background

सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल

या भागात स्वप्न विश्लेषण पद्धतीप्रमाणे स्वप्न्फल सांगितले आहे. ते किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होईलच. ती स्वप्ने इंग्रजी किवा इतर भाषेतील भाषांतर नव्हते तर मला पडलेली स्वप्ने आणि इतरांनी मला सांगितलेली स्वप्ने आहेत. नावानिशी मी करता येईल तेवढा उल्लेख केला आहे. यातील सर्व व्यक्ति आज हयात आहेत.

स्वप्न क्रमांक १ 

माझे मित्र श्री. खन्ना हे माझ्या बरोबरच विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. त्यांची बदली गोंदियाला झाली. ते तेथे रुजू झाले. चार एक महिन्यांनी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी बघतोय की श्री. खन्ना हे काळी शेरवानी, चुडीदार पैजामा व डोक्यावर एक अत्यंत घाणेरडी टोपी घालून आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेऊन चालले आहेत. मी त्यांना म्हणतो; ‘खन्नासाहेब, चांगल्या कपड्यांवर निदान चांगली टोपी तरी घालायची.’ इतक्यात मला जाग आली. समोर घड्याळात बघितले तर पाच वाजले होते. माझी झोप सहा तासाची आहे. मी अकराला झोपतो व पाचला उठतो. स्वप्न संपले व जाग आली त्यावेळी पाच वाजले होते. म्हणजे स्वप्नाचा परिणाम चोवीस तास ते तीस दिवसाच्या आतला. योगायोगाने श्री. खन्ना त्याच दिवशी नागपूरला आले. मी त्यांना म्हणालो, ‘खन्नासाहेब, आज सकाळीच मला स्वप्न पडलं. तुम्ही स्वप्नात अत्यंत घाणेरडी टोपी डोक्यावर घातलेली. यावरून मी सांगतो की तुमची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून लवकरच होईल.’ यावर श्री. खन्ना म्हणाले, ‘डोईफोडे, मी परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, तेथे स्वप्नावर तरी विश्वास ठेवणार का? मी तर राजीनामा देण्याकरता आलेलो. परंतु साहेबांनी मला एक महिन्यानी देण्यास सांगितले आहे म्हणून परत चाललो आहे.’ चहा फराळ झाला आणि श्री. खन्ना रात्रीच्या गाडीने गोंदियाला रवाना झाले. दुसरे दिवशीच नागपूरच्या त्यांच्या मित्राला श्री. खन्नाची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याची तार मुंबईहून आली. सुदैवाने त्यांना विक्रीकर अधिकारी म्हणून नागपुरच मिळालं. श्री. खन्ना हे आज डेप्युटी कमिशनर म्हणून काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण कसे केले ते सांगतो. श्री. खन्ना यांनी दोन मित्रांच्या खांद्यावर हात ठेवले होते. हे दोघेही वास्तव्तेतील त्यांचे मित्र म्हणून सूचक नव्हते. श्री. खन्ना हे कधीच टोपी घालीत नाहीत. परंतु स्वप्नात त्यांच्या डोक्यावर अत्यंत घाणेरडी टोपी होती. वास्तवतेत टोपी कुठेच नव्हती त्यामुळे तिचे स्वरूप प्रत्याघाती नव्हते म्हणून तेवढीच ‘घाणेरडी टोपी’ या स्वप्नाचा सूचक भाग. घाणेरडी टोपी डोक्यावर असणे याचा अर्थ सतत प्रगती-उत्कर्ष असा आहे. श्री. खन्ना यांची प्रगती-उत्कर्ष कसा झाला ते पहा. अगोदर विक्रीकर निरीक्षक , नंतर विक्रीकर अधिकारी, नंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि आज आहेत विक्रीकर उपयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई!

स्वप्न क्रमांक २

मी मुंबईला होतो. कार्यालयातील बऱ्याच जणांना मी स्वप्नाचे अर्थ सांगतो याची माहिती होती. माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगी होती. तिचे लग्न होऊन सहा महिने झाले होते. तिला एक स्वप्न पडले. तिने आपल्या मनात ते स्वप्न वाईट असल्याचा धसका घेतला. सकाळपासून मी कामात असल्यामुळे ती माझ्याशी बोलूच शकली नाही. शेवटी चार वाजता मी सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडलो. त्या वेळी तिने मला गाठून थांबवले. ‘माझ्या स्वप्नाचा जो अर्थ असेल ते सांगा. मी माझ्या मनाची तयारी केली आहे.’ अत्यंत विमनस्क मनःस्थितीत ती बोलत होती. मी तिला म्हणालो, ‘अगोदर शांत हो. निसं:कोचपणे स्वप्न सांग. मी निश्चितच अर्थ सांगेन.’ त्यावर ती म्हणाली, ‘मी माझ्या स्वप्नात लग्नातला शालू काढायला गेले तर पेटीतून उंदीर पळाला. शालू बघते तर त्याला मोठं छिद्र उंदरांनी कुरतडून केलेलं.’

मी तिला म्हणालो, ‘काहीही घाबरण्यासारखं नाही. पण आता साडेचार होतात. उद्या सायंकाळचे साडेचार पर्यंत तुझी मनःस्थिती पार ढासळून जाईल. भांडणे व कटकटी खूप. नंतर सर्व ठीक होईल.’ ‘बस एवढच’ म्हणून ती आपल्या जागेवर बसली.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती ऑफिसमध्ये आली. झोप नसल्यामुळे तिचे डोळे सुजलेले दिसत होते. मी काहीच न बोलता कामास लागलो. बरोबर, तीन वाजता तिची आणि हेडक्लार्कची अशी जुंपली की साहेबांना केबिनमधून बाहेर येऊन मध्ये पडावे लागले. मी मात्र तिच्याकडे न पाहताच काम करीत राहिलो.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती म्हणाली, ‘काका, कालचा दिवस विसरणे शक्य नाही. परवा घरी गेल्यापासून सर्वांशी भांडणं झाली. राहिलं साहिलं ते काळ हेडक्लार्कशी झालं. आता तर काही नाही ना?’ मी शांतपणे म्हणालो, ‘बाळ, हा तुझ्या स्वप्नात आलेल्या उंदराचा परिणाम बरं.’

या पूर्ण स्वप्नाचे विश्लेषण असे केले – या पूर्ण स्वप्नात कोठेही प्रत्याघाती स्वप्रूप नाही. शालू म्हणजे उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र. छिद्र अन् तेही कुरतडून म्हणजे जवळच्या नातेवाईकांशी बेबनाव होऊन असलेले संबंध तुटणे. शिवाय पेटीतून बाहेर पडताना उंदीर दिसणे म्हणजे मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडण्याची सुचना.

स्वप्न क्रमांक ३ –

माझ्या बरोबर श्री. निराळे हे विक्रीकर निरीक्षक म्हणून नागपूरला काम करीत होते. श्री. निराळे हे एम. ए., एम. कॉम., एलएल.बी. असून देखील विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. याचं आम्हाला फारच आश्चर्य वाटायचं. एकदा त्यांनी स्वप्न सांगितलं. स्वप्नात ते कारनी प्रवास जरित होते. दुसरी एक कार पाठीमागून येऊन पुढे गेली. याचा अर्थ काय? श्री. निराळे हे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. तसेच एम.पी.एस.सी. च्या पण. मी त्यांना ताबडतोब म्हणालो, ‘निराळे, तुम्ही एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत पास होऊन विक्रीकर अधिकारी व्हाल परंतु यु.पी.एस.से. चे काही खरे नाही. अवघ्या तीन दिवसांनी त्यांची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याचे पत्र आले. आज श्री. निराळे, असिस्टंट कमिश्नर म्हणून मुंबईस काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण असे – स्वतः मोटार चालवणे व ती सुरळीत हे प्रगती आणि सुरळीत आयुष्य जाण्याचे द्योतक आहे. श्री. निराळे हे एम.पी.एस.सी. तसेच यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. म्हणून एम.पी.एस.सी.तील निवड निश्चित होती. स्वतः कार वापरीत किंवा चालवीत नसत म्हणून प्रत्याघाती स्वरूप कोठेच नाही. सबब कारमधून जाणे हाच भाग सूचक.

स्वप्न क्रमांक ४ –

मी मुंबईला ज्या मित्राकडे राहत असे त्याचं दुमजली घर औरंगाबादला होतं. स्वप्नाच्या गप्पा चालत असत. एकदा त्याला एक स्वप्न पडलं. त्यात त्याचे बत्तीस दात पडलेले दिसले. त्याला ताबडतोब जाग आली. त्याने दिवा लावला. दात खरंच पडले की काय हे तोंड दाबून पाहिले. त्याला बराच घाम आला होता. सकाळी त्याने मला स्वप्न सांगितले. मी गंभीर होऊन गप्पच बसलो. तो खनपटीलाच बसला. मग मी गंभीर होऊन सांगितले की तुझे औरंगाबादचे घर विकावे लागेल किंवा त्यात तुला राहता येणार नाही. याचा काळ मी तीन महिन्यांचा दिला होता. त्याने माझ्या माघारी मला खूप शिव्या दिल्या. ब्राम्हण जातीचा नेहमीच्या सर्व जाती करतात तसा उद्धार पण केला.

तो दिवाळीकरता औरंगाबादला एक महिन्याची रजा घेऊन गेला. परत आला तर अगदी सुन्न होऊनच. मी सकाळी काही बोललोच नाही. मूड नसेल म्हणून ऑफिसला निघालो. सायंकाळी तो माझ्या अगोदरच घरी आला. आता तो ताजातवाना झाला होता. मी घरी येताच त्याने सांगितले की ऐन दिवाळीत मुला-मुलांची भांडणे झाली अन् मी मध्ये पडलो. एवढंच निमित्त झालं आणि सर्व बिरादरानी काठ्यांनी मारावयास सुरुवात केली. माझी बायको मध्ये पडली तर तिच्यावरही काठी बरसली. पोलीस केस केली. मन उद्विग्न झालं. घर विकून आलो. सर्व पैसे वडिलांनी घेतले. आता मजजवळ फक्त दोन रुपये आहेत. एकूण मी सांगितलं, त्याप्रमाणे त्याचं घर त्याला विकावं लागलंच.

विश्लेषण :- प्रत्याघाती स्वरूप नाही. दात पडणे एवढेच सूचक. याचा अर्थ स्थावर मालमत्ता नष्ट होणे, आर्थिक नुकसान आणि अत्यंत कटकटी.

स्वप्न क्रमांक ५ –

मी एम. ए. ला बसलो होतो. मजजवळ एकही पुस्तक नव्हतं. तशात एकाची ओळख झाली. तो एम.ए. चा नियमित विद्यार्थी होता. परिचय झाला आणि आमची रोजची सायंकाळची बैठक व्हायची. स्वप्नाचा विषय निघाला आणि मी त्याला स्वप्न लक्षात कसं ठेवायचं, त्याची वेळ कशी काढायची वैगरे सर्व समजावून सांगितले. सर्व लक्षात ठेऊन पडलेली स्वप्नं तो लिहून ठेवी. सायंकाळी सांगत असे. दिवाळीच्या सुटीत तो गावी गेला. त्याला एक मुलगी सांगून आली. मुलगी पसंत पडली. त्यांनी होकार पण कळवला. आता साखरपुडा ठरवायचा होता. तो नंतर ठरवू म्हणून तो नागपूरला आला. आठ दिवसांनी त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याच्या गावची त्याची मैत्रीण(जी वारली होती) आली. चेहरा अत्यंत मलूल होता. काहीही न बोलता खाली मान घालून निघून गेली. त्याने सर्व स्वप्न सांगितले. मी गंभीरपणे त्याला म्हणालो, ‘राग येत नसेल तर स्पष्ट सांगतो. तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी तुमचं लग्न होणार नाही.’ यावर तो खूप हसून म्हणाला, ‘तुम्ही काढलेल्या स्वप्नाचा अर्थ अगदी चुक आहे. आठ-दहा दिवसात साखरपुडा ठरेल. तसे पत्र येईलच. तुम्हाला घेऊनच जाईनच.’ आठ-दहा दिवस तर गेलेच. पण पत्र नाही. यांनी पत्र पाठवली परंतु उत्तरच नाही. तीन महिन्यांनी पत्र आलं. मुलाला मंगळ असल्यामुळे मुलीकडील माणसांनी मुलगी देण्याचे रद्द केले आहे. आता मात्र माझा मित्र खूपच घाबरला. आता आपले लग्न होणे शक्य नाही इथपर्यंतचे त्याचे मत झाले. सोयरिकी येणे बंद झाले. कोणतीच हालचाल दिसेना. अशा मनःस्थितीत त्याला परत एक स्वप्न पडले. स्वप्नात तीच मैत्रीण(मृत) आली. चेहरा प्रसन्न होता. तुळशी वृन्दावनासमोरून काळी गाय गेली. त्याने स्वप्न सांगितले आणि मी कागद काढून नव्वद दिवसात तुमचे लग्न होईल असे लिहून दिले. परीक्षा होताच तो गावी गेला आणि एके दिवशी त्याच्या लग्नाची पत्रिका आली. स्वप्नाचा अर्थ सांगितल्यापासून लग्नाचा दिवस ८८वा येत होता.

विश्लेषण :- जी मैत्रीण स्वप्नात आली तिला अंतर्मनातून मित्राबद्दल आकर्षण होते. तिचा मलूल चेहरा आनंददायक घटना घडणार नाही हे दर्शवित होता. म्हणून पहिल्या स्वप्नात मुलगी पसंत करूनसुद्धा लग्नासारखी आनंदी घटना घडणार नाही हा अर्थ काढला.

दुसऱ्या स्वप्नात ‘प्रसन्न चेहरा, तुळशी वृंदावन – समोर काळी गाय जाणे’ हे सूचक होते. काळी गाय स्वप्नात येणे हे मंगलकार्य होणारच याचे चिन्ह आहे. म्हणून लग्न होणारच हे मी निश्चित मनाने सांगितले.

स्वप्न क्रमांक ६ –

जितकं स्वप्न घाणेरडं तितकं ते चांगलं असा अर्थ सर्वसाधारण नियम आहे. याचा एक नमुना. माझा एक मित्र. त्याला एका रात्री स्वप्नात मातृसंभोग घडला. त्यावेळी सकाळचे चार वाजले होते. मित्र पराकोटीचा घाबरला. त्याला डबडबून घाम आला होता. सकाळी पाच वाजता तो माझ्या घरी आला. स्वप्न सांगून त्यांनी वाटेल ते प्रायश्चित्त भोगायची तयारी असल्याचे सांगितले. मी त्याला म्हणालो, ‘प्रायश्चित्त आणि स्वप्नाचा कवडीचाही संबंध नाही. निसर्गाच्या सुचना पेढा बर्फीच्या प्रसादासारखे बदलत नसतात.’ असो. आता तुझ्या स्वप्नाबद्दल सांगतो. असं स्वप्न अत्यंत सूचक आणि शुभ असतं. तुझी केस कोर्टात चालू आहे. ती तु जिंकणारच. जर तु ही केस हरलास तर मी स्वप्नातही कोणाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार नाही. सहा महिन्यांनी सरकारनेच केस मागे घेऊन त्याला पूर्ण न्याय दिला. तो देखील विक्रीकर अधिकारी म्हणूनच निवृत्त झाला आहे.

विश्लेषण :- डॉ. फ़्राइद्च्य सिद्धांताप्रमाणे याचे विश्लेषण जर केलं तर “लैंगिक भूक” एवढ्यावरच याची बोळवण झाली असती. परंतु भारतीय तत्त्ववेत्त्याच्या अनुमानाने हे स्वप्न सर्वात शुभ मानले जाते. असे स्वप्न ज्यास पडते ती व्यक्ति जर संकटात असेल तर त्यातून मुक्त होतेच. तसेच व्यावसायिक-नोकर-विद्यार्थी आपआपल्या परीने प्रगतीकडे वाटचाल करून निश्चितच यशस्वी होतात. प्रत्याघाती स्वरूप नसल्यामुळे सर्व सूचक असे स्वप्न आहे.

स्वप्न क्रमांक ७ –

श्री. खन्ना हे विक्रीकर अधिकारी म्हणून नागपूरला आले होते. योगायोगाने मी त्यांच्या हाताखाली विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होतो. माझी प्रकृती बरीच ढासळली होती. सोमवारचा दिवस होता. रविवारी मला स्वप्न पडले होते. रेल्वेतून मी प्रवास करीत होतो. गाडी दुसऱ्या रुळावरून चालली होती. पहिले रूळ खूपच लांब दिसत होते.

Swapnanchi-Duniya-12

जाग येताच मी घड्याळ बघितले. बरोबर सकाळचे पाच वाजले होते. गाडीने रूळ बदलणे म्हणजे बदली-स्थलांतर-बदल. मी खूप घाबरून ऑफिसमध्ये गेलो. साडेअकरा वाजता श्री. खन्नानी मला बोलावून घेतले. प्रकृती सांभाळण्याबद्दल त्यांनी उपदेश केला. मी भारावून गेलो होतो. मी त्यांना माझी बदली खूप दूर होणार असे सांगताच ते म्हणाले, ‘डोईफोडे, एखादे स्वप्न खरे ठरले म्हणून सर्वच स्वप्ने खरी ठरत नसतात.’ त्यांनी चहा मागविला. मी चहा घेऊन जागेवर बसलो. साडेचार वाजता दुपारी परत श्री. खन्नांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावले. मी परत येताच ते म्हणाले, ‘अहो, खरोखरच तुमची बदली मुंबईला झाली आहे. ही बघा आताच्या डाकेत आलेली ऑर्डर.’ मी सुन्न होऊन गेलो. पण इलाज नव्हता. गोष्ट अटळ होती. हा होता रेल्वेनी रूळ बदलण्याचा परिणाम.

विश्लेषण :- स्वप्नात गाडीने रूळ बदललेले दिसले हाच भाग सूचक असल्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकताच नव्हती. रूळ बदलणे म्हणजे स्थानांतर हे निश्चित असल्यामुळेच मी माझ्या बद्लीबद्दल बोललो होतो.

स्वप्न क्रमांक ८ –

मी मुंबईला कामावर रुजू झालो. तेथील मित्राबरोबर त्याच्याच खोलीवर राहिलो. तेथे एक दुसरे मित्र श्री. कांबळे भेटले. आम्ही तिघे एकाच घरात राहत होतो. पुढे श्री. कांबळे यांना क्वार्टर मिळाले. ते तिकडे राहायला गेले. एकदा त्यांचे मेव्हणे जे डॉक्टर आहेत, ते त्यांच्याकडे आले. ओघाओघानी त्यांनी मी स्वप्नाचा अर्थ सांगतो वैगरे गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. त्यांचा स्वप्नावर विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व कांबळे माझ्या खोलीवर आले. डॉक्टरांनी आपण स्वप्नात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकत होतो, एवढेच सांगितले. मी डॉक्टरांना म्हणालो, “आज तुम्हाला थोडासा फटकारा बसेल हे निश्चित. आपण सायंकाळी भेटूच.” मी नंतर ऑफिसला गेलो. सायंकाळी घरी ७ वाजता आलो. साडेसातला डॉक्टर पण आले. आल्याबरोबर त्यांनी “डोईफोडे, मी साडेदहा रुपयात हा ट्रान्झिस्टर घेतून आलो आहे. हि रसीद बघा.” असे म्हणून त्यांनी रसीद मजजवळ दिली. रसीद रेल्वेच्या दंडाची होती. डॉक्टरांनी आपण व्ही.टी. स्टेशनवर मेनगेटने तिकीट काढण्याकरिता जात असतानाच त्यांना टी.टी.आय.नी ‘हा गुन्हा आहे, साडेदहा रुपये भरून रसीद घेतली व लोकलचे तिकीट काढून ते कॉटनग्रीनला परतले.

विश्लेषण :- यात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकणे हाच भाग सूचक आहे. याचा अर्थ फुटकळ फटका बसणे असा होतो. म्हणजे प्रकरण फक्त साडेदहा रुपयांवरच निभावले एवढेच.

स्वप्न क्रमांक ९ –

हेच डॉक्टर दुसरे दिवशी सकाळी माझ्या खोलीवर आले. माझी परीक्षा घेण्याचा त्यांचा हेतू होता. पण कालचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी त्यांना दोन महिन्यापूर्वी पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांचा मित्र आपल्या बायको बरोबर फिरावयास चालला होता. इतक्यात एक साप पाठीमागून येऊन त्या बाईच्या गळ्याला चावला. इतक्यात त्यांना जाग आली. वेळ त्यांच्या लक्षात नव्हती. मी थोडा वेळ विचार करीत बसलो. नंतर डॉक्टरांना सरळ विचारले, “डॉक्टरसाहेब, हे स्वप्न पडलं त्यावेळी तुमची मंडळी कोठे होती? माहेरी का सासरी?” डॉक्टरांनी त्यांची पत्नी त्यांच्या घरीच होती असे सांगताच मी सरळ सांगितलं, “मंडळीस दिवस असलेच पाहिजेत अन् असतील तर तुम्हास मुलगाच होणार.” डॉक्टरांनी मंडळी गरोदर असल्याची कबुली दिली. त्यांना मुलगाच झाला असे त्यांनी पत्राने नंतर कळवले.

विश्लेषण :- यात स्त्रीला साप चावतो हा एकच भाग सूचक आहे. सर्वसामान्यतः स्त्रीला साप चावल्यास व ती गरोदर असल्यास हमखास भारतीय स्वप्न्फलाप्रमाणे शंभर टक्के मुलगाच होतो. डॉक्टरांचा व माझा अल्प परिचय होता त्यामुळे मला त्यांना मंडळी गरोदर आहे का हे विचारावे लागले. कारण साप फक्त त्या स्त्रीस चावला होता.

स्वप्न क्रमांक १० –

माझ्या एका मित्राच्या मुलाला रेसचे घोडे पळताना दिसले. इतकेच नव्हे तर ज्या क्रमांकांनी ते आले होते ते सर्व क्रमांक दिसले. जाग येताच त्यांनी क्रमांकांनी आलेले घोडे लिहून ठेवले व आपल्या वडिलांस सांगितले. त्याचे वडील नेमके सिनेमाच्या नादात विसरून गेले. दुसरे दिवशी सकाळीच माझ्याकडे आले आणि मुलाचे स्वप्न आणि घोड्याचे क्रमांक सांगितले. सुदैवाने मजजवळ महाराष्ट्र टाईम्स होताच. मी त्यांना घोड्याच्या क्रमांकावरील भाव दाखविला. त्यावेळी ती रेस तनाला होती. भाव पाच रुपयास रुपये ३,३००/- निघाला होता. त्यांना उशिरा आल्याबद्दल फार पश्चाताप झाला. पण त्यांना नंतर मी ठासून सांगितले घोडा स्वप्नात इतक्या थोड्या रकमेकारिता आलेला नाही. तुमच्या मुलाचा उत्कर्षाचा काळ आला आहे. थोड्याच दिवसात त्यांच्या मुलाला एका कंपनीत नोकरी लागली. अनुभव येत गेला. तो दुसऱ्या कंपनीमध्ये गेला. आज त्याला बरोबर रुपये ३,३००/- पगार आहे.

विश्लेषण :- पहिली गोष्ट स्वप्नात घोडा येणे हे अत्यंत शुभ आहे. घोडा हा प्राणी यशाच्या मार्गावर गतीने जाणार याचे प्रतीक आहे. त्यातून रेसचे घोडे म्हणजे बोलायलाच नको. हे रेसचे घोडे ज्या क्रमांकांनी आले त्या क्रमांकांनी त्या मुलास दिसले. परंतु ते घोडे एका शुल्लक यशाकरता आलेले नव्हते. कारण तसं असतं तर त्याचे वडील रेसवर गेले असते. घोडा आयुष्याची रूपरेखा दाखवतो. अशांचे आयुष्य उत्कर्ष-यश यांनी भरभरून जातं. हे आज त्याच्याकडे बघितलं की पटतं.

स्वप्न क्रमांक ११ –

मी १९५८ साली इंटरच्या परीक्षेकरिता इंदोरला गेलो होतो. माझ्या बरोबर श्री. अरविंद भालेराव(सध्या ते परभणीस एका हायस्कूलचे सहशिक्षक आहेत) होते. एक महिना परीक्षेकरता राहून आम्ही परत परभणीस येऊन आपआपल्या नोकरीवर रुजू झालो. तीन महिन्यांनी निकाल लागत असे. मी हिंगोलीला फिरतीवर गेलो होतो. तेथील मित्रांनी इंटरच निकाल लागल्याचे सांगितले. इंदोरकडील कोणतेच वर्तमानपत्र इकडे येत नसल्याने तेथील हेडमास्तरांनाच(ज्यांच्या माफत आम्ही फॉर्म भरला होता) जबाबी तर करावयाची ठरवले. सकाळी सहाच्या गाडीने परभणीस जावयाचे होते. म्हणून वडिलांस लवकर उठ्वावयास सांगितले. त्या रात्री स्वप्नात श्री. अरविंद भालेराव मला म्हणत होता, “काका, तुम्ही पास झालात. ही बघा पास झाल्याची तर आली आहे.” असं म्हणून त्यांनी मला तार दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मी त्याला म्हणालो, “अरे तार काय दाखवतोयस. तार नापास झाल्याची सुद्धा येते.” त्यावर तो खो-खो हसत म्हणाला, “काका, तुम्ही फारच विनोदी आहात बुवा.” याच वेळी मला जाग आली. घड्याळात बरोबर पाच वाजले होते. नंतर मी वडिलास म्हणालो, “मी पासच झालो आहे. काळजी करू नका.” मी परभणीस येताच इंदोरला तर केली आणि दुसरेच दिवशी पास झाल्याचे उत्तर आले.

विश्लेषण :- परीक्षेस आम्ही दोघेही बसलो होतो. ही वास्तविकता. परंतु अरविंद मला तार दाखवून पास झाल्याचे सांगतो व तो हसतो आहे. येथे दुसऱ्यांनी पास झाल्याचे सांगणे हे सूचक असून दुसऱ्याच्या हसण्यामुळे आनंददायी घटना घडणारच म्हणून पासची खात्री. शिवाय स्वप्न, स्वप्नाच्या भाषेत, सकाळचेच आहे.

स्वप्न क्रमांक १२ –

माझे एक जिव्हाळ्याचे मित्र मुंबईस नोकरीस होते. त्यांची मुलंबाळ नागपूरलाच राहात होती. एक वेळ ते दोन महिन्याची रजा काढून आले. अधूनमधून त्यांचे आमचे घर व आमचे त्यांचे घरी जाने येणे असे. एक वेळ मी सात वाजता सकाळी फिरत फिरत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला रात्री पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांना अगोदर हिरवी झाडे दिसली. नंतर पर्वत वैगरे आणि शेवटी एका झाडास लागलेले जोड्फळ दिसले. इतक्यात त्यांना जाग आली. त्यावेळी पाच वाजले होते. मी पाच मिनिटे अगदी सुन्न झालो. जड अंतःकरणाने मी त्यांना स्पष्ट सांगितले की, आज तुमचा दिवस अत्यंत वाईट जाणार आहे. अपमानाची किमान मर्यादा असणारी घटना घडेल. तेव्हा धीराने वागा. एवढे सांगून मी घरी आलो. नंतर ऑफिसला गेलो. ऑफिस सुटल्यावर मी सरळ त्यांचे घरी गेलो. ते घरीच होते. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सांगितले, “तुम्ही गेलात आणि मी पण सुन्न होऊन गेलो. कसेबसे स्नान करून पूजा उरकून बसलो. वाचण्यात मन लागेना. दहा वाजले आणि दारात सावकार बेलीफला, इतर चौघा भाडोत्री साक्षीदारांना घेऊन हजार झाला. मी धीराने सर्वांना आत बोलावले. बेलीफनी कोर्टाची डीक्त्रीची ऑर्डर दाखवली. आपण आतले आतच सर्व कागदपत्री व्यवहार उरकून घेऊ म्हणजे तुमची अब्रू वाचेल व माझेही काम होईल. यावर मी त्यास माझ्या पगारातून डीक्त्रीप्रमाणे देणे वजा होत आहे. याचा पुरावा म्हणून मी ओफिसकडून आलेल्या मनीऑर्डरचे कुपन दाखवले. त्यात वजावटीचा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे बेलीफ गोंधळात पडला. एव्हाना भाडोत्री साक्षीदार निघून गेले. बेलीफनी मला कोर्टातून स्टे ऑर्डर आणण्यास सांगितले. मी ताबडतोब कोर्टात गेलो. मॅजिस्ट्रेट पुढे सविस्तर लिहून अर्जासोबत मनीऑर्डरचा खालचा भाग जोडला. मॅजिस्ट्रेटनी ताबडतोब स्टे दिला आणि स्वतःच घेऊन जाण्यास सांगितले. दहा मिनिटात स्टे घेऊन घरी आलो. स्टे बेलीफला दाखवला. थोडे उत्पन्न बुडाले म्हणून तो चडफडत परत गेला. अशा रीतीने आमची अब्रू आज जाता जाता वाचली. अजून काही राहिलं का?” असं म्हणून त्यांनी अत्यंत केविलवाण्या दशेन माझ्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यातील तरळणाऱ्या पाण्याकडे पाहून तो पण गहिवरला. मी शांतपणे म्हणालो, “पहिला अटळ अध्याय संपला. आता दुसरा आनंददायक अध्याय आठ दिवसांनी सुरु होईल. मी आठ दिवसांनी येईन.” असं म्हणून मी घरी आलो. बरोबर सहा दिवसांनी ते माझ्या घरी प्रमोशनची तार घेऊनच आले. त्यावेळी आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. पण ते कसले होते हे आम्हा दोघांनाच माहीत होतं.

विश्लेषण :- या स्वप्नात हिरवीगार झाडे आणि जोड्फळ(दोन अलग अलग नव्हे) एवढीच सूचक आहेत. जोड्फळ दिसणे म्हणजे अति अपमानास्पद घटना घडणार याचे द्योतक. त्यामुळे तो दिवस अशुभमध्ये अगोदर घेतला आणि हिरवीगार झाडे हि आयुष्यात “हिरवळ” आणणार याच द्योतक. दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला आहेच.

स्वप्न क्रमांक १३ –

माझ्या एका मित्राची बहिण एम.एस.सी. ला होती. परीक्षा होऊन गेली. ती गावाला जाण्यापूर्वी तिला एक स्वप्न पडले. त्यात तिला एक हाती सोंडेत माळ घेऊन फिरताना दिसला. त्यांनी ती माळ तिच्या गळ्यात घातली नाही. तो ती माळ नुसती फिरवतच निघून गेला. त्या मुलीनी मला अगोदरच सुचना दिली की स्वप्नाचा वाईट अर्थ असेल तर सांगायची आवश्यकता नाही. मी तिला स्वप्नाचा अर्थ चांगला असल्याचे सांगितले. स्पष्टीकरण करून मी तिला “हायर सेकंड” क्लास पास होशील पण फर्स्ट क्लास मिळणार नाही असे सांगितले. यथाकाश निकाल लागला आणि ती ५९ गुणांनी पास झाली. अर्थात सेकंड क्लासच.

विश्लेषण :- हत्ती दिसणे – यशाचे लक्षण, माळ गळ्यात न घालणे म्हणजे हर घालण्यैटका गौरव न होणे. म्हणजे प्रथम श्रेणी न मिळणे हा होय. विद्यार्थिनी असल्यामुळे स्वप्न निकालापुरतेच मर्यादित राहील.

स्वप्न क्रमांक १४ –

मी १९६२ साली औरंगाबादेहून नागपूरला बदलून आलो. माझे परम मित्र श्री. खंडेराव शेवाळकर यांनी निरोप दिला. आता भेटी क्वचितच होतील याची खंत पण व्यक्त केली. माझ्या १२ वर्षाच्या मुलीला ब्रेन ट्युमर झाला होता. त्यामुळे तिची दृष्टी गेली होती. अंधविद्यालयात शिक्षण घेता यावे म्हणून मी नागपूरला बदली मागून घेतली होती. दोन वर्षांनी कॅन्सरच्या गाठीची परत वाढ झाली. हाल हाल झाले आणि तिने १९६६ साली आपली जीवनयात्रा संपविली. माझी बदली नंतर १९६९ साली मुंबईत झाली. १९७२ पर्यंत माझी मुलगी माझ्या स्वप्नात कधीच नाही आली. मुंबईत मी कॉटनग्रीनमध्ये हौसिंग बोर्डाच्या इमारतीत मित्राबरोबर राहत होतो. एकदा कधी नव्हे ती माझी मुलगी (भूत) माझ्या स्वप्नात आली. तिने लाल कपडे घातले होते. तिच्या मागे माझे मित्र खंडेराव शेवाळकर उत्तम कपड्यात दिसले व मला जाग आली. त्यावेळी सकाळचे पाच वाजले होते. मी व माझा मित्र सकाळी ६ वाजता चहा पिण्यास हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी मी माझ्या मित्रास म्हणालो की, “आज माझे परम मित्र शेवाळकर यांचे पत्र येईलच. कारण माझ्या मुलीच्या मागे ते मला स्वप्नात दिसले.” सायंकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही दोघे बरोबरच घरी परतलो. दरवाजा उघडताच समोर आंतरदेशीय पत्र दिसले. पत्र श्री. खंडेराव शेवाळकर यांचेच होते. पत्र वाचून मी खालीच बसलो. “आपण गाडीवर यावे. माझ्याबरोबर माझे भाचे आहेत. अकोल्यास गेलो असताना डॉ. लक्ष्मणराव भोगते, सिव्हिल सर्जन, यांनी तपासले. त्यांनी कॅन्सरचे निदान केले आहे.” माझ्या मुलीच्या मागे शेवाळकर दिसले आणि त्यांना पण कॅन्सर होणे हा विलक्षण योगायोग वाटला.

विश्लेषण :- माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता. ही वास्तवता होती. ती कधीच स्वप्नात आली नव्हती म्हणून सूचक काहीच न बोलता उभी राहिली होती. व तिच्या मागे श्री. खंडेराव शेवाळकर उभे होते. म्हणजे तिच्या मागोमाग त्याच आजाराने जाणे निश्चित होते. आजारातील साम्याच विलाक्षण.

स्वप्न क्रमांक १५ –

श्री. पांडे यांचे फेस रीडिंग यावर पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे, असे कळताच पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल व वितरणासंबंधी चौकशी करावयास म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलो. ते तेथे नव्हते म्हणून बाहेर फिरत होतो. तोच “अहो डोईफोडे, इकडे कोणीकडे,” म्हणून मला बोलावले. ते होते श्री. रमेश नवलाखे, उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर. त्यांनी कार्यालयातच नेले. त्यांनी मला २६ वर्षानंतर देखील ओळखले होते याचा मला खरोखरच आनंद झाला. त्यांनी ताबडतोब १९६३ सालची आठवण सांगितली. ती त्यांच्याच भाषेत देत आहे.

“१९६३ साली मी विक्रीकर खात्यात आपल्या हाताखाली लिपिक म्हणून होतो. त्यावेळी मी आपणास एक स्वप्न सांगितले होते. ते मला अजूनही आठवते व त्यावर आपण सांगितलेले भविष्य पण. ते स्वप्न असे.

जानेवारी १९६३ च्या उत्तरार्धात सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान हे स्वप्न पडले. प्रचंड असा पाण्याचा सागर एका देवळाभोवती पसरला होता. देवळात मी पूजा करीत होतो. सोबत दर्शनार्थी पुष्कळच होते. सायरनसारखा आवाज आला आणि सर्वांनी बाहेर जावे अशी हाकाटी पिटली. पाणी आत येऊ लागले. माझी पावलं त्यात रोवली जाऊ लागली. ती बाहेर निघणे कठीण असे वाटू लागले. अशा वेळी परमेश्वराचा धावा केला. एक अशी प्रचंड लाट आली. मी चालू लागलो. मी जसजसा पाण्यातून चालू लागलो तसातशी पाण्यात पाउलवाट मोकळी होऊ लागली होती. मी त्या मोकळ्या होऊ लागलेल्या वाटेने झपाट्याने चालत होतो. शेवटी मी एकदाचा किनारा गाठला आणि मागे वळून पाहिले तर संपूर्ण देऊळ जलमय झाले अन् मला जाग आली. याचा अर्थ आपण सांगितला तो असा-

“नवलाखे, तुम्ही लिपिक म्हणून येथे कायमचे राहणार नाहीत. तुम्ही ही नोकरी सोडाल. येथून तुमच्या प्रगतीची वाट मोकळी झाली आहे. सतत उत्कर्ष होईल एवढाच अर्थ आहे.”

आज मी उपसंचालक पदावर आहे पण ते स्वप्न आणि तुम्ही केलेले भाकीत मी आजही विसरू शकलो नाही.” चहा घेऊन मी बाहेर आलो तो श्री. नवलाखे यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा प्रत्यय घेऊन.

ज्या स्वप्नाचे मी त्यावेळी तेथल्या तेथे मनात विश्लेषण केले ते असे – देवळात दर्शनास जाणे ही सात्विक प्रवृत्ती. पाण्याची प्रचंड लाट येणे हे तसे संकट पण येथे ते ज्या पदावर होते तेच संकट होते. पण त्या लाटेनंतर पाण्यात पाउलवाट तयार होऊन पैलतीरी जाने हेच सूचक होते. सर्व जलमग्न होणे याचा अर्थ मागील परिस्थिती लय पावणे आणि पाउलवाट मोकळी होऊन किनारा गाठणे हे प्रगतीपर पावलं पडणं हाच होता. म्हणून मी प्रगती व सतत उत्कर्ष होईल हे निर्धास्तपणे सांगू शकलो.


1 Comment

सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल