्या बाबतीत ध्वजाचा रंग विचारात घ्यावा लागतो. काठी नव्हे. कारण ध्वज हा काठीशिवाय उभाच राहू शकत नाही.

आता सिगमंड फ्राईडनी या वस्तूंकडे आपल्या विकारी दृष्टीतून बघितले आणि ही प्रतीके म्हणजे स्त्री पुरुषांच्या दडपलेल्या वासनाच होत, त्या फक्त वेषांतर करून आल्या इतकेच, असे ठासून सांगितले. त्यांनी काठी, चाकू, सुरा, टाक ही पुरुष जननेंद्रिये मानली, तर दौत, गुहा, भुसभुशीत जमीन ही स्त्री जननेंद्रिय मानली. नारळ, गोल मोठाली फळ आणि हरळी हि कसची प्रतीके असावीत हे सुज्ञ वाचकास सांगण्याची गरज नाही. अशा रीतीने फ्राईडने आपल्या मनातील घाण या प्रतीकांवर फेकून स्वतःचीच एक सुप्त “कामेच्छा” तृप्त करून घेतली असे म्हणावयास हरकत नाही. आता या प्रतीकांकडे नजर टाकली तर आपणास असे आढळून येईल की ज्या वस्तूच्या गुणधर्माचे साम्य स्त्री-पुरुषाच्या जननेंद्रियाशी काही अंशी मिळते जुळते आहे, केवळ काही अंशी साधर्म्य असल्यामुळे त्या वस्तू “त्याचीच” प्रतीके होऊ शकतात, दुसरी प्रतीके होऊच शकत नाही. असे होऊ शकते का? याचे उत्तर नाही. स्त्रीपुरुषाच्या जननेंद्रियाशी साम्य नसलेल्या वस्तू स्वप्नात येउच शकत नाहीत काय? उत्तर नाही. काठी हे पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतीक असेल तर पुरुषाचे जननेंद्रिय हे कसचे प्रतीक आहे? उत्तर नाही. विष्ठा, घाणेरडी टोपी, महारोगी, गाय, वाघ, कावळा ही काय दडलेल्या लैंगिक भावनांची-वासनांची प्रतीके होऊ शकतात? उत्तर नाही. वरील वस्तूंचे स्त्री-पुरुषाच्या जननेंद्रियाशी कोणतेही साम्य नाही. तरी ती प्रतीके आहेत. फ्राईड सोडून इतर यांस मान्यता देतातच.

लैंगिक भावना-वासना – या भुतांनी या डॉक्टरला भोगाचा रोगी बनवला. जसा रोगी तसा डॉक्टर. दोघांच्याही ध्यानी मनी लैंगिक भावना. या भावनेनी व भूतकाळातील भुतांनी डॉक्टरांना “भविष्य काळात” उडी मारू दिली नाही.

डॉ. फ्राईडनी तसं पाहिलं तर “स्वप्नात भविष्य नसतं” हे विधान करून निसर्गाचा अपमानच केला आहे. निसर्गाइतकी विलक्षण समता कोठेही सापडणार नाही. त्यातल्या साम्तेत केसाचाही फरक पडत नाही. अगदी उदाहरण देऊनच सांगावयाचे झाले तर डाव्या डोळ्याच्या पापणीला जेवढे केस असतात तेवढेच उजव्या डोळ्याच्या पापणीला सापडतील. जो निसर्ग काल पडलेल्या स्वप्नात कालच्या काळ स्मृतीकक्षेच्या बाहेर गेलेल्या गोष्टी वेषांतरित स्वरुपात दाखवू शकतो, त्या निसर्गास भविष्यकाळात घडणाऱ्या घटना अगदी लीलया दाखवता येतातच. अर्थात दोन्हीतही वेषांतर आहेच.

खरा नाट्य रसिक जसा पात्रास बघून कोणता हा नात आहे हे जसे अचूक ओळखतो, तसेच स्वप्नातल्या वस्तू-दृश्य ही कोणत्या घटनेची “सूचक” पात्रे आहेत हे जाणकार ओळखतात. आणि अशांचीच ती प्रतीके भविष्य दर्शवितात असे निश्चित सांगितले आहे.

फ्राईड स्वप्नात भूतकाळात दडलेल्या लैंगिक वासनाची भुते असतातच असे नव्हे तर त्यात भविष्यात घडणाऱ्या घटना सांगणारे दूत पण असतात. हे लक्षात न घेता आपण हे दालन आपल्या हातानी कायमचे बंद करून घेतले. ज्या निसर्गाने-नियतीने- आपणावर प्रसन्न होऊन एवढी दिव्य प्रतिभा आपणास मुक्त हस्ते अर्पण केली त्या निसर्गाला आपण अर्धवट ठरून मोकळे झालात. काही काळ जग भारले गेले. सत्य-सत्य म्हणून ओरडले पण शेवटी नियतीने या पक्षपातीपणाचा सूड उगवला. आपणास पश्चातापदग्ध व्हावे लागले आणि प्रांजळपणे आपण कबूल केले ते असे.

“जगातले अशक्य” ते तीन आहेत. पहिले अशक्य म्हणजे “सुरळीत राज्यकारभार”. तो कधीच, कुणाकडूनही अशक्य. दुसरे अशक्य म्हणजे मुले “नीट” वाढवणे हेही कधी शक्य नाही. आजकाल जाणवू लागलेले तिसरे अशक्य म्हणजे “मनोविश्लेषणाने” रोग बरा करणे. एवढ्या पोलादी पुरुषाला आपल्या मनोविश्लेषणाबद्दल एवढा पराभव स्वीकारावा लागला तेथे त्यास स्वप्नाच्या अर्थाबद्दल बोलावयास शब्दच सापडले नाहीत यात नवल ते कसले.

फ्राईडच्या “प्रतीका”ची आपण लावलेली वाट बघितलीच आहेच. आता त्याचे “वेषांतर” बघू. स्वप्नात वेष बदलून येतात असे तो म्हणतो व तेही भूतकाळातील. भविष्यकाळ त्याने अंधारातच ठेवला. साधी गोष्ट तो विसरला की “उद्या” हाच परवा “काल” होतो. एक गमतीदार घटना देऊन स्वप्नात वेषांतर करून “दूत”ही येऊ शकतात हे दाखवतो.

मी मुंबईला असताना आमच्या एका परम मित्राबरोबर दार रविवारी रेसला जात असे. मला त्यातले काही कळत नाही. पण वेळ जात असे आणि एक आगळी धावपळ पाहण्यात मजा यायची. मी कधीही जॅकपॉटचे तिकीट काढले नाही. ५-२५ रुपयापर्यंत मजल. आत एका बाकावर बसून सिगरेट पित असे. मी उभे राहून आणि चालताना कधीही सिगरेट पित नाही. आरामात बसूनच सिगरेट पितो. आमचा मित्र धावपळीत असे. एक वेळ मी असाच आरामात सिगरेट पित होतो. चार रेसेस होऊन गेल्या होत्या. इतक्यात एक लिपिक (रेव्हेन्यू खात्यातला) मजजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्ही इकडे कसे?” मी म्हणालो, “येत असतो अधून मधून – पण आपण?” त्यावर तो म्हणाला, “साहेब आपल्याला काळ स्वप्ना पडला(घाटीवर गुजराती परिणाम) त्याचा काय झाला. काल माझ्या स्वप्नात मी माझे मित्र दीक्षित यांच्या घराची चौकशी एका चाळीत करू लागलो. तोच एकजण येऊन म्हणाला, “कोण पाहिजे तुम्हाला?” त्यावर मी म्हणाला, “आमच्या ऑफिसचे हेडक्लार्क दीक्षित पाहिजेत.” त्यावर तो म्हणाला, ‘मी त्यांच्या घराशेजारीच राहतो. तुम्ही सरळ जा. घर नंबर आहे ३२५. लक्षात राहील ना?’ असं म्हणून तो निघून गेला. मला जाग आली. आज रविवार. या स्वप्नाचा मी अर्थ काढला. तनाला(TANALA) रेस मध्ये या क्रमांकाचे घोडे येणार. म्हणून आलो फक्त रु. २०/- घरी निघाले. मी एकच तिकीट काढलं आहे.” मी त्याला सिगरेट ऑफर केली. थोडा संकोचला. पण मी म्हणालो, “अरे घे, हे रेसकोर्स आहे, ऑफिस नाही.”

थोड्या वेळात रेस सुरु झाली. घोडे विनिंग पोलच्या पुढे गेले. कॉमेंट्री चालू होती. पहिली जगह के लिये तिसरा, दुसरी के लिये दुसरा और तिसरी जगह के लिये पाचवा और चौथी के लिये चौथा. लिपिक जागचा उडाला. आपलं तिकीट लागलं याचा त्याला आनंद झाला आणि निकालाकरता “फोटो फिनिश”ची वाट पहा असे अनाउन्स होताच त्याचा चेहरा पडला. आता फोटो फिनिशचा निकाल. तीन मिनिटांनी फोटो फिनिशचा निकाल जाहीर झाला आणि ३,२,५ ह्याच क्रमांकाचे घोडे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. परत त्याचा चेहरा फुलला. परंतु नंतर दोनच मिनटात “आक्षेप” घेण्यात आला आणि लाल झेंडी दाखवण्यात आली. परत त्याचा चेहरा पडला. आता जजेसच्या निकालाकडे लक्ष. सात मिनिटांनी जजेसनी “आक्षेप फेटाळण्यात येतो” एवढा निर्णय देण्यात येऊन विजयी घोड्याचे क्रमांक ३,२,५ हे जाहीर केले. आता पांढरी झेंडी दाखवण्यात आली आणि आता तो लिपिक अत्यंत खुशीत येऊन म्हणाला, “साहेब, आता सिगरेट काढा. वैताग आला होता साला. पण नशिबानी साथ दिली. १००-२०० मिळतीलच.” भाव निघण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. १० मिनिटांनी भाव फुटला. एक तिकीट रु. चौदा हजार. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लिहिता येणार नाही.

आता पहा. या गृहस्थांनी फ्राईड वाचला नव्हता, न स्वप्नावरील पुस्तक, न याचा मानसशास्त्राचा अभ्यास. तरीही त्यांनी घर क्रमांक हाच वेषांतर करून दिलेला संदेश मानला. (ज्ञान नसताना).

फ्राईडच्या सिद्धांतानुसार या स्वप्नात वेषांतरित भूत नाही तर आहे फक्त वेषांतरित दूत.

बाह्य कारणांनी पडलेली स्वप्ने

डॉ. फ्राईडची स्वप्ने बाह्य कारणांनी बदलू शकतात हे सिद्ध करण्याकरिता भिन्नभिन्न प्रयोग केले. त्यात त्यांनी एका प्रयोगात लहान लहान मुलांना अलग अलग छोटेखानी खोल्यात झोपवले. सर्वांना एकच आहार देण्यात आला होता. मुलांना गाढ झोप लागताच बऱ्याच वेळानंतर डॉक्टरांनी मुलांच्या डोळ्यावर भिन्न भिन्न रंगाचे प्रकाशझोत टाकले. एका मुळच्या पाठीत त्यांनी सुई टोचली होती. या सगळ्यांच्या नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या. सकाळी सर्वजण जागे झाले. त्यांनी सर्वांना पडलेली स्वप्ने विचारली. ती त्यांनी तपासली आणि त्यांना फार आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. निळ्या रंगाचा झोत ज्याच्या डोक्यावर टाकला होता त्याला आपण निळ्या आकाशात तरंगत असल्याचे स्वप्न पडले. तशीच गत इतरांच्या रंगांची झाली. ज्याच्या पाठीत सुई टोचली होती त्याला त्याच्या पाठीत राक्षस भाला खुपसत असल्याचे स्वप्न पडले. नंतर या गोष्टी अन्य प्रयोगांनी सिद्ध झाल्या. त्यांच्याच एका समव्यावसायिकांनी असेच गमतीदार उदाहरण दिले आहे. सकाळी सकाळीच एका माणसास आपले खूप स्वागत होत आहे व लोक टाळ्यांचा कडकडात करताहेत असे स्वप्न पडले. थोड्याच वेळात त्याला जाग आली. तो बघतो तर नोकर गादी काठीने बडवून धूळ साफ करत होता. काठीच्या बडवण्याच्या आवाजाचे रुपांतर स्वप्नात टाळ्यात आले हे त्यांनी सिद्ध केले.

शारीरिक गरजेमुळे पडलेले स्वप्न :-

जसे बाह्य कारणांनी स्वप्ने बदलू शकतात त्याप्रमाणे शरीराच्या गरजेनुसार देखील स्वप्ने बदलू पण शकतात. हेही त्यांनी सिद्ध केले आहे. त्यातील एक उदाहरण :-

एका माणसास खूप तळलेले पदार्थ खाऊ घातले. (प्रामुख्यानी आपल्याकडील भजी-वडे-पापड आणि इतर बेसनाचे पदार्थ. मांसाहारी असल्यास मसाला भरलेली मासळी व इतर पदार्थ) त्या माणसास नियमित चार ग्लास पाणी पिण्याची सवय आहे. अर्थात जेवण झाल्यावर. अशा माणसास वरील खमंग पदार्थाचे जेवण दिल्यावर एकच ग्लास पाण्याचा दिला आणि त्याला झोपायला लावले. त्याला स्वप्न पडत गेले. सुंदर बगीच्यात तो फिरतो आहे. सुंदर फुलं आहेत. तशीच पलीकडे सुंदर सुंदर घरं आहेत. गावातून वर देवळाकडे जाण्याचा रस्ता आहे. तो देवळात जाऊ इच्छितो. थोड्या वेळानी जाऊ, तोपर्यंत गावात फेरफटका मारून येऊ म्हणून तो गावाकडे वळतो. वळणावरच एक सुंदर हॉटेल दिसतं. तो आत जाऊन खुर्चीवर बसतो. आता त्याला खूप तहान लागलेली असते. शरीराला पाण्याची फार गरज होती. पण पाण्याकरता त्याला उठवणार कोण? इतक्यात वेटर टेबलावर पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवतो आणि ‘क्या लावू साब’ म्हणून विचारतो.

Swapnanchi-Duniya-5

‘तूर्तास पाणी पिऊ दे नंतर सांगतो’ म्हणून तो पाण्याचा ग्लास हातात घेऊन ओठाला लावतो आणि इतक्यात त्याला जाग येते. घसा पाण्याविना कोरडा झाल्याचे जाणवते. तो उठून मठातील पाणी ढसढसा पितो आणि परत झोपतो.

येथे फ्राईडनी निश्चितपणे शारीरिक गरजेमुळे स्वप्नात बदल झाल्याचे सिद्ध केले आहे. सर्वसामान्य माणसास असे भिन्नभिन्न स्वरूपाचे अनुभव येतातच तेव्हा हे सत्य नाकारता येत नाही.

काही काही व्यक्तींना उद्या काय घडणार किंवा पुढं काय घडणार याचे स्पष्ट चित्रच स्वप्नात दिसते. जसे दिसते तसे घटतेही पण अशी स्पष्ट चित्रं पाहणारी माणसं फार थोडीच. प्रामुख्यानी निसर्ग प्रतीकाच्या स्वरूपातच पुढील घटनांची स्पष्ट रूपरेखा दाखवतो. कित्येक वेळा याच्या उलटही घडू शकते. म्हणजे काय घडून चुकले याचेही स्पष्ट चित्र स्वप्नात दिसते. असं मात्र बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडतं. स्पष्ट चित्र जरी नाही आलं तरी काही प्रतिकात घडलेल्या घटनांचे रुपांतर दिसू शकते. (मनोविश्लेषणात याचा समावेश होतो) पण काही वेळा चमत्कारिक घटना घडल्याचे आढळते. यात गंमत अशी की, स्वप्न पडलेल्या व्यक्तीचा त्या घटनेशी, त्यातील द्रव्याशी किंवा व्यक्तींशी कधीही संबंध आलेला नसताना देखील घडलेल्या घटना हुबेहूब त्यास दिसतात.

या बाबतीत एक स्वप्न कै. ज. ना. ढगे यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे स्मरते. ४५ वर्षापूर्वीचा तो लेख असावा. नाव गाव आठवत नाही. पण घटना परराष्ट्रातील असून सत्य आहे. म्हणून सांगाविशी वाटते.

एक क्ष गृहस्थ एका गावात राहत होता. बरीच माया व स्थावर इस्टेट होती. मुल बाळ नव्हते. वय झालेलं होतं. असाच एक वेळ आरामखुर्चीत बसला असताना दोन तरुण मुलं त्याच्या घरी आली. त्यांनी आपली ओळख त्याच्या दूरच्या नातेवाइकाशी आपले नाते कसे आहे हे दाखवून दिले. म्हाताऱ्यानी आपल्या नात्यातलीच मुले आहेत समजून त्यांना आश्रय दिला. मुलांचा प्रेमळपणा पाहून म्हाताऱ्यानी सर्वस्व त्यांना द्यायचे मनात ठरवले. दिवस जात होते. शेजारी पाजारी यांना पण म्हाताऱ्याजवळ नातेवाईक आले हे समजले होते. एक वर्ष गेले. एकदा मुलांनी म्हाताऱ्यास आपल्या गावी घेऊन जाण्याची टूम काढली. म्हातारा राजी झाला आणि एके रात्री ही दोन मुलं आणि म्हातारा मोटारीतून प्रवासाला निघाली. अन् दुसरे दिवशी दोघेही परत आले. शेजाऱ्यांनी म्हाताऱ्याबद्दल चौकशी केली, त्यावेळी त्यांनी त्यांना गावाला सोडून आल्याची थाप मारली.

त्याच गावात एक नामांकित शिक्षक राहत होता. विद्वान आणि शुद्ध चारित्र्याचा शिक्षक म्हणून त्याची ख्याती होती. नुकताच तो निवृत्त झाला होता. सुखासमाधानात दिवस काढीत होता. त्याच्या स्वप्नात हा म्हातारा आला आणि म्हणाला, “आपण आदर्श शिक्षक आणि नागरिक आहात. नागरिक या नात्यांनी आपण आपले कर्तव्य पार पाडाल म्हणून मी आपणास सांगू इच्छितो की माझा खून दोन तरुणांनी केला आहे. या दोन तरुणांनी मला मोटारीतून गावी जाण्यास गावाबाहेर आणले आणि या जंगलातील वळणावरील मोठ्या झाडाखाली अगोदरच खडा करून ठेवला होता तेथे मला पुरले आहे. मी तो मार्ग दाखवीत आहे. सध्या ती मुलं माझ्या घरात दारू पित बसली आहेत. ते घर व मुलं मी दाखवीत आहे. (येथे स्वप्नात ते झाड व ती दोन्ही मुलं शिक्षकास दिसली) आता आपण उठून पोलिसात रिपोर्ट करून गुन्हेगारास शासन मिळेल असे करा.” असे म्हणून तो म्हातारा गेला. स्वप्न संपले. शिक्षक जागे झाले. या विलक्षण स्वप्नाने ते अस्वस्थ झाले. पण तो म्हातारा कोण हे काही लक्षात येईना. त्यांनी स्मरणशक्तीला खूप ताण दिला पण त्यांच्या ओळखीच्या सर्वात तो कोठेच नव्हता. अपचन किंवा काहीतरी केव्हातरी खुनाच्या केसेस वाचल्या त्याचाही हा परिणाम असू शकेल असे समजून शिक्षक स्वप्न विसरले.

दुसरे दिवशी शिक्षक झोपले आणि त्यांना तोच म्हातारा स्वप्नात दिसला. म्हातारा स्वप्नात सांगत होता, “आपण अविश्वास दाखवू नये. मला या रस्त्यांनी असं नेलं. या झाडाखाली पुरलंय आणि ती दोघं मुलं परत या घरी आली. विश्वास ठेवा हे सर्व खरंय, तुम्ही नागरिक या नात्यानी या खुनास वाचा फोडलीच पाहिजे.” स्वप्न संपले. शिक्षकाची झोप खाडकन उघडली. त्यांनी परत स्मरणशक्तीला ताण दिला. पण व्यर्थ. काही केल्या तो माणूस कोण हे त्यांना आठवेना.

तिसऱ्या दिवशी शिक्षक झोपले आणि स्वप्नाची पुनरावृत्ती झाली. शिक्षक जागे झाले. त्यांनी मनाचा दृढ निश्चय केला आणि पोलिसमध्ये तक्रारीवजा अर्ज देऊन खुनाचा तपास लावून माझे मनःस्वास्थ्य मला परत मिळवून द्यावे अशी विनंती केली. अर्जात संपूर्ण स्वप्नाचा तपशील दिला होता. पोलीस अधिकारी त्यांना ओळखत होता व मान पण देत होता. हसून तो म्हणाला, “सर! स्वप्नावरून गुन्हेगार तपासण्याची मानवी इतिहासातील ही पहिलीच घटना असू शकेल. असो. गाडीत बसा. तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गाने गाडी जाईल. माणसं बरोबरच आहेतच.” शिक्षक गाडीत बसले. स्वप्नात जो मार्ग दिसला, त्या मार्गावरून गाडी चालू लागली. आता जंगल लागले. एक वळण लागताच शिक्षकाने गाडी वळणावरच थांबायला लावली. गाडी थांबली. सर्वजण खाली उतरले. शिक्षकानी जवळच्या झाडाखाली जागा दाखवली. अवघ्या काही मिनिटातच खड्ड्यात एक प्रेत सापडलो. आता पोलीस अधिकारी चक्रावले. स्वप्नाप्रमाणे प्रेत सापडले तर मारेकरी निश्चितच सापडतील. नंतर गाडी शिक्षक सांगतील त्या दिशेला धावू लागली. एका घरासमोर गाडी थांबली. शिक्षक व पोलीस आत गेले. दोन तरुण दारू पिताना दिसताच शिक्षकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून “हीच ती मुलं” असे सांगितले. पोलिसांनी रीतसर खटला भरला. कोर्टानी शिक्षकाचे स्वप्न ग्राह्य धरून दोन्ही गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांचे वय लक्षात घेऊन जन्मठेपेची शिक्षा दिली.

येथे ना फ्राईड आहे ना भविष्य. आहे तो एक चमत्कारिक सत्य घटना. निसर्गाची विलक्षण लहर!

स्वप्नाचे प्रकार ओळखणे

येथपर्यंत आपण “स्वप्ने” या विषयाचे स्वरूप, त्यावर केलेले लिखाण, आणि जाळीजळमटं बघितली. ती यथाशक्ती “स्वच्छ” करण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्वप्न विश्लेषण हे महत्व्हाचे आहे व ते अत्यंत प्रामाणिकपणे करायला पाहिजे. शक्य तो पूर्वग्रह नसावा.

स्वप्नाचे दोन प्रकार आहेत. पहिला निरर्थक आणि दुसरा सूचक. हे दोन प्रकार कसे ओळखायचे हेच म्हत्वाचे आहे. हा महत्व्हाचा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वप्नास कोणत्या प्रकारात टाकायचे हे निश्चित करता येत नाही. गोंधळलेल्या मनस्थितीत पहिल्या प्रकारचा स्वप्नास दुसऱ्या प्रकारात टाकणे आणि दुसऱ्यास पहिल्या प्रकारात टाकणे अशे प्रकार होतात. याचा परिणाम शून्य. नुसता गोंधळ. खोटेपणा उगाच जाणवू लागतो, आणि आपली चूक लक्षात न घेता “स्वप्न सूचक नसतातच” असे विधान ठोकून आपल्या चुकीचे खापर “स्वप्ना”वर टाकून माणसे मोकळी होतात. याकरिता मुळ स्वरूप पूर्णपणे बघायला हवे. दोन अधिक दोन बरोबर पाच, पाच अधिक तीन बरोबर आठ आणि आठ अधिक दोन बरोबर दहा. अशा प्रकारची बेरीज पुढे शेवटपर्यंत जरी बरोबर आली तरी ती “चूक” ठरून शून्य गुणास पात्र ठरते कारण मूळ बेरीजच मुळी दोन आणि दोन पाच हीच चूक आहे. स्वप्न विश्लेषणापुर्वी अशी मूळ चूक होता उपयोगी नाही.

पहिली गोष्ट म्हणजे स्वप्न पूर्णपणे लक्षात ठेवा. काही दिवस ते जमणार नाही. पण अवधान दिसल्यास ते निश्चित जमू शकत. मनुष्य स्वप्न विसरत नसतो. त्याकडे अवधान न दिसल्यामुळे ते स्मरत नाही. ज्यांना स्वप्न लक्षात राहत नाहीत त्यांना जर त्यांच्या स्वप्नात वाघ मागे लागलेला व साप पुढे आलेला आहे हे दिसले तर ते ओरडतील, “मेलो, मेलो, वाचवा.” आपण विचारले की काय झाले तर ते बरोबर सांगतील, “अहो, स्वप्नात बघ मागे व साप पुढे दिसला अन् मी भ्यालो.” आता हे स्वप्न कसं लक्षात राहिलं तर ते त्यास ‘भयाण’ वाटलं म्हणून. असो. स्वप्न पूर्णपणे घड्याळाप्रमाणे (Clock-wise) लक्षात ठेवा. जाग येताच उलट क्रमाने जावे (Anti Clock-wise) म्हणजे स्वप्नाचा सूचक भाग कोणत्या वेळी दिसला हे स्पष्ट होईल. प्रामुख्यानी स्वप्नात दिसणाऱ्या वस्तूचे किंवा दृश्याचे रंग लक्षात ठेवावे. मृत व्यक्तीचे, तसेच इतरांचे बोलणे पण लक्षात ठेवावे. सूचक भाग काढताना याची मदत होते.

दुसरी गोष्ट म्हणजे आपली झोप मोजून ठेवली पाहिजे याचा उल्लेख मी पहिल्या भागात केला आहे म्हणून पुनरावृत्ती टाळतो.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्लेषण. संपूर्ण स्वप्न लक्षात ठेऊन त्यातील दृश्याची पूर्ण तपासणी करा. ती तपासणी करताना त्यातील घटना याची तुमच्या जागृत मनानी नोंद घेतेलेली असेल तर ती घटना ‘निरर्थक’ या सदरात मोडेल. सुप्त मनावर पडलेल्या दबावाचा प्रत्याघात जर स्वप्नात असेल तर तो भाग पण ‘निरर्थक’ सदरात मोडेल. म्हणजेच जागृत मनावरील दबावाचा प्रत्याघात आणि सुप्त मनावरील दबावाचा प्रत्याघात जर असेल तर तो भाग – ते दृश्य – ते बोल – निरर्थक ठरतील. पण जर स्वप्नात जागृत मनावरील कोणताच दबाव नसलेले आणि सुप्त मनावर कोणताच दाब नसलेले दृश्य दिसले असेल तर ते स्वप्न निश्चित सूचक समजावे. त्या भागाचा, त्या दृश्याचा, त्या बोलाचा अन् त्या रंगाचाही निश्चित सूचक अर्थ असतोच. याचे अधिक स्पष्टीकरण करण्याकरता मी काही उदाहरणे खाली देत आहे. वाचकांनी ती बारकाईने वाचावीत. स्वप्नाचा काढता येईल तेवढा कीस काढावा व प्रत्याघाती स्वरूप नसलेले भाग – दृष्य बघावे. ते दृश्य, भाग, वस्तू ही कसची प्रतीकं आहेत हे स्वप्न्दृश्यात सापडू शकते. तसेच त्याचे फळ पण. स्वप्न घाणेरडं आहे हे बघू नका. ते प्रत्याघाती आहे का नाही एवढंच अतिमहत्त्वाचे आहे. कामवासना दडलेल्याची छटा असलेल्या घटना दिसू शकतात. त्याच्याशी तुमचा प्रामाणिकपणाच साक्षीदार आहे. फ्राईड १०० टक्के बरोबर नाही हे जरी खरे असले तरी तो १०० टक्के चूकही नाही हे लक्षात घ्या. फ्राईडच्या सिद्धांताला डावलूनही तुम्हाला सूचक भाग सापडू शकतो. तसाच तो तुम्ही दडपू पण शकता. कारण तुमची स्वप्नं शेवटी तुमचीच आहेत, दुसऱ्याची नाहीत. लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला फसवू शकत नाहीत.

सुप्त मन, जागृत मन, जाणीव, नेणीव, घात, प्रत्याघात या शब्दांची कसरत जर अवघड असेल वाटत असेल तर त्यापेक्षाही अधिक सोपी युक्ती सांगतो. तीही तितकीच उपयोगी पडते.

स्वप्नात दिसलेले पूर्ण दृश्य लक्षात ठेवा. यात जे जे पूर्वी बघितलेलं जशास तसं दिसत असेल तर ते निरर्थक म्हणून वजा करा. हे करीत असताना जर दृश्यातील कोणत्याही भागात थोड जरी फरक असेल असे आढळते तो भाग निश्चित सूचक समजावा. हे समजून स्वप्नाची छाननी करता येईल एवढी करा. सूचक भाग आढळल्यास स्वप्नदृश्यात बघून स्वप्नफल बघता येईल. प्रत्येक वेळी स्वप्न्फल बघण्याची घाई करू नका. सूचक भागावर लक्ष केंद्रित करून साधा विचार केला तरी तुमचा अंदाज स्वप्न्फलाशी जुळल्याचे तुम्हास आढळून येईल.

उदाहरणार्थ, (१) समजा तुम्ही श्री. चिन्मयानंदाच्या व्याख्यानाला गेलेले आहात. त्यांचे भगव्या वस्त्रातील आगमन, भगवा ध्वज, त्यांच्या गुरूचा ठेवलेला फोटो, त्यावरील पुष्पहार हे आपण पहिल्यांदाच बघत असाल. नंतर त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी होते. मधून मधून विनोदाची कारंजी उडत असतात आणि नंतर तुम्ही प्रसन्न मानाने घरी येत असता. तुमच्यावर भाषणाचा खूपच प्रभाव पडलेला असतो. त्यांचा सात दिवसाचा ज्ञानयज्ञ संपवून ते मुंबईस रवाना होतात. यात सहा महिने होऊन जातात. आता तुमच्या मनावर काही दडपण नाही. सुप्त मनावर पण काही दाब नाही. अन् एका रात्री तुमच्या स्वप्नात श्री. चिन्मयानंद येतात. त्यांचा लावलेला गुरूचा फोटो दिसतो. ते भगव्या वस्त्रातच असतात. मंडपात श्रोते बसलेले दिसतात. मधोमध लावलेला ध्वज दिसतो. तो तुम्हाला पिवळ्या रंगाचा दिसतो आणि तुम्हास जाग येते.

Swapnanchi-Duniya-6

वास्तवता

आता या स्वप्नाचे विश्लेषण केले तर त्यांचे स्वप्नात येणे, त्यांच्या गुरूचा फोटो दिसणे, बसलेले श्रोते दिसणे यात म्हणजे एवढ्या भागात तुम्ही पाहिलेल्या वास्तव्तेतील दृश्यांचा प्रत्याघात आहे. म्हणून हा भाग सूचक न ठरता निरर्थक ठरतो. मुळातला भगवा ध्वज हा तुम्ही पिवळ्या रंगात बघितला.

Swapnanchi-Duniya-7

सूचक भाग – काळा ध्वज

यात वास्तवतेचा प्रत्याघात नसून पिवळ्या रंगाचा ध्वज हाच फक्त सूचक भाग आहे. पिवळा ध्वज पाहणे म्हणजे भांडण, मानहानी आणि मानसिक त्रास याचे द्योतक होय.

उदाहरण (२) – समजा तुम्ही रेल्वेनी प्रवास करीत आहात. तुमचा डब्यात एक उत्तम पोषाख केलेली शिकली सवरलेली तरुणी आली आहे. तुमच्या जवळच बसली आहे. गाडी चालू होते. एक दोन स्टेशने जातात. अन् टी.टी.आय. डब्यात येतो. सर्वांची तपासणी करीत असताना त्या तरुणी जवळ तिकीट नसल्याचे कळते. टी.टी.आय. दम भरतो. दंड भरत असाल तर रसीद फाडतो, नाहीतर पुढील स्टेशनवर उतरून पोलिसांच्या हवाली करतो. काय ठरवायचं ते ठरवा. ती तरुणी दंड भरून रसीद घेते. पुढील स्टेशनवर तुम्ही उतरून जाता. आता तुम्हाला उगीचंच वाटतं की इतक्या सुशिक्षित बाईने असं करायला नको होतं. तुम्हाला थोडसं आश्चर्य पण वाटतं की सुशिक्षित माणसं असं पण वागू शकतात.

या घटनेला सहा महिने होऊन जातात, अन् तुम्हाला स्वप्न पडत. त्यात तुम्ही रेल्वेने प्रवास करीत आहात. तुमच्या शेजारी एक सुशिक्षित स्त्री बसलेली आहे. दुसऱ्या स्टेशनवर टी.टी.आय. तुमच्या डब्यात येतो. सर्वांचे तिकीट तपासतो. इकडे तुमची तारांबळ उडते. आता टी.टी.आय. तुम्हाला तिकीट दाखवा म्हणतो. तुम्ही सारे खिसे तपासता. पिशवी तपासता, पाकीट तपासता पण तिकीट सापडत नाही. डब्यात काही जणांच मिश्कील हास्यहि तुम्हाला जाणवतं आणि तुम्ही टी.टी.आय. कडे केविलवाणी बघ्ताहात अन् तुम्हाला जाग येते.

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर रेल्वेचा प्रवास, त्यात तुमच्या डब्याला आलेली व जवळपास बसलेली तरुणी व तिकीट तपासण्याकरता आलेला टी.टी.आय. हे सर्व प्रत्याघाती स्वरुपात मोडतात. म्हणून एवढा भाग निरर्थक. परंतु टी.टी.आय. तुमच्या जवळ येऊन तिकीट मागतो. तुम्ही तिकीट काढलेलं असूनही तुम्हाला ते सापडत नाही. ते हरवलेलं असत एवढा भाग महत्त्वाचा. आणि टी.टी.आय. नी स्वप्नात तिकीट मागितलं असताना सापडत नाही याचा अर्थ विपुल संपत्ती मिळण हा आहे. अशा स्वप्नाची वेळ तपासल्यास निश्चित काळही काढता येतो.

उदाहरण (३) – तुमचा ऑफिसर खूप खडूस आहे. फटकन बोलून त्याला अपमान करायची सवय आहे. त्याच्या केबिनमध्ये दोन तीन मुळी बसलेल्या आहेत. तुमचा तुम्ही पाठवलेला ड्राफ्ट तो वाचत आहे. त्यात बऱ्याच चुका न कळत राहून गेल्या असतात. आता तो बेल वाजवून तुम्हास बोलावून घेतो. तो तुम्ही केबिनमध्ये येताच फायर करतो. मुली अधूनमधून फिदीफिदी हसतात. तुम्हाला मनातून खूप राग आलेला असतो. पण तो तुम्ही गिळून, ओशाळे होऊन परत कामाला लागता.

वास्तवता

वास्तवता

या नंतर केव्हातरी तुम्हाला स्वप्न पडत. साहेबांच्या केबिनमध्ये तुम्ही गेलेले आहात. तो फायर करीतच असतो. तेथे कोणीच नसतं. तुम्हाला खूप राग आलेला असतो. त्या रागाच्या भरात तुम्ही टेबलावरील रूळ घेऊन त्याच्यावर उगारता. अशा वेळी बचावाकरता तो आपले दोन्ही हात डोक्यावर घेतो अन् तुम्ही थक्क होता. कारण तुम्हाला साहेबांच्या दोन्ही हाताला महारोग झाल्याचे दिसते. हाताची बोटे झडलेली दिसतात अन् तुम्हाला जाग येते.

सूचक भाग - झडलेली बोटं

सूचक भाग – झडलेली बोटं

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर स्वप्नातील साहेब, त्याचं फायर करणं, तुमचा राग व त्या भरात तुम्ही त्यांच्यावर रूळ उगारणे हे पूर्वी तुमच्या झालेल्या अपमानाचा प्रत्याघात आहे म्हणून एवढा भाग निरर्थक होय. परंतु नेहमी साहेबाची बोटं महारोगानी झाडलेली दिसणं हे सूचक आहे. स्वप्नात महारोगी येणे म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि मानमरातब होय. स्वप्नाच्या वेळेनुसार धनलाभ निश्चितच असतो.

उदाहरण (४) तुम्ही रस्त्यांनी फिरावयास चाललेले आहात. चालत चालत दूर गेल्यानंतर तुम्हाला रूळ दिसताहेत आणि आता तुम्ही रुळावरून चालत आहात आणि तिकडून रेलगाडी धूर ओकीत तुमच्या अंगावर येत आहे. अशा वेळी तिथेच असलेल्या पुलावरील खांबाजवळ तुम्ही पळत जाऊन बाजूला होता. रेल्वे तुमच्या जवळून निघून जाते.

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर तुमचे साध्या रस्त्यावरून रुळावर जाणे म्हणजे तुमचा मार्ग बदल होणे होय. तो चांगल्या वाईटाकडेही असू शकतो. रेल्वे धूर सोडीत अंगावर येणे म्हणजे जीवन कळपात करणारी संकटे येणे होय.

उदाहरण (५) सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या स्वप्नात साप हा कधीतरी येतोच. समजा तुम्ही कधीतरी मित्राबरोबर महाराजबाग बघण्याकरता गेलेले आहात. तेथील पशुपक्षी व सापही पाहता. नंतर सर्व विसरून जाता.

वास्तवता

वास्तवता

पुढे केव्हातरी तुम्हाला स्वप्नं पडत. स्वप्नात तुम्ही दुसऱ्या एका मित्रास महाराजबाग दाखवत आहात. सर्व पशु पाहत असताना एकच गोंधळ उडतो. कारण मोकळे साप बाहेर आलेले असतात आणि नंतर इतर साप त्यांना साथ देतात. चोहोकडे पळापळ सुरु होते. या पळापळीत तुम्ही खूप जोरात पळू लागता. एक साप तुमच्या मागे जोरात फूत्कार टाकीत येत असतो. शेवटी तो तुम्हाला गाठतो आणि तुमच्या उजव्या हाताला कडकडून चावतो. तुम्ही भीतीने ओरडता आणि तुम्हास जाग येते.

सूचक भाग - साप मागे धावतो व पुढे चावतो

सूचक भाग – साप मागे धावतो व पुढे चावतो

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर महाराजबाग स्वप्नात येणे हे प्रत्याघाती स्वरूप आहे. साप बाहेर येणे व तो तुमच्या मागे येणे येथे सूचक भाग सुरु होतो. नंतर तो तुम्हास कडकडून चावतो हे सूचक आहे. साप सर्वसाधारणपणे सर्वांच्या स्वप्नात येतोच. कधी फूत्कार सोडीत आहे तर कधी हातापायास वेटोळा घालीत आहे. तर कधी नुसता सळसळत जात आहे. पण साप क्वचितच स्वप्नात चावतो. आता तो तुम्हास चावला आहे इह अत्यंत सूचक आहे. याचा अर्थ तुम्ही लक्षाधीश होणे आहे. जुन्या काळच्या भाषेत साप सुवर्णमुद्रांचा मालक बनतो. आता त्याची किंमत लाखात मोजावी लागते. थोडक्यात म्हणजे आर्थिक लाभ व स्थावर इस्टेट येणे हा होय.

एक संकेत असाही आहे की गरोदर स्त्रीस साप चावल्यास किंवा दिसल्यास मुलगा होतो. पण त्यातही प्रकार आहेत. मलूल दिसल्यास मुलगी होते. पांढरा दिसल्यास मुलगा. चावला तर मुलगाच हे शंभर टक्के.

वरील उदाहरणांवरून स्वप्नाचा अर्थ कसा काढावा हे कळेलच. मी प्रकरण ३ मध्ये या “विश्लेषण” पद्धतीने स्वतःच्या व इतरांच्या स्वप्नाचेही “सूचक” भागावरून भविष्यात घडणाऱ्या घटनांचे स्पष्ट स्वरूप पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले. वाचकांनी या पद्धतीने थोडा अभ्यास केल्यास कमीत कमी स्वतःच्या स्वप्नाचा अर्थ निश्चित काढता येईल असा विश्वास वाटतो.

येथे प्रामुख्याने भारतीय तत्त्वेत्यांची स्वप्नावरील मत जाणून बुजून टाळली आहेत. उगीचंच “जग हे स्वप्नवत-स्वप्नवत संसार” “ब्रम्ह सत्य जग मिथ्या” अर्जुनास कृष्णाने गीतेत असे सांगितले आहे, असे म्हणून सांगितलेले तत्त्वज्ञान, याचा खऱ्या अर्थी या स्वप्नाशी तिळमात्र संबंध येत नाही. उगीचंच दुसऱ्या विषयात त्याचा संबंध नसताना अध्यात्माची चर्चा घुसडून “पांडित्य” दाखवण्याची मला गरजच भासली नाही. एक निश्चितपणे सांगता येईल की आपल्यात कोणीही स्वप्न विश्लेषणाला हात लावलेला नाही. उलटपक्षी वाईट स्वप्न पडल्यास (वाईट म्हणजे कसे हे न सांगता) त्याचा परिणाम टाळण्यापेक्षा अंधश्रद्धेचा आश्रय घेण्याचा मार्गच दाखवला आहे. मला काहीही मान्य नसल्यामुळे मी शब्दही लिहला नाही.