background

माझी भूमिका

नोव्हेंबर १९८९ या वर्षी श्री. वा. रा. डोईफोडे यांचे “स्वप्नांची दुनिया – अर्थ आणि विश्लेषण” हे पुस्तक प्रकाशित झाले. एकूण २००० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त दोनच राहिल्या. श्री. वा. रा. डोईफोडे म्हणजे माझे आजोबा, मी त्यांना आबू म्हणत असे. लहानपणापासून ते वयाच्या १४व्या वर्षापर्यंत माझे “आबू” माझा सच्चा आणि जवळचा दोस्त/मित्र होते. २९ नोव्हेंबर २००६ ला “आबूंनी” या जगाचा निरोप घेतला आणि माझा “सच्चा मित्र” हरपला. एकटेपणा वाढला. त्यातच मोठी बहिण शिक्षणासाठी लंडनला गेली. आईची शाळेची नोकरी, बाबांची जाहिरात विश्वातील व्यस्त दिनचर्या, जोडीदाराच्या मृत्यूने दुःखात बुडालेली, घाबरलेली आजी या साऱ्या गोष्टींमुळे आबूंची उणीव आणखीनच वाटू लागली. त्यावेळी मी इयत्ता नववीत शिकत होतो. अभ्यासातील प्रगती नेहमी चिंताजनक होती. २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात मी बाबांबरोबर वैष्णवदेवीला गेलो, तेव्हा बाबांना एक स्वप्न पडले. ते त्यांनी परतल्यावर आईला सांगितले. मी तिथेच होतो, पण गंभीरपणे विचार करणे हे माझे विश्वाच नव्हते. मी सहज ऐकायचे म्हणून ऐकले. बाबा सांगत होते – मी आणि बाबा दोघेच जण एका विमानातून जात होतो. थोडे दूर पर्यंत विमान नित गेले आणि थोड्या वेळाने काट्याकुट्यांच्या झाडी मध्ये जावून अडकले. थोड्या वेळाने ते विमान आपोआपच त्यातून बाहेर पडले व सुरळीत प्रवास करून योग्य त्या विमानतळावर जाऊन उतरले. यावर आई पटकन म्हणाली, “श्रेयसच्या दहावीचे टेन्शन घेऊ नका. तो सहज पास होईल.” स्वप्नांची दुनिया “साहेबच्या” (आबूंच्या घरी त्यांना सर्व साहेच म्हणत) पुस्तकाचा फायदा – आई पुढे म्हणाली. “या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करावं अशी साहेबची इच्छा होती. बघू कधी जमतंय ते.” तो विषय तिथेच संपला. मी दहावी खरंच सहज पास झालो. कुठेतरी सुप्त मनात ‘पुस्तकाचे भाषांतर’ हे वाक्यच कोरले गेले. पुढे शिक्षणात थोड्या अडचणी आल्या व शैक्षणिक विमानाला योग्य विमानतळ गाठणे कठीण होऊ लागले. बी.एस.सी.एनीमेशनला प्रवेश घेतला. आता डिग्री पूर्ण होईल या शिक्षणाचा फायदा आला की आबूंच्या पुस्तकाची वेबसाईट तयार करण्याच्या संकल्पनेची पाळमुळ रोवली गेली. आबूंचीच नव्हे तर माझ्या सच्च्या मित्राची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो.

‘स्वप्न्शास्त्राकडे’ बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठी हा प्रयत्न. पुस्तक खरेदी करून वाचणारा मराठी वाचक हळू हळू दूर होत चालला आहे. पण इंटरनेट वर बसून मराठी साईट वरील माहिती गोळा करण्याचा प्रयास करणारा गट वाढतोय. या इंटरनेट वाचकांतर्फे आबुंनी मांडलेले हे स्वप्न्शास्त्र सामान्य वाचकांपर्यंत पोहोचले हे उद्दिष्ट.

या वेबसाईटच्या यशासाठी परमेश्वराचे आशीर्वाद, आजी-आजोबांचे शुभाशीर्वाद, आईबाबांचे प्रोत्साहन, ताई-जीजींच्या शुभेच्छा, मित्रमैत्रिणींचा पाठींबा मला लाभला. या साऱ्यांचा मी ऋणी आहे.

धन्यवाद!

– श्रेयस अनिल डोईफोडे


No Comments

माझी भूमिका